गो स्तनदाह रोग निदान आणि त्यावरील उपचार

गो स्तनदाह रोग हा गाईंच्या कांसेचा आणि दुग्धनिर्मिती करणाऱ्या ग्रंथींचा दाह निर्माण कराणरा रोग आहे. हा रोग जगात सर्वत्र दिसून येतो. स्तनदाह हा बहुविध कारणांनी होणारा रोग असून, त्याचा गाई ज्या वातावरणांत ठेवलेल्या असतात त्याच्याशी आणि दूग्धोत्पादनाशी घनिष्ठ संबंध आहे. बहुतेक वेळी आंचळ-मार्गांतील दाह निर्मिती करणाऱ्या रोगजंतूमूळे तो होतो. कांही वेळी रासायनिक आणि उष्णताजन्य जखमांमुळे हा रोग होऊ शकतो. स्तनदाहामुळे विशेषत: बिन लाक्षणिक स्तनदाहामुळे दुग्धनिर्मिती कमी झाल्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होऊ शकते.

कारण मिमांसा: स्टॅफायलो कोकस ऑरियस (Staphylococcus aureus), स्टॅफ. सिट्रस वा अलबस, स्ट्रेप्टोकोकस अगॅलॅक्शीया ((S. agalactia), स्ट्रेप्टो. डिसगॅलॅक्शीया (S. dysgalactia,), इ.कोलाय, ब्रुसेल्ला ॲबोर्टस, कोरायर्न बॅक्टेरियम बोव्हीस, कोरायन बॅक्ट. पायोजीनस आणि प्स्युडो मोनासच्या (Pseudomonas spp.) जाती या जंतूंमुळे हा रोग होते.

कोणत्या जनावरांना हा रोग होतो: गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या आणि डूकरांना या रोगाची बाधा होते.

रोग प्रसाराचा मार्ग: दाह बाधित जनावराची कांस ही या रोग बाधेचा प्रमुख उगम आहे. वातावरणांतील “जंतुसंसर्ग” हा गोस्तनदाहाचा आयताचा स्त्रोत आहे. दुसरा स्त्रोत म्हणजे, वासरांमार्फत मुख ते कांस (आचळे) मार्गे फैलाव. आचळ, जनावराची कातडी (त्वचा), दुध काढणाऱ्यांचे हात, दुधाची भांडी, कपडे हे पुष्कळ वेळेस जंतुदूषित झालेले असतात. दुध काढण्याचे मशीनही जर योग्य रित्या हाताळले नसेल तर संसर्गाचे कारण होऊं शकते.

स्तनदाह रोगाची लक्षणे 

पुष्कळ रोगी जनावरांना ताप येणे, स्तनग्रंथींचा दाह ही लक्षणे दिसून येतात पण कांस वा आचळे दुखत नाहीत. सुरूवातीचे दूध पाणीदार असून, त्यांत गुठल्या दिसतात. कांसेला सूज येवून तांबडे पाणीही येते. कांही वेळा कांस गरम लागते आणि दुखते. दुधात रक्त मिश्रीत झालेले दिसणे किंवा पू अथवा त्यांच्या जाउ गाठींही (गुठल्या) दिसतात. जर त्यावर उपाय योजले नाहीत किंवा उपायावर गुण आलेला दिसला नाही तर त्याची परिणती विस्तृत प्रमाणांत स्तनग्रंथींमध्ये कठीणपणा निर्मिती होणे (Fibrosis) यात होते आणि त्यामुळे ग्रंथींचे कार्य थांबते (म्हणजे त्यांत दुग्धनिर्मिती बंद होते.) काही गाईंमध्ये “सडणारा गोस्तन दाह” होवून त्यांत गाईच्या जीवालाही धोका निर्माण होतो.

रोगाची प्रत्येक्ष लक्षणे स्तनदाह कोणत्या प्रकारचा झाला आहे यावर दिसून येतात. उदा. 1. लक्षणिक स्तन दाह, 2. बिन लक्षणिक स्तनदाह किंवा 3. जुनाट स्तनदाह.

स्तनदाहांत दुधावर काय परिणाम होतो: स्तनदाहांत रोगजंतूंची वाढ होते. त्यामुळे विषार तयार होतात. त्यामुळे दुग्ध निर्मिती करणाऱ्या ऊती समुहांना आणि कांसेतील सुक्ष्म नलिकांना दुखापत होते. त्यामुळे दुग्धनिर्मितीची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही ही ढासळतात.

