दररोज १५० किलो हाड्रोपोनिक चारा तयार करून ५०% हिरव्या चाऱ्याला पर्याय

यशोगाथा – हिरालाल सस्ते, निंबळक

दररोज १५० किलो हाड्रोपोनिक चारा निर्मिती (Hydroponic Fodder Production) स्वयंचलीत यंत्र तयार केले असून ते गेली अडीच वर्ष १२५ ते १५० किलो प्रतिदिन चारा या यंत्राद्वारे तयार करून देत आहेत. वडील हे परंपरागत शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्धोत्पादनाचा व्यवसाय करत होते. हिरालाल सस्ते यांचे १२ वी पर्यंत शिक्षण झाले आणि पुढे नोकरी करण्यापेक्षा वडिलांना या व्यवसायात मदत करावयाचे ठरविले. नियमित दुग्धव्यवसाय हा जास्त अडचणींचा व त्यातून फार काही उत्पन्न मिळत नसल्याने काहीतरी नवीन करायच्या शोधात ते होते. पुढे गोविंद डेअरीच्या (Govind Dairy) संपर्कात आले आणि त्यांनी कमी खर्चाचे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास सुरुवात केली. सुरुवातीस त्यांनी मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब केला यांना त्यामध्ये बरेच फायदे दिसून आल्याने त्यांना आवड निर्माण झाली. तसेच यामधून निर्माण होणाऱ्या खतातून त्यांचे शेतीचे उत्पन्न वाढले. त्यांच्या चवथ्या कापणीचे उस उत्पादन प्रती एकर ८९ टन असे निघाले कि जे एकरी ५०-६० टन निघत होते.

हाड्रोपोनिक चारा उत्पादन

१०१२ मध्ये दुष्काळातही अनिलकाका निंबाळकर यांनी त्यांच्या जनावरांना कमी किमतीत हाड्रोपोनिक यंत्राच्या आधारे हिरवा चारा उपलब्ध केला हे पाहून त्यांनी अगदी कमी खर्चात १५० किलो प्रतिदिन उत्पन्नाचे घरगुती साधनसामग्रीचा वापर करून हाड्रोपोनिक चारा यंत्र तयार केले (Hydroponic Fodder Production). त्यांनी बांबूचे १० बाय १२ फुट लांबीचे शेड तयार करून ९० % शेडनेटने झाकून  घेतले. त्यात ४ रेक करून एक बाजूस ३२ व दुसऱ्या बाजूस ३२ असे ६४ ट्रेचा आराखडा तयार केला तसेच प्रत्येक  व पाण्यासाठी १ एचपी ची मोटर , ६४ स्प्रिन्कलर्स व टायमरच्या सहायाने जलसिंचनाची व्यवस्था केली. दिवसासाठी दर तीन तासांनी पाच मिनिटे पाणी द्यावयाची व्यवस्था केली. जुने रेशीम उद्योगाचे ट्रेंचा वापर केला त्यामध्ये जाळी असल्याने बियाणे पडू नये म्हणून प्लास्टिकचा कागदाचा वापर केला. प्लास्टिक कागदाला पाण्याचा निचरा होण्यासाठी ठिकठिकाणी छिद्रे ठेवली होती.

मका बियाणे (Maize Seeds) कोमट पाण्यात १२ तास भिजत ठेऊन नंतर पशुखाद्याच्या बारदानामध्ये १२ तास बांधून ठेवली. या मकेला मटकी प्रमाणे छोटे–छोटे मोड येतात ही मोड आलेली मका त्यानंतर ३ बाय २ फुटाच्या एका ट्रेमध्ये २ ते २.५ किलो (भिजवण्यापूर्वीचे वजन) याप्रमाणात एकसारखी पसरली जाते म्हणजे एका चौरस फुटास ३०० ते ३५० ग्राम असे प्रमाण योग्य असते. यामध्ये त्यांनी टायमर चा वापर करून तीन तासांनी ५ मिनिटे अशी पाण्याची व्यवस्था केली होती. या यंत्रात त्यांना दररोज २०० ते २५० लि. पाणी लागते. त्यानंतर ८ व्या दिवशी एक किलो मकेपासून साधारणपणे ८ ते ९ किलो हिरवा चारा तयार होतो. एक किलो मका साधारणपणे १३ रु. एवढा खर्च येतो. पाणी, मजुरी व घट असा सर्व खर्च मिळून त्यांना सदर एक किलो  चारा तयार करण्यासाठी रु. १.८० ते २.०० इतका खर्च येतो.

