चिकात असते वासरांसाठी रोगप्रतिकारक शक्ती

कोलोस्ट्रम फीडिंग

वासरांमध्ये प्रारंभिक आयुष्यात होणारे विविध आजार टाळण्यासाठी पशुपालकांना महत्वाच्या काही प्रमुख बाबी जोपासणे आवश्यक आहे. त्या बाबी म्हणजे वासरास अस्वछ आणि जंतु प्रादुर्भाव होईल अश्या ठिकाणी ठेवू नये. वासरांची प्रतिकारक क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे त्यासाठी जन्मानंतर योग्य मात्रेत चीक पाजणे अनिवार्य आहे. डॉ. विजय मुळे हे पशुवैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ आहेत यांनी नवजात वासरांना चिक पाजण्याचे (Colostrum Feeding) महत्व याबद्दल सविस्थर माहिती दिली आहे. पशुपालनात वासरांचे शास्त्रीय पद्धतीने संगोपन हि एक मोठी समस्या आढळून येते. चुकीचे व्यवस्थापन. अस्वच्छता आणि वैद्यानिक दृष्टिकोनाचा अभाव यामुळे वासरांमधे मृत्यु होण्याचे अनेक उदाहरणे आहेत.

वासरांची व्यवस्थित निगा आणि त्यांचे संगोपन केल्यास दुग्धव्यवसायातमधे अधिक यश मिळते. वासरे सर्वसाधारणपणे त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीच्या सहा महिन्यात विविध आजारांनी ग्रस्त होतात. नवजात वासराला आईचे म्हणजेच गायीचे पहिले दुध (चिक) ताबडतोप पाजणे गरजेचे असते. पुष्कळ वेळेस चिक न पाजल्यास त्यापासून मिळणाऱ्या प्रतिकार शक्तीच्या अभावामुळे नवजात वासरांमध्ये विविध आजारांचा संसर्ग होतो आणि आर्थिक नुकसान होते. वासरे जन्मताच संपूर्ण प्रतिकारशक्ती घेऊन जन्माला येत नाही त्यामुळे हे विविध आजारांना बळी पडू शकतात. वासरांच्या प्रारंभिक आयुष्यात जन्मानंतर योग्य मात्रेत चिक पाजणे गरजेचे आहे.

चिक हे गायीमधले व्याल्यानांतरचे पाझरणारे प्रथम दुध वासराचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे अन्न म्हणजे आईचे पहिले दूध. वासरांना जन्मानंतर चिकाचे दूध पाजणे अत्यंत आवश्यक आहे. चिकातील प्रतिकारक शक्ती वासराला नजीकच्या आयुष्यातील विविध आजाराविरुद्ध प्रतिकार करण्यासाठी नैसर्गिक शक्ती देते. चिक हा वासरांना योग्य वेळेत आणि योग्य मात्रेत पाजणे गरजेचे असते. चिक जन्मानंतर २ ते ४ तासाच्या आत वासरास पाजावा. कारण या काळात चिकामधील प्रतिकार पेशींचे (Antibodies) प्रमाण अधिक असते तसेच वासरांच्या आतड्यांची शोषणक्षमता चांगली असते जेणेकरून चिक जलद गतीने शोषला जातो.

चिक हा वासराच्या जन्मवजनाच्या १०% एवढा द्यावा म्हणजे साधारणतः २-५ किलोग्रॅम चिक हा एक वासरास पुरेसा आहे. चिक देतेवेळी तो २-३ भागात विभागून पाजावा त्यामुळे त्याचे पचनही व्यवस्थित होते. चिक वासरास रोज २ ते २.५ किलोग्रॅम पहिल्या तीन दिवसांच्या कालावधीत मिळणे आवश्यक असते. नवजात वासरांना चिक पाजण्याचे विविध फायदे आहेत जसे कि चिकामधील तयार गॅमाग्लोबिलिन (Gamma globulins) नावाच्या प्रतिकार पेशी वासराच्या आतडयांमध्ये सहजरित्या शोषल्या जातात त्यामुळेच वासरांचे विविध आजारांपासून संरक्षण होते. चिकातील सारकशक्तीमुळे जन्मापूर्वीचा आतड्यात साठलेला मळ शौचाद्वारे बाहेर टाकला जातो (Muconium). चिक हा चांगल्या प्रथिनांचा स्रोत आहे. चिकातील प्रथिनांचे प्रमाण हे नेहमीच्या दुधाच्या प्रमाणापेक्षा ३-५ पट एवढे असते.

चिकात जीवनसत्वे आणि क्षार मुबलक प्रमाणात असतात त्यातील काही उदाहरणे म्हणजे जीवनसत्व अ, ब, कोलीन, थायमिन तसेच कॅल्शिअम, फॉस्फरस , अल्प प्रमाणात लोह आणि मॅग्नेशियम इत्यादी धातू असतात. वासरांमधील पहिल्या सहा महिन्यात मृत्युचे प्रमाण चिक कमी पाजल्यामुळे तसेच गोठ्यातील अस्वच्छतेमुळे होतात. वासरांमध्ये चिक न पाजल्यास किंवा कमी पाजल्यास त्यांची प्रतिकारक्षमता कमी होऊन विविध आजारांचा संसर्ग होऊ शकतो. जसे सफेद दाह, बेंबीचा दाह, सांध्याचा दाह आणि जंतुसंसर्ग विषबाधा हे होय.

पशुपालकांनी नवजात वासरांना योग्य प्रमाणात चिक पाजून त्यांची प्रतिकार क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करावा ज्यामुळे नवजात वासरांच्या मृत्युच्या प्रमाणात घट होऊन पशुपालन आणि दुग्ध व्यवसायात भरपुर यश मिळु शकेल.


डॉ. विजय मुळे
मार्केटिंग हेड – पशुवैद्यकीय विभाग,
वेटोकॉनाल इंडिया ऍनिमल हेल्थ प्रा. लि. मुंबई