दुधावरील परिणाम: दूधाचा रंग बदलतो, तसेच त्याचा वास आणि सुसंगतता (Consistency) ही बाधित होते. कांही वेळा दूध पाण्यासारखे होते, त्यात रक्त, पू आणि गूठळ्या निर्माण होतात. स्तनदाहांत पलाष (पोटॅशियम) कमी होते तर “लॅक्टोफेरिन” मध्ये वाढ होते. त्यांत “केसीन” म्हणजेच दुधांतील मुख्य प्रथीन आणि कदक (कॅल्शिअम) कल्क (कॅल्शिअम) कमी होते. स्तनदाहांत दुधांतील पांढऱ्या पेशी (ल्याकोसाईट) तसेच ग्रंथींच्या पेशी (सोमॅटिक सेलस) वाढतात.

रोगनिदनासाठींच्या प्रयोग शालेय चाचण्यासाठी काय नमुने गोळा करायचे? 

निरजंतुक बाटलीमध्ये गायीच्या दूषित कांसेच्या भागाच्या आंचळांतील दूध निरजंतूक पद्धतीने जमा करून ती बाटली “प्रतिजैविक” उपचार चालू करण्याअगोदर बर्फावर ठेवून प्रयोग शाळेला पाठवावी.

स्तनदाह रोग निदान:

स्तनदाहाचे रोगनिदान दूध आणि कांसेची प्रत्येक्ष शारिरिक तपासणीवर आणि लक्षणांवर केली जाते.

  1. प्रत्येक्ष लक्षणांचे चित्र
  2. कॅलिफोर्निया मॅस्टायटिस टेस्ट (C.M.TCalifornia Mastitis Test)
  3. दुध नमुन्याच्या साक्याच्या कांचेची (मिल्क सेडिमेंटच्या स्मिअरची) मायक्रोस्कोप (सूक्ष्मदर्शका) खालील परिक्षण

विभेदक (Differential) प्रयोगशालेय चाचणी :

  1. रोग निर्मिती करणाऱ्या (casual) जंतूचे विलगीकरण (Isolation)
  2. प्रतिजैविक औषधीची संवेदनशिलता चाचणी

स्तनदाह रोगवरील उपचार:

प्रतिजैविकाच्या संवेदनशिलतेच्या चाचणीच्या अनुसार गाईवर उपचार करावा, पुन्हा-पुन्हा आणि संपूर्ण दूध काढून टाकणे हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्यामुळे विषारी आणि रोगजंतु दूषित दूध निघून जाण्यास मदत होते. गाईच्या कांसेला फुगवटा (सूज) आली असेल तर बर्फाचे चौकोनी तुकडे वापरून “थंडशेक” दिल्याने फायदा होतो. गोस्तन दाहाचा मुख्य उपचार म्हणजे कांसेच्या दूषित भागाच्या आंचळाच्या नलिकेतून प्रतिजैविक मलम आंत सोडणे. स्ट्रेपटोमायसिन, अँपिसिलीन, पेनिसिलीन, क्लोकझॅसिलीन इत्यादी प्रतिजैविके त्यासाठी वापरावती. आयब्यू प्रोफेन किंवा ॲसेटामिनोफेन ही दु:ख निवारके दाह आणि सूज कमी करण्यासाठी वापरावीत.

रोग-प्रतिबंधन:

श्रेष्ठदर्जाची स्वच्छता आणि आरोग्य सवयी हा कांसेच्या आरोग्याच्या कार्यक्रमाचा कणा आहे. गोठ्याची जमीन कोरडी राखणे आणि जनावरांना धुलाई न करणे याची परिणती गोस्तन दाहाचा प्रादूर्भाव न होण्यात होते. दुसरी बाब म्हणजे दुध काढण्या अगोदर गोठ्याची धुलाई व स्वच्छता करणे, दुध काढल्यावर आंचळावर जंतुनाशकाचे लेपन (टीट-डीप कप वापरून) करणे. ज्या गाईला गोस्तनदाह झाला आहे, प्रत्येक सडांतील दूध वेगळे तपासून घ्यावे आणि ज्या सडांतील दूध दूषित आहे ते सर्व एकत्र करून 5% फेनॉल वापरून निर्जंतूक करून गाडून टाकावे. वासराला दूषित आंचळाचे दूध पिऊ देऊ नये. दूध पिळणाऱ्याना जंतूनाशक हॅडवॉश (सॅनिटायझर) ने हात धुवण्याची सवय लावावी. दूधाची भांडी साफ ठेवावीत आणि दूध काढण्याआधी किंवा नंतर निर्जंतूक करावीत. नियमितपणे जमीन साफ धूवून निर्जंतूक ठेवावी.

 

Read: गो स्तनदाह रोग निदान आणि त्यावरील उपचार- परिशिष्ट


मराठी अनुवाद 

डॉ.एस.व्ही. पंडित
जेष्‍ठ शास्त्रज्ञ, निरंजन बायोटेक, नांदोशी, पुणे

बाजारातील संबंधित उत्पादने