दुष्काळातही चारा छावणीत जनावरे न पाठवता दररोज तयार केला  १२५ किलो हिरवा चारा

यशोगाथा – अनिल निंबाळकर

अनिलकाका निंबाळकर हे कायम आपल्या स्वतःच्या शेतात सेंद्रिय पद्धतीने पिकांचे उत्पादन घेण्यास कायम आग्रही असत. कधी कधी त्यांच्या शेताला भेट द्यावयाची वेळ यायची त्यावेळेस त्यांनी केलेल्या नवनवीन प्रयोगांची माहिती मिळायची आणि त्यांनी केलेल्या प्रयोगांची ईतर शेतकऱ्याना कसा उपयोग होईल यासाठी आपण काही तरी करावे असे मला सारखे वाटायचे. यासाठी आम्ही आमच्या विस्तारविषयक कामकाजात वरील विषयांचा समावेश करायचे. बऱ्याच ठिकाणी अनिलकाका निंबाळकर यांना त्या-त्या विषयावर बोलण्यासाठी ठिकठिकाणी आम्ही शेतकरी प्रशिक्षण आयोजित करायचे. यानंतर काही दिवसांनी आम्ही अनिलकाका निंबाळकर यांच्या शेतावर आम्ही प्रशिक्षण केंद्र काढले आणि खरोखर हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रातून व महाराष्ट्राबाहेरून सुद्धा येऊन शेतकऱ्यांनी या प्रशिक्षण केंद्रावर येऊन प्रशिक्षण घेतले आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यानी त्यापद्धतीने कामकाज चालू करून स्वतःचा फायदा करून घेतला व ते पाहून त्यांच्या जवळपासच्या शेतकऱ्यांनी अनिलकाका निंबाळकर यांच्या विंचुर्णी येथील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतले आहे. तसेच कायम संशोधनाचे ध्यास लागल्याने प्रत्येक केलेल्या प्रयोगात त्यापुढे आणि काय आहे का हे पाहण्यासाठी अनिलकाका कायम सातत्य ठेवत होते. त्यामुळे एकदा प्रशिक्षण घेऊन गेलेला शेतकरी कायम अनिलकाका यांच्या संपर्कात राहून येणाऱ्या अडचणींवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आम्हीही आमचा कोणताही प्रयोग आपण एकटे न करता हा प्रयोग एखाद्या प्रयोगशील शेतकऱ्याबरोबर केल्यास जास्त पथदर्शी होतो हे लक्षात आलेने आम्ही बरेच प्रयोग गोविंद डेअरीच्या संशोधन (Govind Milk & Milk Products Pvt. Ltd.) क्षेत्रावर न करता अश्याच शेतकऱ्याबरोबर केले व ते जास्त फलदायी झाले.

दुध उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आम्ही सुरुवातीस मुक्तसंचार गोठ्याची संकल्पना पुढे आणली. परंतु मुक्तसंचार गोठा ही महागडी संकल्पना करायला शेतकरी पुढे येत नव्हते म्हणून राजळे येथील श्री. दादा पवार यांच्याबरोबर काम करताना महागडा मुक्तसंचार गोठा अल्पखर्चात करण्याचे सोपे तंत्र विकसीत करून त्याचा फार झपाट्याने प्रसार झाला. त्याचप्रमाणे मुरघास तंत्रज्ञान, पशुआहार तंत्रज्ञान, अझोला ई. अनेक हायटेक तंत्रज्ञान कमी खर्चात उपलब्ध करण्यासाठी काम केले व त्याचा चांगला प्रसारही केला.

