प्रचलित कोरोना व्हायरस ‘कोविद-१९’ ची साथ प्रयोगशाळेतून ?

अनेक संशोधनपर लेखांतील आशयांचा सोप्या भाषेतील गोषवारा

सध्या सारे जग ज्या कोविद-१९ (CORONA VIRUS DISEASE-19) या रोगाच्या भयाने पछाडले गेले आहे, त्या रोगासाठी कारणीभूत असलेला सार्स-कोव्ह-२ (SARS CoV-2 म्हणजे SARS CORONA VIRUS-2; SARS – म्हणजे Severe Acute Respiratory Syndrome) हा विषाणू चीनमधील प्रयोगशाळेतून ‘सोडण्यात’ आला आहे, अशी एक शंका सांगितली जाते आहे. ही शंका बळावण्याचे कारण म्हणजे चीनमधल्या वुहान या शहरातील स्थानिक मासेबाजाराजवळ वसलेली, शरीरातील श्वसनसंस्थेच्या रोगांना कारणीभूत असलेल्या विषाणूंवर संशोधन करणारी ती प्रयोगशाळा आहे. असे सांगण्यात आले की, हा विषाणू कोरोना आणि हर्पिस या दोन विषाणूंच्या मिश्रणातून तयार झाला असला पाहिजे. केवळ सामान्य जनमानसच नव्हे, तर अमेरिकेसह जगातील सर्व शास्त्रज्ञांनी हा ग्रह ठेवूनच संशोधनालाही सुरुवात केली होती.

सिडने विद्यापिठातील प्राध्यापक डॉ. एडवर्ड होम्स, कॅलीफोर्नियाच्या स्क्रिप्स विद्यापिठाचे डॉ. क्रिस्तियन अंडरसन व त्यांचे सहकारी आणि न्यू ऑर्लिन्स भागातील तुलेन विद्यापिठाचे डॉ. रॉबर्ट गॅरी यांनी आपापल्या प्रयोगशाळांत एकत्र मिळून, केलेल्या संशोधनांचे निष्कर्ष एकमेकांशी जुळवून पाहिले. त्यांचे निष्कर्ष व निरीक्षणे ही जगातील सर्वात नामांकित व संशोधनातील विश्वासार्ह स्रोत म्हणून पाहिले जाते अशा ‘नेचर-मेडिसिन’, ‘लँसेट’ व ‘सेल’ या नियतकालिकांत प्रसिध्द करण्यात आले आहे. केवळ एकाच आठवड्यात या संशोधनपर निबंधांना अत्यंत उच्च प्रतीचे संशोधन म्हणून जगभरातील शास्त्रज्ञांनी नावाजले आहे. त्यांपैकी, केवळ गैरसमजांचे व शंकांचे निराकरण करण्यासाठी ‘सेल’ या संशोधनपर नियतकालिकातील निबंधास प्रसार माध्यमात व वृत्तपत्रांतून प्रसिद्धी देण्यात आली.

त्यांनी आपल्या संशोधनातून काय सिद्ध केले ? त्यांना ही शंका खोडून काढणारे कोणते प्रमाण मिळाले ? ते पाहू.

संबंधित विषाणू दोन शक्यतांनी अस्तित्वात आला असावा.

१. जनुकांची अदलाबदल. म्हणजे एकाने काही जनुके द्यायची. त्याच्या बदल्यात दुसऱ्याने आपल्याकडील काही जनुके प्रदान करायची. अशा प्रकारे सहकार्य संशोधकांत चालते. हे करत असताना क्वचित झालेल्या अपघाताने एखादा संसर्गजन्य असलेला, तर एखादा संसर्गजन्य नसलेला विषाणू अशा दोन्ही वाणांची निर्मिती होवू शकते. (हे लक्षात घेतले पाहिजे, की जनुकांची व त्यांतील घटकांची, क्रमांची जगभरातल्या शास्त्रज्ञ व संस्थांकडे साठवलेली असते आणि संशोधन व अभ्यासासाठी त्यांची त्याबाबतीत सहकार्यपर देवाणघेवाणही चालू असते. ती आवश्यकही असते. अन्यथा जगभरातील संशोधन होणार नाही. हेही ध्यानात घेतले पाहिजे, कि या विषाणूचा शोधही अशा सहकार्यामुळेच शक्य झाला आहे.)

२. नवीन व दुर्मिळ जनुकांच्या मुद्दाम घडवण्यात आलेल्या क्रमबदलातून विषाणूंची अभिनव प्रजाती तयार होवू शकते.

