वासरांचे संगोपन

वासरांचे संगोपन (Calf Rearing)

“चांगली गाय ही बाजारात विकत मिळत नाही, ती घरीच तयार करावी लागते”. ही म्हण अगदी बरोबर आहे. आपल्याकडे जन्मलेली कालवड जर योग्य जोपासली (Calf Rearing) तर जास्त उत्पादन देते व उपयुक्त ठरते. त्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

 1. जन्मल्यानंतर लगेच नाळ हा २ इंच ठेऊन स्वच्छ ब्लेडने कापावा व त्याला क्लिप लावावी किंवा दोऱ्याने बांधून टाकावा.
 2. नाळेला आयोडीन लावणे महत्वाचे आहे. बऱ्याच वेळा असे न केल्यास नाळेला जंतुसंसर्ग होतो व छिद्र पडून हर्निया होतो.
 3. वासरू दहा दिवसाचे असताना शिंगकळ्या हल्ली बाजारात मिळणाऱ्या मलमाने जाळाव्यात. त्याने जास्त जखम होत नाही व शिंगे उगवत नाहीत. भविष्यात जास्त जनावरे गोठयात पाळणे सोपे होते.
 4. जन्मल्यानंतर अर्ध्या ते एक तासात चीक पाजणे फार गरजेचे असते. वजनाच्या १०% इतका चीक पाजावा. ३ दिवस तरी चीक पाजावा कारण वासराला ९०% रोगप्रतिकारक शक्ती ही यातूनच मिळते.
 5. त्यानंतर रोज किमान ३ लिटर दुध पाजावे किंवा मिल्क रिप्लेसर दिवसात ५ – ६ वेळा दिला पाहिजे.
 6. मिल्क रिप्लेसर मध्ये किमान २२% प्रथिने असावीत. मिल्क रिप्लेसर सोबत चीक दिला तर अजून चांगला आहे कारण मिल्क रिप्लेसर (Milk Re-placer) मध्ये   रोगप्रतिकारक शक्ती नसते जी  वासराला चिका मुळे मिळते.
 7. वासरू एक महिन्याचे झाले असता त्याला धान्य किंवा वाळलेला चारा द्यायला हरकत नाही.
 8. सुरुवातीचे दोन महिने त्याचे कोटीपोट तयार झालेले नसते त्यामुळे ते चाऱ्याचे पचन करू शकत नाही. हळूहळू कोटीपोट तयार होत असते, त्यामुळे हिरवा चारा लगेच देऊ नये.
 9. ३ आठवड्यानंतर  व सहा महिन्याला जंतांचे औषध द्यावे.
 10. धान्य आणि पाणी यांच्या सहाय्याने वासरांचे कोठीपोट तयार होते. रोज किमान दहा लिटर पाणी द्यावे. एकाच वेळी जास्त पाणी पिऊ देऊ नये. त्यामुळे रक्ताची लघवी होते. पिण्याचे पाणी दुर अंतरावर ठेवावे जेणेकरून वासरू सारखे पाणी पिणार नाही.
 11. जेव्हा वासरू दूधा वर असते तेव्हा पातळ शेण नैसर्गिक असते, जास्त काळजी करण्याची गरज नाही पण जर शेण मध्ये रक्त व श्लेष्मा (म्युकस) आढळले   तर त्वरित पशु वैद्यकांचा सल्ला घ्यावा. वासरांमध्ये जुलाब होणे हे जास्त घातक असते. जुलाब झाले की पिण्याच्या पाण्यातून सोडीयम, पोटॅशियम आणि इतर खनिजे द्यावीत.
 12. वासराचे वजन ३०० – ५०० ग्राम प्रति दिन वाढणे अपेक्षित आहे त्या मुळे दर महिन्याला वासराचे वजन मोजणे आवश्यक आहे. पहिल्या तीन महिन्यात वासरांची वाढ झपाट्याने होत असते. या काळात आहारावर विशेष लक्ष द्यावे.
 13. हल्ली खास वासरांसाठी उपलब्ध असणारी खनिज व जीवनसत्व यांचे मिश्रण मिळते, ते द्यावे.
 14. अडीच महिन्यानंतर दुधाचे प्रमाण कमी करून काफ स्टार्टर व चारा याचे प्रमाण वाढवावे.
 15. ३६५ दिवसांत २५० – ३०० किलो वजन गाठण्यासाठी आहाराचे नियोजन अत्यंत महत्वाचे आहे.
 16. पोटाची व्यवस्थीत वाढ झाली तर भविष्यात असली वासरे खाल्लेल्या चाऱ्याचे भरपुर दुधात रूपांतर करतात व आरोग्य राखले जाते.
 17. वासराला लसीकरण (Cattle Vaccination)करणे अत्यंत महत्वाचे आहे. पहिल्या ६ महिन्यात एफ एम डी चा जास्त धोका असतो त्यामुळे एफ एम डी लसीकरण अनिवार्य आहे.

लेखक : डॉ. आरिफ शेख  

पशुवैद्यकीय चिकित्सक, मु. पो. साकुर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर,
मो.९९२२६२२६०८, Email: [email protected]