हाड्रोपोनिक चारा यंत्राची (hydroponic fodder machine) सुरुवात होण्यापूर्वी मोड आलेल्या धान्याचा माणसाच्या आहारात काय फरक पडतो यावर आमचा अभ्यास चालू होता. गोविंद डेअरीचे तत्कालीन कार्यकारी संचालक श्री. गणपतराव धुमाळ यांच्या वाचनात लिव्हिंग फूड नावाचे इंग्रजी पुस्तक आले ज्यामध्ये मोड आलेल्या धान्यांचा आहारात नियमितपणे आपण वापर केल्यास आपणास कसे  फायदे होतात याबाबत विस्तृतपणे माहिती देण्यात आली होती. या पुस्तकातील माहिती वाचून त्यांनी सुरुवातीस स्वत: मोड आलेले धान्य म्हणजे मोड आलेली मटकी खाण्यास सुरुवात केली तर दोन दिवसांतच त्यांचा पित्ताचा त्रास पूर्णपणे बरा झाला, भूक लागण्याचे प्रमाणही कमी झाले व त्यांना जरा ताजेतवाने वाटू लागले. त्यांनी ही वस्तुस्थिती आम्हास सांगितली. मोड आलेली मटकी, मुग व मटकी यांचे सकाळचा नास्ता म्हणून आहारात वापर चालू केला आणि त्यानी फार फरक पडला. मग हाच प्रयोगाची चर्चा अनिलकाका यांच्याबरोबर करून आपणास हे मोड आलेल्या धान्याचा ग्रामीण भागात जास्तीत जास्त वापर वाढवून त्यांचे आरोग्य कसे चांगले राहील या दृष्टीने चर्चा केली.

अनिलकाका हयांच्या अंगात कायमच  प्रयोगशीलता असलेने त्यांनी मोड आलेल्या धान्याचा वापर चालू केला त्याचा त्यांना चांगला फायदा झाला. त्यांना पित्ताचा फार त्रास होता व सकाळी लवकरच भूक लागायची हे मोड आलेली मटकीचा आहारात वापर चालू झाल्यापासून वरील त्यांच्या या दोन्ही समस्यापासून त्यांची सुटका झाली त्यांना दुपारी उशिरापर्यंत भूक लागत नसल्यामुळे त्यांना ताजेतवाने वाटू लागले यानंतर त्यांनी त्यांच्या बऱ्याच मित्रांना याबाबत माहिती दिली व मोड आलेल्या चण्याचा आहारात वापर करण्यास सांगितले त्यानंतर बऱ्याच लोकांचे आजार कमी झाल्याची माहित मिळाली.

ढवळ या गावचे श्री. उत्तम शिंदे यांना तर मोड आलेल्या धान्याचा आहारात केलेल्या वापराने फारच फरक पडला त्यांना बरेच त्रास होते. त्यांना रक्तदाब, डायबेटीस, मुळव्याध, दमा, पित्त ई. व्याधींनी ग्रासले होते असेच मोड आलेली मटकीचा माहिती त्यांना मिळाली व दोन महिन्यात बराच फरक झाला. त्यांनी रक्तदाब व डायबेटीस साठीच्या काही गोळ्या बंद केल्या व शेतात काम करताना त्यांना थकवा यायचा अर्धा तासापेक्षा जास्त वेळ काम करू शकत नव्हते परंतु आता मोड आलेल्या धान्याच्या नियमित आहारात वापराने त्यांच्या दैनिक कामकाजात फरक पडला आता दिवसभर काम केले तरी उत्साह कायम टिकून राहत आहे.

अशी अनेक उदाहरणे आहेत त्यातील एक महत्वाचे उदाहरण म्हणजे मुंजवडी या गावातील सौ.ठणके यांना गुढघेदुखीचा त्रास गेली आठ वर्षे होत होता त्यांना स्वताची कामे स्वत: करता येत नव्हती तर साधे व्यवस्थितपणे चालताही येत नव्हते. त्या या आजारासाठी दररोज ११ प्रकारच्या गोळ्या खात होत्या  त्यांना मोड आलेल्या धान्याची माहिती मिळाल्यानंतर दोन महिन्यात त्यांनी सर्व गोळ्या बंद केल्या व आता शेतातील कामेही त्या आता करू लागल्या आहेत. अश्या प्रकारे मोड आलेल्या धान्यात असणारे महत्वाचे घटक हे शरीरातील कमतरता भरून काढतात व आपणास त्या कमतरतेमुळे झालेल्या आजारावर मात करता येते.