वरीलपैकी, पहिल्या शक्यतेचा पडताळा चीन, दक्षिण कोरियासह व जगातील अनेक शास्त्रज्ञांनी केला. इतकेच नव्हे, तर सिद्धही केला आहे. या शास्त्रज्ञांनी, वुहान शहरातील या रोगग्रस्त रुग्णांचे नमुने घेवून त्यातून SARS CoV-2 विषाणूंचे जनुकसंच वेगळे करण्यात यश मिळवले व त्यांचा जनुकीय क्रमही निश्चित केला. ही जनुकीय विदा (माहिती) त्यांनी जुन्या व ज्ञात असलेल्या कोरोना विषाणूच्या जनुकीय माहितीशी जुळवण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांना आजवर ज्ञात असलेल्या (वाटवाघळातील कोरोना विषाणूंच्या प्रजाती, तसेच अतितीव्र व शीघ्र श्वसन संलक्षणकारी म्हणजे SARS, मध्य आशियाई श्वसन संलक्षणकारी, म्हणजे MERS विषाणू) कोरोना विषाणूच्या जनुकांशी नव्या कोरोनाच्या प्रजातीशी ५० – ९० % साधर्म्य असल्याचे दिसून आले. इथेच त्याची ओळख पटली.

त्यातही आश्चर्य असे की, चीनमधल्या वुहान शहरातील मासेबाजारातून मिळालेल्या मृत पँगोलीन या मुंगुसासारख्या प्राण्यात आढळून आलेल्या विषाणूत व नवनिर्मित कोरोनाच्या जनुकक्रमात खूपच म्हणजे साम्य दिसून आले. ते साम्यही असे भयंकर होते की, या दोन्हीत आढळून आलेल्या विशिष्ट १२ न्युक्लिओटाईडस असे होते की, ज्यांच्यामुळे विषाणूच्या आवरणावरील प्रथिनांमध्ये चार नवीन अमिनो आम्लांची निर्मिती होते. ह्या चार नवीन अमिनो आम्लांमुळे फ्युरीन नावाचे विकर तयार होते. या विकराच्या क्रियेमुळे विषाणूच्या आवरणाला छेद जातो व तो विषाणू केवळ अतिशय संसर्गजन्यच होतो, असे नव्हे तर तो अतिवेगाने प्रसृतही होतो. त्याचे कारण असे, की आवरणाला गेलेल्या छेदामुळे आणि रासायनिक क्रियांसाठी त्याच्यातले केंद्राम्ल आता ACE-2 प्रकारच्या पेशींवर आक्रमण करण्यास सक्षम बनते. त्यामुळे या विषाणूच्या आणि फुफ्फुसातील पेशींच्या आवरणांचा संयोग शक्य होतो व विषाणूमशील केंद्राम्लांचा फुफ्फुसातील पेशींत शिरकाव होतो. बर्ड फ्यूच्या साथीदरम्यानही अशाच प्रकारच्या प्रक्रियेचा हातभार होता, हेही शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. त्यामुळे यात कुठल्याही प्रकारच्या हेतुपुरस्सर व कृत्रिम योजना असण्याची शक्यता नाही हे सिद्ध झाले.

अशी शंका रास्त नसल्याचा अजून एक निर्वाळा म्हणजे – जनुकातील शर्कराबाध्य केंद्रे. नवनिर्मित कोरोना विषाणूच्या केंद्राम्लात असलेल्या शर्कराबाध्य केंद्रांमुळे विषाणूभोवती चिकट अशा पदार्थाचे आवरण तयार होते. त्यामुळेही ह्या विषाणूला प्रतिकारक गुणधर्म प्राप्त होतो. हा सर्वात महत्वाचा  निर्वाळा मानला जातो, तो यासाठी, की एकवेळ एखाद्या विषाणूमध्ये अभिप्रेत असलेले न्युक्लिओटाईड कृत्रिम पद्धतीने घुसवून त्यामध्ये घातक व संसर्गजन्य गुणशक्ती निर्माण करता येतील – पण, विषाणूच्या केंद्राम्लात शर्कराबाध्य केंद्रे तयार करता येणे अथवा बाहेरून घुसवता येणे शक्य नाही.

