पशु आहारात केळीच्या पानांचा उपयोग

प्रस्तावना 

दरवर्षी जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे, कोरडा व ओला दुष्काळ यामध्ये वैरण किंवा चाऱ्याचे दर हे सामान्य पशुपालकाच्या आवाक्याबाहेर जातात व त्यामुळे दुध उत्पादन खर्च वाढून व्यवसाय परवडत नाही. अशावेळी अपारंपरिक पिके चारा म्हणून वापरल्यास खर्चात बचत होऊ शकते. भारता सारख्या विकसनशील देशांतील शेतकऱ्यांना जनावरे व पक्षी ई. साठी लागणारे खाद्य घटक व त्या अनुषंगाने होणाऱ्या खर्चाची चिंता सतावत असते कारण पावसावर अवलंबून असणाऱ्या शेती मुळे चारा पिके किंवा कृषि उप पदार्थांचे उत्पादन पुरेसे ठरत नाही. आपल्या देश मध्ये चांगली उपजाऊ जमीन, भरपूर सूर्य प्रकाश व पाणी उपलब्ध आहे. पशु खाद्यातील काही घटक हे मनुष्यालाही त्याचे खाद्य पदार्थ म्हणून लागत असल्या मुळे त्यांचीही टंचाई काही काळानंतर निर्माण होते. मनुष्याने वापरलेले कृषि उप पदार्थ किंवा खाद्य पदार्थांचे अवशेष जनावरांचे खाद्य म्हणून वापरले जातात. केळीचे पान अशा प्रकारे जनावरांसाठी चारा (Use of Banana leaves in Cattle Feed) म्हणून वापरता येईल का याचा आपण आढावा घेऊ

केळीच्या पानांची उपयुक्तता 

केळीच्या पानामधील शुष्क पदार्थामध्ये सुमारे १५ % इतकी प्रथिने उपलब्ध असतात. व त्यांची पाचनियता सुमारे ६५ % इतकी आहे. केळीची पाने जनावरे आवडीने खातात व कालवडी मध्ये वेगाने वाढीसाठीही त्यांचा उपयोग होतो. केळीची पाने किंवा केळीचे झाड यांची कुट्टी करून किंवा बारीक चाफ करून जनावरांना खाऊ घालता येते. केळीची पाने जनावरांना खाऊ घालण्या विषयी अद्याप फार थोडे संशोधन झाले आहे. परंतु महाराष्ट्र किंवा भारतातील ज्या विभागांमध्ये केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते त्या ठिकाणी केळीच्या पानांचा वापर हिरवा चारा (Banana leaves in Cattle Feed) म्हणून केला जाऊ शकतो.

केळीच्या पिका विषयी माहिती

केळीचे पीक हे आर्द्रउष्णकटीबंधीय प्रांतात येणारे पीक आहे व त्यातील फळांचा वापर माणसांसाठी मुख्य अन्न म्हणून केला जातो. केळीच्या सुमारे ३२ जाती व १०० उपजाती आहेत. केळीची पाने व खोड त्यांच्या लागवडीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळतात व त्याचे सरासरी उत्पादन प्रती हेक्टर १३ मे टन एव्हडे असते. केळे हि वनस्पती मुसा प्रजाती अंतर्गत येते. केळीची पाने खोडा पासून वर वाढतात ती सुमारे १ ते ४ मीटर लांब असतात व ०.७ ते १ मीटर रुंद असतात.

केळीची पाने आपण जनावरांना खाऊ घालू शकतो का ?

होय, केळीची पाने आपण हिरवा चारा म्हणून आपण खाऊ घालू शकतो केळीच्या पानांमध्ये प्रोटीन व कॅल्शियम जास्त प्रमाणात असते तसेच तो कॅरोटीनचा हि स्त्रोत आहे. केळीच्या खोडामध्ये प्रथिने कमी प्रमाणात असतात परंतु गाई म्हशींचे पोट भरण्यासाठी जे फायबर लागते ते त्यातून भरपूर प्रमाणात मिळते. त्यामुळे केळीची पाने जनावरांना चाफ करून खाऊ घालण्यास हरकत नाही.

केळीच्या पानांचे सायलेज म्हणून वापर

सायलेज म्हणजे हिरवा चारा ऑक्सिजन विरहित वातावरणा मध्ये साठवून त्याची आंशिक किण्वन प्रक्रीये द्वारे साठवणूक करणे. सायलेज करणे खूप सोपे असून त्यामुळे चाऱ्याची पोषण मुल्ये देखील वाढतात. काही प्रायोगिक अभ्यासामध्ये केळीच्या पानापासून बनविलेल्या सायलेज चा वराहांच्या वाढी मध्ये चांगला परिणाम दिसून आला आहे. केळीच्या पाना मधे कॅल्शियम व लोह यांचे स्त्रोत मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. केळीची पाने जनावरांच्या आहारात हिरवा चारा म्हणून समाविष्ठ केल्यास खर्चात निश्चित पणे बचत होऊ शकते. तसेच केळीची वाया गेलेली फळे, पाने, खोड, फुले ई. कुट्टी करून जनावरांना खाऊ घालता येतात. परदेशातील काही भागांमध्ये जसे कि टांझानिया, हवाई बेटे ई. पूर्वी पासूनच केळीची पाने जनावरांना खाऊ घालण्याची प्रथा आहे. सध्याच्या काळात चारा महाग झाल्यामुळे केळीची पाने हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

Read – Use of Banana Leaves as Cattle Feed

banana leaves as cattle feed


डॉ. पराग घोगळे

पशुपोषण व व्यवस्थापन सल्लागार
९८९२०९९९६९