आपण जर खालील तक्ता पाहिला तर आपणास साधे मुग व मोड आलेले मुग यातील अन्नघटकांचा फरक पाहता येईल. मोड आलेल्या अवस्थेत अन्नद्रव्ये शरीरास उपलब्ध होण्याचे प्रमाण फार मोठ्याप्रमाणात वाढते ते आपणास पुढील तक्त्यातून पाहता येईल.

अ.नं.

तपशील

प्रमाण
उर्जा १५% कमी
प्रथिने ३०% जास्त
केल्शियम ३४% जास्त
पालाश ८०% जास्त
सोडियम ६९०% जास्त
लोह ४०% जास्त
स्पुरद ५६% जास्त
जीवनसत्व अ २८५% जास्त
जीवनसत्व ब १ २०८% जास्त
१० जीवनसत्व ब २ ५१५% जास्त
११ जीवनसत्व ब ३ २५६% जास्त
१२ जीवनसत्व क भरपूर  जास्त

मोड आलेल्या मुगातील व मोड न आलेल्या मुगातील अन्नघटकांचा फरक

वरील सर्व उदाहरणात आपण पहिले कि मोड आलेले धान्याचा मनुष्याच्या आहारात वापर फार महत्वाचा आहे.

आपण पशुखाद्याच्या माध्यमातून जनावरांना धान्य देत असतो परंतु अश्या धान्यातील काही भाग जर आपण मोड आणून जर जनावरांच्या आहारात समावेश केला तर  मोड आलेल्या धान्यातील महत्वाच्या अन्नघटकांचा जनावरांच्या शरीराला नक्कीच फायदा होईल या हेतूने जनावरांच्या आहारात मोड आलेल्या धान्याचा उपयोग करावयाचे ठरले. बऱ्याच वेळेस जनावरे माजावर वेळेवर येत नसतील तर त्यांना मोड आलेली मटकी आहारात देण्याचा सल्ला पशुवैद्यक देतात. सुरवातीस सोयाबीन, मका, गहू ई. जास्त प्रमाणात मटकी, मुग ई. कमी प्रमाणात मोड आणून जनावराच्या आहारात देण्यास सुरवात केली त्यामुळे एकंदरीत चांगला फरक जाणवू लागला.

सर्व धान्यांना मोड आणणे जरा कटकटीचे वाटू लागले. म्हणून नियमितपणे मोड आणून देण्यासाठी मकेचा वापर केला व कधीकधी ईतर धान्याचाही आहारात वापर चालू केला. आपण जर ५ किलो पशुआहार एका जनावरास देत असू तर त्यातील एक किलो आहार कमी करून त्याशिवाय चार किलो आहार देऊन उरलेल्या एक किलोचे  मकेचे जर आपण मोड आणून दिले तर काय फायदा होतो याचा अभ्यास केला असता फार चांगले फरक लक्षात आला. विशेष म्हणजे यात आहाराचा खर्चही वाढला नाही. वरील प्रमाणे मोड आलेला धान्याचा आहारात वापर केला असता पुढीलप्रमाणे फरक निदर्शनास आला.

  • दुध उत्पादनात वाढ
  • दुधाची गुणवत्ताही सुधारली
  • दुधाच्या चवीत फरक पडून त्याची गोडी वाढली
  • गाईच्या दुधाचा रंग पिवळा असायचा परंतु तो पांढरा झाला.
  • जनावराच्या गाभण राहण्याच्या प्रमाणात वाढ झाली.
  • जनावराची रोगप्रतिकार शक्ती वाढली.

या सर्व गोष्टींचा आभ्यास केला तर मोड आलेले धान्य हे जनावराच्या आहारात नियमितपणे देणे फायदेशीर असते याचा प्रत्यय येतो.

