बायपास फॅट तंत्रज्ञान: दुभत्या गायी-म्हशींसाठी वरदान

प्रस्तावना

दुध व्यवसायातील यश हे चांगल्या व्यवस्थापनावर तसेच उत्तम दर्जाच्या आहार घटकांवर अवलंबून असते. संकरीत गायींमध्ये दुध देण्याचे प्रमाण हे सरासरी १५ ते २० लिटर प्रतिदिन तर जातिवंत म्हशीं मध्ये ते सरासरी ८ ते १० लिटर प्रतिदिन इतके केव्हाच पोहोचले आहे परन्तु अशा जास्त दुध देणाऱ्या गायी व म्हशींचे व्यवस्थापनही तितकेच काळजीपूर्वक करावे लागते. गायीम्हशिंच्या वेतातील विण्याअगोदरचे ३० दिवस व विल्यानंतरचे सुमारे १०० दिवस असे महत्वाचे १३० दिवस जर आपण त्यांची उर्जेची गरज पूर्ण केली तर त्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक आजारांपासून बचाव करता येतो, जनावराच्या क्षमतेप्रमाणे जास्तीतजास्त दुध व फॅट मिळवता येते तसेच गाय किंवा म्हैस पुन्हा गाभण राहण्यासाठी मदत होते व जेणेकरून वर्षाला एक वासरू हि संकल्पना साध्य करता येऊ शकते. जास्त दुध देणाऱ्या जनावरांमध्ये उर्जेची गरज हि तितकीच जास्त असते. त्यामुळे हि वाढती उर्जेची गरज पूर्ण करणे व शरीरातील उर्जेचे  संतुलन व चयापचय क्रिया सुरळीत करणे आवश्यक ठरते. वाढत्या उर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी बायपास फॅट तंत्रज्ञानचा (Bypass Fat Technology) उपयोग करू शकतो

गाभण काळातील शेवटचे महत्वाचे ३० दिवस 

गाभण काळातील शेवटच्या महिन्यात गाय किंवा म्हैस दुध देत नाही, यावेळेस ती पुढील वेताची तयारी करीत असते. त्यामुळे या काळातच जर तिला योग्य आहार दिला गेला तर तिची प्रसूती व्यवस्थित होऊन दुध उत्पादनात सातत्य राहते. शेवटच्या ३ महिन्यात गर्भाशयातील वासराची ६५ % वाढ होते त्यामुळे गाभण काळात प्रथिनां बरोबरच उर्जेची गरज पूर्ण करणेसाठी बायपास फॅट देण्याची गरज आहे. यामुळे गर्भाशयातील वासराची निट वाढ होते व गायीच्या शरीरात चरबीच्या रूपाने ताकद साठून राहते. व तिचा प्रकृती अंक (बॉडी स्कोअर) ३.५ ते ४ यादरम्यान राहण्यास मदत होते. विल्यानंतर होणारे मिल्क फिवर, किटोसीस ई. आजार होत नाहीत.

विल्यानंतरचे महत्वाचे १०० दिवस

विल्यानंतर ३५ ते ४५ दिवसापर्यंत गायी-म्हशींचे दुध वाढत जाते,  याकाळात जितके जास्त दुध आपल्याला मिळवता येईल तितके त्या वेतातील एकूण दुध उत्पादन वाढते. या काळातच जनावरांमध्ये उर्जेची कमतरता (निगेटिव्ह एनर्जी) दिसून येते. तिचा प्रकृती अंक (बॉडी स्कोर) खालावतो कारण दुधावाटे पोषक द्रव्ये शरीराबाहेर निघून जातात. या वेळेस गाय उलटण्याचे प्रमाण वाढते कारण नवीन वासरू जन्माला घालण्यासाठी लागणारी उर्जा शरीरात कमी पडते. शरीरातील चरबी यकृतावर (लिव्हर) जमा होऊन फॅटी लिव्हर आजार होण्याची शक्यता बळावते. शरीरासाठी लागणारे ग्लुकोज यकृत पूर्ण क्षमतेने तयार करू शकत नाही. यामुळे गाय एकूणच तिच्या क्षमतेपेक्षा कमी दुध व फॅट उत्पादन करते. बहुतांश दुध उत्पादकांकडील गायी म्हशीं मध्ये अशा प्रकारच्या तक्रारी निदर्शनास येतात. यामुळे जनावरांमधील उर्जेची कमतरता बायपास फॅटच्या स्वरुपात भरून काढल्यास पूर्ण क्षमतेने दुध व फॅट उत्पादन घेणे शक्य होऊन जनावर वेळेवर गाभण राहण्यासही मदत होते.

बायपास फॅट तंत्रज्ञान म्हणजे काय?

बायपास फॅट उर्जेचा शाकाहारी स्त्रोत आहे जे गायी व म्हशी मधील चारही पोटांमध्ये (कोठीपोट, जाळीपोट, पडदे पोट व खरे पोट) यामध्ये पचन न होता आतड्यामध्ये जाऊन पचते व दुध उत्पादनासाठी व शरीर स्वास्थासाठी थेट उपलब्ध होते. दुध उत्पादन, प्रजनन ई. साठी लागणारी उर्जा बायपास फॅट द्वारे दुभत्या जनावरांना उपलब्ध होते. दुभत्या जनावरातील उर्जेची गरज पूर्ण करण्याकरिता स्टार्च किंवा कर्बोदके (Starch and Carbohydrates) ई. नियुक्त असे मका, गहू किंवा तत्सम पिष्टमय पदार्थ वाढवल्यास गायीम्हशीच्या पोटामध्ये तीव्र आम्लता किंवा ऍसिडिटी वाढते व दुध उत्पादन कमी होते त्यामुळे, अशा पदार्थांपेक्षा अडीच पट जास्त उर्जा देणाऱ्या बायपास फॅटचा वापर गायी म्हशींच्या खाद्यात करणे अत्यंत गरजेचे ठरते.

बायपास फॅट कार्य कसे करते? 

गाई म्हशींना दिले जाणारे खाद्य, चारा ई. पचवून देण्याचे काम कोठीपोटातील कोट्यवधी जीवजंतू करतात, हे जीवजंतू सर्व प्रकारची प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, वसा ई.चे रुपांतर एकतर स्वतःच्या शरीर पेशीत करतात किंवा त्यांचे विघटन करतात. म्हणून चांगल्या प्रकारची प्रथिने (प्रोटीन), स्निग्ध पदार्थ (फॅट) हे जास्त दुध देणाऱ्या गायींना लगेचच उपलब्ध होत नाहीत म्हणूनच बायपास फॅटचे संतुलित पशुआहारात अधिक महत्व आहे कि जे थेट आतड्यांमध्ये पचनासाठी उपलब्ध होते. आताच्या काळातील गाई म्हशींचे वाढते दुध उत्पादन लक्षात घेता ते खात असलेला हिरवा व कोरडा चारा तसेच तयार पशुखाद्य किंवा घरच्या घरी तयार केलेले आंबोण सर्वार्थाने पुरेपूर ठरत नाही व शरीरामध्ये उर्जेची कमतरता राहते. बायपास फॅटमुळे जनावरांच्या शरीरातील उर्जेची गरज पूर्ण होते, वासरांची दैनंदिन योग्य वाढ होते, कालवडी योग्य वयात माजावर येतात दुभत्या गाईम्हशी त्यांच्या क्षमते एव्हडे दुध उत्पादन करू शकतात.

नवीन बायपास फॅट तंत्रज्ञान (bypass fat technology) दुभत्या गायी व म्हशींसाठी वरदानच ठरले असून त्याचा उपयोग जास्तीत जास्त दुध उत्पादकांनी केला तर दुध व्यवसायातील अडचणी कमी होण्यास निश्चितच मदत होईल.

Read: पशु आहारात केळीच्या पानांचा उपयोग


डॉ. पराग घोगले

पशुपोषण व व्यवस्थापन सल्लागार
मोबाइल नंबर – 9892099969