कमी खर्चातील मुरघास निर्मिती एक महिलेची यशोगाथा    

आपणास आपल्या व्यवसायात व्यावसायिकता आणण्यासाठी आपला व्यवसाय मोठा असावाच असे काही नाही हे आपण या शिकायला मिळेल. फलटण पासून सर्वसाधारणपणे दहिवडी रस्त्यावर दुधेभावी नावाचे एक गाव असून या गावात बचत गटाचे काम चांगले प्रकारे चालू आहे. या गावात बचत गटामार्फत दुग्ध व्यवसाय करण्यासाठी गाई घेण्यासाठी मदत करण्यात आली होती. यामध्ये त्यांची काही बचत व महिला व बाल कल्याण विकास विभागामार्फत त्यांना काही मदत करण्यात आली होती. दुधेबावी गावात शेतीसाठी बारमाही पाण्याची व्यवस्था नाही त्यामुळे पावसाच्या पाण्यावर जेवढा चारा मिळेल त्यावरच त्यांचा असा व्यवसाय चालतो. त्यांनी चाऱ्याची समस्या दूर होण्यासाठी कमी खर्चाचे हायड्रोपोनिक चारा निर्मिती युनिट सुद्धा तयार केले होते. दररोज २० किलो चारा ते या साध्या युनिटमध्ये करत होते. परंतु त्यांच्याकडे  चार महिने तयार असणारा चारा त्यांना पुढे ८ महिने उपलब्ध होत नसे व त्यासाठी त्यांना मुरघास करावयाचे होते.

आकृती १:- पिशवीत चारा भरून तयार केलेला मुरघास

दुधेबावी या गावात मुरघासा बाबत  प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये  त्यांना कमी खर्चात मुरघास कसा करावयाचा याचे प्रशिक्षण मिळाले. त्याबाबतचे महत्व व कमी खर्चातील तंत्रज्ञान त्यांच्या लक्षात आलेने त्यांनी जवळच्या भागात काही पशुपालकानी केलेला मुरघास त्यांनी पाहिला व नंतर स्वतःच  मुरघास करण्याचे ठरविले. त्यांच्याकडे स्वतःची शेती नसल्यामुळे त्यांना चारा  स्वतःच्या शेतीतून मिळत नव्हता. यांना शेती नसल्यामुळे त्यांना दुसऱ्याच्या शेतात मोल मजुरी करावी लागत असे व त्यांच्या शेतात अशी मजुरी करत असताना त्यांना कधी कधी चारा मिळत असे त्यासाठी दररोज डोक्यावर काही ना काही चारा आणावयाचे व आपल्या जनावरांना द्यावयाचे. एकदिवस त्यांना उसाचे वाढे जास्त मिळाले व त्याचा मुरघास करावयाचे ठरले.  त्यांनी ८०० किलो मुरघास क्षमता असणारी एक पिशवी रुपये २५० ला डेअरींमधून विकत आणली. त्यांच्या जवळ कुट्टी करण्यासाठी कुट्टी यंत्र सुद्धा नव्हते त्यामुळे हि एक अडचण होती. त्यामुळे हाताने कुट्टी करवयाचे ठरले परंतु त्याच्या शेजारी एका पशुपालकाकडे कुट्टी यंत्र होते त्यामध्ये कुट्टी करण्याचे ठरले. त्यांनतर उसाचे वाढे अगोदरच्या दिवशी आणलेले होते. दुसऱ्या दिवशी कुट्टी करून पिशवीमध्ये चारा भरण्यास सुरुवात केली एक थर टाकला तो व्यवस्थितपणे दाबल्यानंतर दुसरा थर असे नियोजन केले जात होते.

यावेळी मुरघास करणे गावामध्ये नवीन विषय असल्याने आजूबाजूच्या पशुपालकानी मुरघास कसा केला जातो हे पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्यांना याबाबतचे थेट प्रात्यक्षिकासह प्रशिक्षणच मिळत होते.  अश्या प्रकारे मुरघासाची एक पिशवी व्यवस्थितपणे भरण्यात आली व नंतर हवाबंद करून त्यावर वजन ठेवण्यात आले. नंतर दोन महिन्यानंतर हि पिशवी उघडण्यात आली. नुसता उसाच्या वाढ्याचा मुरघास चांगला होतो कि याची थोडी मनात शंका येत होती परंतु हि शंका ज्यावेळी मुरघासाची पिशवी उघडली त्यावेळी दूर झाली. फक्त उसाच्या वाढयाचा मुरघास अगदी चांगला झाला होता. त्यानंतर जनावरांना त्याचा चांगला फायदा झाला. नुसते उसाचे वाढे आहे असेच खायला घालण्यापेक्षा त्याचा मुरघास करून खायला दिल्यामुळे जनावराने खाल्ला पण व्यवस्थित व दुध सुद्धा अधिक निघाले. तसेच असे उसाचे वाढे एकदम आणले असते तर ३-४ दिवसात सुकून गेले असते व असा सुका चारा जनावरांनी खाल्ला नसता किंवा खाल्ला असता तर त्याचा एवढा फायदा झाला नसता. यानंतर त्या गावात बचत गटाच्या बऱ्याच महिलांनी मुरघास केला व त्याचा त्यांना चांगला फायदा झाला. त्यानंतर त्यांनी खताच्या किंवा पशुखाद्याच्या रिकाम्या पिशवीत प्लास्टिकचा लायनर टाकून ३० ते ३५ किलोचा मुरघास करू लागले.

आकृती  २ :- लहान पिशवीत तयार झालेला मुरघास

त्यामुळे १- किंवा २ गाई असल्याने त्यांना या कमी क्षमतेच्या पोत्यातील मुरघासाचा फायदा  झाला. त्यातील बचत गटाच्या काही महिलांकडे जास्त प्रमाणात मुरघासाच्या पिशव्या तयार केल्या व आसपासच्या मोठ्या पशुपालकाना त्यांनी हा चारा विकून त्यांचा चांगला फायदा करून घेतला. यामुळे आता गावात चारा विकून त्याचा आपल्या ज्यावेळी जास्त दर मिळेल याबाबतची शहनिशा बऱ्याच पशुपालकाची झाली आहे.

शीलाबाई चांगण, दुधेभावी

दुग्धव्यवसायीका