वरीलप्रमाणे मका त्यांच्याच शेतात तयार होतो त्यामुळे व मजुरी साठी घरातील काही सदस्यच ही कामे करतात आश्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी असतो. ते दररोज एका गाईस १०-१५ किलो हाड्रोपोनिक चारा देतात तर त्यामुळे निम्म्या हिरव्या चाऱ्याचे नियोजन हे त्यांच्या या हाड्रोपोनिक चारा यंत्रातून झाले. त्यांनी आपल्या १० जनावरांसाठी २ एकर क्षेत्र हे हिरव्या चाऱ्यासाठी राखून ठेवले होते परंतु आता त्यांच्या १० बाय १२ फुट जागेमधून दररोज १५० किलो चारा उपलब्ध झाल्याने त्यांनी एकच एकर क्षेत्र चाऱ्यासाठी ठेवले व ईतर एक एकर जमिनीत त्यांनी उस उत्पन्न घेण्यास प्रारंभ केला. त्यामुळे कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यासाठी हाड्रोपोनिक चारा यंत्र एक वरदानच आहे याचा प्रत्यय येतो.

गायींसाठी हायड्रोपोनिक चारा चांगला आहे का?

हाड्रोपोनिक चारा हा पौष्टिक असल्याने पचनीय तर आहेच पण त्यातील एन्ज़ाइमस (enzymes) व ईतर उपयुक्त घटकामुळे ईतर चाऱ्याचेही चांगले पचन होते, शरीर (अल्कलाईन) ठेवण्यास मदत होते. सर्वात महत्वाचे म्हणजे चारा दररोज शेतातून कापून आणावयाचा त्याची वाहतूक करावयाची व त्याची कुट्टी करावयाची यासाठी जे काम करावयास लागत होते ते फार कमी झाले. हाड्रोपोनिक चारा यंत्रात फक्त ट्रें उचलून जनावरापुढे ठेव्याचे आहे. यामुळे कामात फार बचत होऊन काम सोपे झाले. तसेच चारा फक्त आठच दिवसात उपलब्ध होत असल्याने चाऱ्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले कि लगेच चाऱ्याचे नियोजन करणे यात सोपे झाले आहे. कधी कधी शेतातील चाऱ्यासाठी पाणी उपलब्ध होत नसे त्यासाठी ही पद्धत फायदेशीर झाली. त्यांच्या दुधाचे १० ते १५ % उत्पन्न वाढते तसेच जनावराची त्वचेवर चकाकी आली त्यांच्या चेहऱ्यावर तेज आले. विशेस म्हणजे दुधाची चव गोड झाली.

हाड्रोपोनिक चाऱ्याच्या वापराने शेतातील चाऱ्याची मागणीही कमी झाली. जनावरे गाभण राहणेचे प्रमाण वाढले आहे. अश्याप्रकारे फायदा झाल्याने त्यांनी आता जनावरांची संख्या वाढवली आहे. या दोन वर्षात या हाड्रोपोनिक चारा यंत्र (Hydroponic fodder machine) पाहण्यास  सुमारे १०,००० पेक्षा जास्त व्यक्तींनी भेट दिली आहे. यात देश व प्रदेशातील शेतकरी, पशुवैद्यक तज्ञ व शास्रज्ञ अश्या व्यक्तींचा समावेश होता.

हेही वाचायला आवडेल तूम्हाला: आपण गायींना चाऱ्या ऐवजी ऊस देऊ शकतो का ?? किती द्यायला पाहिजे?


डॉ. शांताराम गायकवाड

सहाय्यक महाव्यवस्थापक
दुग्धव्यवसाय विकास विभाग
गोविंद दुध, फलटण, जि. सातारा