दरम्यानच याबाबतीत नेक्स्त्रेन.ऑर्ग या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या एका लेखात SARS CoV-2 या विषाणूचा संसर्ग एड्स या रोगाशी मिळताजुळता असल्याचा दावा करण्यात आलेला होता. मात्र, स्वित्झर्लंडमधील बेसेल विद्यापिठातील डॉ. एमा हॉडक्रॉफ्ट या संसर्गजन्य रोग तज्ज्ञ संशोधिकेने ते खोडून काढले व ते संपूर्णत: व अवैज्ञानिक, अशास्त्रीय असल्याचे सप्रमाण निदर्शनास आणून दिले. अगणित व असंख्य विषाणूंच्या विश्वातील अतिशय नगण्य व असंबद्ध साधर्म्याचा असा संबंध लावणे चुकीचे असल्याचे दाखवून दिले. या लेखातील अशा दाव्यावर वैज्ञानिकांकडून सप्रमाण व शास्त्रोक्त टीका  झाल्यानंतर हा लेख मागे घेण्यात आला, ही बाब अलाहिदा ! पण त्यामुळे एड्ससारख्या विषाणूशी सार्स-कोव्ह-२ शी असलेल्या साम्याचा निकाल लागला. त्याचप्रमाणे अगोदर समज होता, त्याप्रमाणे हर्पिस (नागीण) या त्वचारोगाच्या विषाणूशी त्याचे काही साधर्म्य नसल्याचे सिद्ध झाले आहेशेवटी, संशोधनाअंती जगभरातील अनेक शास्त्रज्ञ या ठाम निष्कर्षाप्रत आले आहेत, की सद्यस्थितीत धुमाकूळ घालत असलेला हा नवीन कोरोना विषाणू वटवाघळे व पँगोलीन या प्राण्यात आढळून आलेल्या विषाणूंचा संकर अथवा मिश्र विषाणू असला पाहिजे; मात्र त्याच्या वाढीदरम्यान झालेल्या जनुकीय बदलांमुळे (उत्पपरिवर्तन) तो एकाच प्रजातीत प्रकर्षाने आढळून आलेला आहे.  (वास्तविक पाहता, पँगोलीन हा मुंगुसासारखा दिसणारा निशाचर सस्तन प्राणी भारतीय उपखंडात आढळतो. हिमालयाच्या दिशेला असलेल्या, पूर्वांचल राज्यांमध्ये, तसेच दक्षिण भारतातही तो आढळतो. मणिपूर राज्यातील मोरेह प्रांतालगतच्या तामू या भागातील तामिळी वसाहती व तामिळनाडू राज्यातील त्यांच्या काही वस्त्या, तसेच ओडिशातील बेहरामपूर अशा भागातील वस्त्यांचा या पँगोलीन प्राण्याच्या तस्करीशी संबंध असल्याचे धागेदोरे आहेत. त्याचप्रमाणे या प्राण्याच्या त्वचेवरील विशिष्ट खवले मांसासाठी त्याला अतिशय चांगली किंमत येत असून पुढे भारतातून म्यानमारमार्गे चीनमध्ये या प्राण्याच्या तस्करीच्याही घटना असल्याच्या नोंदी सांगण्यात येतात. साधारणपणे ४०००० अमेरिकन डॉलर्स एवढी किंमत असल्यामुळे या प्राण्याची खूप मोठ्या प्रमाणावर चोरटी निर्यात केली जाते व २००९ ते २०१७ दरम्यान किमान ६००० पँगोलीनची चोरटी तस्करी झाल्याचे अंदाज वर्तवण्यात येतात. त्यामुळे शास्त्रज्ञांनी संशोधनात असे अपघात होतात व ते भविष्यातही अनेकवेळा घडू शकतात, असे सांगून आपण त्यासाठी दक्ष राहणे आवश्यक असल्याचा इशारा दिला आहे. त्यासाठी दोन अतिशय महत्वाच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत –

  • मासेबाजारासारख्या ठिकाणी वन्यजिवांची, विशेषत: पक्षीवर्गातल्या, कत्तल व मांस विक्री करण्यावर तात्काळ व कडक निर्बंध घातले गेले पाहिजेत.
  • जीवशास्त्रज्ञांनी विविध वन्य जीव व पक्ष्यांमधील कोरोना व तत्सम विषाणूंच्या जनुकीय संशोधनावर लक्ष देणे गरजेचे आहे. कारण, अशा विषाणूंच्या प्रसारावर नियंत्रण राखण्यासाठी त्यांच्या जनुकीय गुणविशेषांचा अभ्यास अनिवार्य ठरणार आहे.

अनुवादक

डॉ. संतोष कुलकर्णी

पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर