मुक्तसंचार गोठा यशोगाथा – हिरालाल सस्ते

यशोगाथा- हिरालाल सस्ते

फलटण पासून सुमारे १७ किमी पूर्वेकडे निंबळक हे गाव असून गाव हे कालवा बागायती असल्याने ऊसाचे प्रमाण जास्त आहे. हिरालाल सस्ते त्यांचे पदवी पर्यंत शिक्षण झाल्याने एका मार्केटिंग कंपनीत क्षेत्रात नोकरी करत होते. त्यांचे कुटुंब विभक्त झाल्याने वडिलांवर कुटुंबाची जबाबदारी आली. त्यामुळे वडिलाना शेतीतील काम होईना म्हणून त्यांनी नोकरी सोडून शेतीत लक्ष घालण्याचे ठरविले. आता वडील व छोटा भाऊ राहुल याच्या मदतीने त्यांनी शेतीबरोबरच दुग्धोत्पादनाचा  व्यवसाय सुद्धा चालू केला. त्यांना एकूण सात एकर जमीन त्यापैकी साडेतीन एकर जमिनीवर ऊस तर दोन एकर जमिनीवर डाळींब होते उर्वरित २० गुंठे जमिनीवर डीएचएन-६ , १० गुंठे मेथीघास , १० गुंठे मारवेल  गवत व २० गुंठे जमिनीत मका असे जनावरांसाठी चारा पिकाचे उत्पादन घेतले जात होते. त्यांच्याकडे एकूण दहा गाई व चार कालवडी व एक म्हैस अश्या प्रकारे जनावरे होती.

त्यांना कायम नवनवीन गोष्टी शिकण्याची व त्याची अंमलबजावणी करण्याची आवड होती. गोविंद डेअरीच्या संपर्कात आलेने त्यांनी मुक्तसंचार गोठा करण्याबद्दल उत्सुकता दाखवली व श्री. दादा पवार यांचा कमी खर्चाचा मुक्तसंचार गोठा त्यांनी प्रत्यक्ष पहिल्याने आपणही असा गोठा करावा व तसा निश्चय करून लाकूड व बांबू यांच्या मदतीने त्यांनी त्यांच्या जुन्या शेड वजा बंदिस्त गोठ्याचे रुपांतर मुक्तसंचार गोठा पद्धतीत केले.  त्यांना या पद्धतीत फायदा जाणवल्याने त्यांची गोविंद डेअरीच्या विस्तार अधिकाऱ्यांशी संपर्क वाढला व मुक्तसंचार गोठ्यात अनेक काय काय बदल केले म्हणजे जास्त फायदा मिळेल याच्यासाठी प्रयत्न करू लागले. त्यांनी मुक्तसंचार गोठ्यात जनावरांसाठी लाकडी डांब रोऊन त्याचा ग्रुमिंग ब्रश तयार केला. गोठ्यामध्ये पाचट टाकून त्यात ईएम द्रावणाचा वापर केल्याने चांगल्या गुणवत्तेचे खत त्यांच्याच गोठ्यात तयार होऊ लागले या खताच्या वापरणे त्यांचे शेतीचे उत्पन्न वाढले. ते कायम आम्हाला सांगतात तर मागील वर्षी त्यांच्या चौथ्या कापणीच्या ऊसाचे एकरी उत्पन्न ८९ टन एवढे विक्रमी निघाले होते यावरून आपणास मुक्तसंचार गोठ्यातील खताची ताकद लक्षात येते. त्यांची जमीन भूसभूसित झाल्याने कमी पाण्याच्या वापरात अधिक उत्पन्न निघू लागले. गोचीड नियंत्रणासाठी त्यांनी त्यांच्या गोठ्यात ५० कोंबड्या सुद्धा सोडल्या होत्या यामुळे त्यांना बराचसा फायदा झाला.