त्यानंतर २०१२ साली महाराष्ट्राच्या काही भागात दुष्काळ पडला होता व जनावरांना चारा उपलब्ध नव्हता अश्या प्रसंगी शासनामार्फत चारा छावण्यांमध्ये जनावरांची व्यवस्था करण्यात आली होती व शासनामार्फत चाऱ्याचा पुरवठा करण्यात येत होता. अनिलकाका निंबाळकर यांच्या शेजारच्या गावातच चारा छावणी उघडण्यात आली होती. अश्या वेळेस मोड आलेल्या धान्याचा पुढे हाड्रोपोनिक चाऱ्यात रुपांतर केल्यास जनावरास हिरवा चारा मिळेल ही संकल्पना पुढे आली.  यानंतर मग हाड्रोपोनिक चारा उत्पादनाचे प्रयोग चालू झाले.

इंटरनेटवर हाड्रोपोनिक चाऱ्याची बरीच माहिती मिळाली परंतु त्यातील हायटेक हाड्रोपोनिक चारा यंत्रांच्या किमती पाहिल्यावर आपणास त्या परवडतील असे वाटत नव्हते. त्यानंतर हाड्रोपोनिक पद्धतीने चारा तयार करण्यासाठी वेगवेगळे ट्रें, वेगवेगळी जागा, वेगवेगळे वातावरण देऊन, पाण्याची वेगवेगळी पद्धत वापरून सहा महिने असे प्रयोग करून एक दिवस चांगली मुळ्यांची लादी असलेला हाड्रोपोनिक चारा (hydroponic fodder) तयार करण्यात यश आले. त्यानंतर एक हायटेक मशीन व्यवस्थितपणे पाहिल्यानंतर असे निदर्शनास आले कि आपल्याकडे असणाऱ्या साधनसामग्रीच्या आधारे आपण चांगले हाड्रोपोनिक यंत्र (hydroponic fodder machine) तयार करू शकतो असा विश्वास निर्माण झाला.

नंतर थोड्याच दिवसात घरगुती साधनसामुग्रीच्या आधारे एका नवीन निर्मितीची सुरुवात झाली. यामध्ये तपमान नियंत्रणासाठी काय वापरले आहे, जलव्यवस्थापनाच्या सोयीसाठी काय करावे, ट्रें, कुठले वापरावेत या बाबत विचार सुरु झाला. यातील लहन मोठे तंत्रज्ञान लक्षात घेऊन ते कमी खर्चात आपल्याकडील साधनसामुग्री वापरून कसा करता येईल याचाच विचार सारखा चालू होता व आपणास हे करता येईल असा दृड विश्वास मनात होता. त्यामुळे कमी खर्चात यंत्र तयार करण्याचे ठरविले. यानंतर बऱ्याच प्रयत्नांनतर हायड्रोपोनिक यंत्र तयार केले. सुरुवातीला बऱ्याच वेळा अपयश आले. डॉ. गायकवाड आणि मी नवीन संकल्पना राबवून हायड्रोपोनिक शेड तयार केले. मका टाकण्यासाठी रेशीम उद्योगाचे जुने  ट्रे वापरले.

पाणी मारण्यासाठी १ एच.पी. ची मोटर वापरली. या मोटर वरती ड्रीप करून स्पिंक्लेर्स द्वारे पाणी दिले. सुरुवातीला ही मोटर चालू बंद करण्यासाठी खूप त्रास होऊ लागला. नंतर पाणी देण्यासाठी मोटरला स्वयंचलीत  टायमर बसवला. यानुसार दोन तासातून २ मिनिटे पाणी दिले. अशा प्रकारे हायड्रोपोनिक चार यंत्र तयार झाले. मका टाकल्यापासुन ९ व्या दिवशी चारा तयार झाला. त्यानंतर वातावरणानुसार बुरशी दिसू लागली. यासाठी हाताने सोललेल्या मकेचा वापर केला. पाण्यामध्ये क्लोरीन किंवा मेडीक्लोर चा वापर केला. त्यानंतर बुरशी कमी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर बुरशीचे प्रमाण कमी करण्यासाठी वर्षभर वेगवेगळे प्रयोग केले. यात बियाण्याची निवड व बीजप्रक्रिया, आद्रता, तपमान, पाण्याचे आवर्तन इत्यादीचे व्यवस्थित नियोजन करून  बुरशीवर नियंत्रण मिळवले.

यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट बियाणे आहे. बियाणे हे तीन महिने जुने असले पाहिजे. म्हणजे त्याचे अंकुरण चांगले होते. बियाणे हाताने सोललेले असावे कारण बियाणे हाताने सोल्यामुळे फुटत नाही. फुटलेले बियाणे वापरल्यास चाऱ्यावरती बुरशी येऊ शकते. बांबूचे शेड तयार करताना प्रत्येक कप्यामधील अंतर दीड फुटाचे ठेवले. सहजपणे काम करता यावे म्हणून जास्तीत जास्त ६ कप्यांपर्यंत शेड तयार केले. या शेड ला सर्व बाजूने ९० बाय १० ची शेड नेट वापरली. या शेड नेट मुळे ९० टक्के सावली आणि १० टक्के ऊन शेड मध्ये मिळते. शेडच्या वरती ५०० मायक्रोन चा पांढरा कागद वापरला. यामुळे शेड मधील वातावरणात आद्रता तयार झाली. यामुळे मकेच्या मुळांची आणि पानांची वाढ चांगली झाली.

सुरुवातीला बियाणे १२ तास म्हणजे रात्रभर भिजत ठेवले. त्यानंतर हे बियाणे गोणीमध्ये बांधून ठेवले. या बियाण्याला मोड आल्यानंतर ते ट्रे मध्ये एकसारखे पसरवून घेतले. या ट्रे वरती दिवसातून ५ ते ६ वेळा स्पिंक्लेर्स ने पाणी दिले. अशा प्रकारे ट्रे चे चक्र सुरु ठेवले. या हायड्रोपोनिक चारा यंत्रातून १२५ किलो चारा तयार झाला. एका किलो मकेपासून ८ ते ९ किलो चारा तयार झाला. हायड्रोपोनिक चाऱ्यामुळे पशुखाद्य व चाऱ्यावरती होणारा खर्च कमी झाला, गाईच्या दुधामध्ये वाढ झाली, गायींच्या अंगावरती चकाकी वाढली आणि दुधाच्या चवीमध्ये गोडसरपणा आला.

हायड्रोपोनिक तंत्रज्ञान (Hydroponic Fodder Machine) का वापरावे?

हायड्रोपोनिक चारा यंत्र (hydroponic fodder machine) तयार करण्यासाठी १००चौरस फूट जागा, १० ते १५ हजार रुपयांचे बाम्बुंचे शेड, २ हजार रु. ची शेड नेट, ३ हजार रु. चा टायमर, ड्रीपचा खर्च ३ हजार रु., ३ बाय २ आकाराचे ट्रे, असा सर्व मिळून खर्च २५ ते ३० हजार रूपये खर्च आला. यामधून सुरुवातीला रोज १२५ किलो चारा मिळाला. हा चारा १० गायींसाठी पुरेसा झाला, यामध्ये १ किलो बियाणापासून ८ ते ९ किलो चारा मिळाला. एका ट्रे साठी २ किलो बियाणे २४ रूपये, पाणी, वीज, मजुरी आणि इतर घसारा पकडता ६ रूपये  खर्च आला. असा सर्व मिळून ३० रु खर्च आला. अशा प्रकारे एका किलोसाठी सरासरी १.५० रु. खर्च आला. रोज हायड्रोपोनिक चारा यंत्रातून १२५ किलो चारा तयार करण्यास १९० रु. खर्च आला. महिन्याला सरासरी ४ टन चाऱ्याचे उत्पादन मिळाले आणि यासाठी ६००० हजार रूपये खर्च आला. यानुसार वर्षामध्ये ४८ टन चाऱ्याचे उत्पादन मिळाले.

Read: हिरालाल सस्ते – Successful Dairy Farmer


डॉ. शांताराम गायकवाड

सहाय्यक महाव्यवस्थापक
दुग्धव्यवसाय विकास विभाग
गोविंद दुध, फलटण, जि. सातारा