त्यांचे दैनिक नियोजनात सकाळी धार काढल्यानंतर प्रत्येक गाईस १५ किलो हायड्रोपोनिक चारा तसेच अर्धा किलो अझोला ईतर हिरव्या चाऱ्याबरोबर दिला जातो त्यानंतर सायंकाळी पुन्हा दुध काढल्यानंतर हिरवा चारा, मेथी घास व वाळलेला चारा असा आहार दिला जातो. हिरालाल सस्ते स्वताचे पशुखाद्य स्वताच तयार करतात. त्यांना गोविंद डेअरीच्या तज्ञांनी सुरुवातीस १४ ते १५ पशुखाद्याचे  चाऱ्याच्या बदलानुसार करून दिले त्यानुसार आता त्यांना चारा बदलला तर पुन्हा पशुखाद्याच्या घटकांची बदल करण्यास तज्ञाची मदत घ्यावी लागत नाही. पशुखाद्यात ते प्रामुख्याने सरकी पेंड, फुल फेट सोयाबीन, मका, मिनरल मिक्चर व मीठ या प्रकारचे घटक वापरतात. त्यांनी चांगल्या गुणवत्तेचे धार काढण्याचे यंत्रही विकत घेतले असून वेळच्या वेळी लसीकरण व जंत निर्मुलन केले जाते. हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी त्यांनी बांबू व लाकूड यापासून दररोज १५० किलो चारा तयार करणारे युनिट सुद्धा तयार केले असून त्याचा त्यांना चांगला आधार झाला आहे.

मुक्तसंचार गोठा व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केल्यामुळे काम कमी झाले , जनावरांचे आजारपण कमी झाले. औषध खर्चात बचत झाली आहे. दुधाची फेट पूर्वीं ३.८ ते ३.९ % इतकी असायची परंतु आता ४.२ ते ४.५ % एवढी फेट बसत असून एसएनएफ सुद्धा ९.००% च्या वर असतो. पूर्वी लाकडाचा गोठा होता तो आता लोखंडी डांब व लोखंडी  जाळी वापरून केला आहे. मुरघास करण्यासाठी पिट तयार केले आहेत. त्यांचा गोठा हा इकोसर्ट या कंपनीकडून सेंद्रिय प्रमाणित असून तसे प्रमाणपत्रही त्यांना मिळाले आहे. सेंद्रिय दुधामुळे त्यांना जास्त दर मिळत आहे. गोठ्यामध्ये तापमान नियंत्रित करण्यासाठी सुमारे सहा हजार रुपये खर्च करून स्वयंचलीत तपमान नियंत्रक तयार करण्यात आला असून. उन्हाळ्यामध्ये गोठ्यातील तपमान एकदम वाढले तर सेन्सर्सच्या सहाय्याने ही यंत्रणा कार्यन्वित होते व काही मिनिटातच तपमान नियंत्रित होते. त्यामुळे उन्हापासून होणारे दुष्परिणाम या गोठ्यात होत नाही. या व्यवसायाच्या मदतीने त्यांनी दीड एकर जमीन नुकतीच विकत घेतली आहे छान घरही बांधले असून चारचाकी गाडीही त्यांनी आता घेतली आहे. आजपर्यंत त्यांच्या गोठा पाहण्यासाठी राज्य , राज्याबाहेर तसेच विदेशातूनही  बरचसे शेतकरी येऊन त्यांनी हा गोठा पाहून हिरालाल सस्ते यांच्याकडून कमी खर्चातील आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे घेतले असून त्यांच्या भागातही त्यांनी आता असे मुक्तसंचार गोठे तयार करण्यास सुरुवात केली आहे. आज हिरालाल सस्ते यांच्या या गोठ्यावर येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढल्याने आता गोविंद डेअरीने या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र काढले असून हिरालाल यांच्या मार्फत शेकडो शेतकऱ्याना या ठिकाणी प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण जाते. बऱ्याच प्रसंगी हिरालाल सस्ते आता सल्लागार म्हणून मोठ मोठ्या गोठ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जात आहेत. नुकताच पुण्याजवळ १०० थारपारकर गाईंचा गोठा त्यांनी उभा करण्यास मार्गदर्शन केले असून बऱ्याच नामांकित व्यक्तींनी हिरालाल सस्ते यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

श्री. हिरालाल सस्ते

दुग्धव्यवसायक ​