बाळासाहेब जाधव आदर्की-सेंद्रिय खत निर्मितीतून व्यवसायिक पशुपालन

श्री. धनाजी जोतीराम जाधव यांची वडिलोपार्जित १५ एकर जमीन आहे. फलटण शहरापासून सातारा रस्त्यावर २४ किमी अंतरावर आदर्की बु. हे त्यांचे गाव आहे. बऱ्याच वर्षापासून त्यांचे शेती ही जिरायती होती परंतु आता धोम बलकवडी योजनेतील पाण्यामुळे शेती आता बागायती होण्यास हळूहळू सुरुवात होऊ लागली आहे. तरीही सर्व शेतीस पाणी उपलब्ध नसल्याने बरेचशी शेती जीराय्तीच आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा दुध व्यवसाय हा त्यांचा शेती पूरक व्यवसाय निवडला आहे. त्यापैकी श्री धनाजी जाधव हे कायम नवनवीन तंत्रज्ञान याची माहिती घेऊन पहिले स्वतः त्याचा त्यांचं शेतीवर / गोठ्यात प्रयोग करून तो कसा फायदेशीर आहे हे ईतर लोकांना दाखवून त्यांच्याबरोबर इतरांचेही राहणीमान उंचवण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहेत. त्यांच्याबरोबर जरी आपण बसलो तरी ईतर गप्पापेक्षा काही तरी नवीन कमी खर्चे व अधिक नफ्याचे प्रयोग करण्याबद्दल गप्पांवरच भर असतो. त्यांच्या एकूण १५ एकर शेती पैकी त्यांनी एकूण पाच एकर क्षेत्र हे चाऱ्यासाठी ठेवले आहे.यामध्ये १ एकर डीएचएन-६  या वाणाचे संकरित गवत तर उर्वरित चार एकर क्षेत्रात आलटूनपालटून मका या चारा पिकांचे उत्पादन घेतले जाते. त्यांच्याकडे बंदिस्त गोठा पद्धतीत २० ते २५ जनावरांचा समावेश होता. मजुरांचा अभाव व जनावरांच्या आजारीपणाचे प्रमाण जास्त  होते. त्यामुळे त्यांना हा व्यवसाय अडचणींचा वाटत होता. कालांतराने गोविंद डेअरीच्या संपर्कात आल्याने त्यांनी मुक्तसंचार गोठा व्यवस्थापन पदतीचा अवलंब करण्याचे ठरविले. त्यांनी त्यांच्या जनावरांसाठी शेतात भल्यामोठ्या पिंपळाच्या झाडाखाली एकपाखी पद्धतीचा गोठा केला होता. गोठ्यास कमी खर्चाची लाकडांच्या फळ्या वापरून जनावरांना चारा खाण्यासाठी गव्हाण करण्यात आली होती. अश्या गोठ्यास  ६० फुट रुंद व गोठाच्या लांबीनुसार १२५ फुट लांब अश्या प्रकारचे लाकडी कुंपण केले. यात प्रत्येक आठ फुटावर एक डांब व अश्या डांबा ना आडवे चार बांबू किंवा लाकडाच्या ओली लावण्यात आल्या. झाड मध्येच असल्याने जनावरांना नैसर्गिक सावलीही झाली गोठ्याच्या विरुद्ध बाजूस पाणी पिण्यासाठी सिमेंटची टाकी बांधली. जनावरांना पाया खाली टाकलेला मुरुम व दगड लागू नयेत त्यांना आरामशीर बसता यावे यासाठी शेतातील वाया जाणारे पाचट यामध्ये टाकले. अश्या प्रकारे कमी खर्चात आहे त्या गोठ्याचा वापर करूनच फायदेशीर मुक्तसंचार गोठा तयार करून जनावरे यात मोकळी सोडून दिली. त्यांचा सर्वात महत्वाची अडचण होती मजूर व जनावरांचे आजारपण या त्यांचे दोन्ही अडचणी वर त्यांनी मुक्तसंचार गोठा पद्धतीचा अवलंब करून मात मिळवली. मुक्तसंचार गोठ्यात पाचट टाकल्याने त्यात जनावरांचे शेण व मुतारी यांची पावडर सारखे खत तयार होत होते. त्यामुळे दोन दोन महिने शेण काढण्याचे व जनावरांना धुण्याचे कामच नव्हते त्यामुळे आता मजुरांचा महत्वाचा प्रश्न आता सुटला होता. त्याच बरोबर जनावरांना पाहिजे त्यावेळेस पाणी, चारा, व्यायाम, विश्रांती मिळत असल्याने आजाराचे प्रमाण मोठ्याप्रमाणात कमी होते. गोचीडांचे प्रमाण कमी झाल्याने गोचीड तापासारखे आजार फारच कमी झाले.

आकृती १ :- श्री. धनाजी जाधव आपल्या जनावरांसोबत

मध्यंतरी दुधाचे दर कमी झाले होत व पुन्हा दुध व्यवसाय अडचणीत येईल असे वाटत होते त्यावेळेला आम्ही निवडक दुध उत्पादकांची मिटिंग घेऊन या अडचणींवर मात करण्यासाठीच्या काही उपाययोजना आहेत का याची शह निशा करत असताना सर्व दुध उत्पादक दुध दराबाबत बोलत होते परंतु त्यावेळेस श्री. जाधव यांनी आम्हाला दिलेली उपययोजना आजही आठवते. ते म्हणाले होते कि आज दुधाला पाहिजे त्या प्रमाणात दर नाही त्यामुळे काही तरी केले पाहिजे. आज पाण्याची बाटलीला दुध पेक्षा जास्त दर आहे असेच म्हणतो परंतु सध्या ग्लासातील पाण्याला का बरे जास्त दर मिळत नाही तर त्यासाठी त्याचे वितरण करण्याचे योग्य अभ्यास आपणाकडे नाही. आपण सर्व मिळून अश्या प्रकारचे जिवाणूयुक्त खत या मुक्तसंचार गोठ्यात तयार करू कि त्याचा दर नक्कीच दुधापेक्षा जास्त असेल. हे वाक्य नंतर सगळ्यांच्या प्रतिक्रिया मात्र हसण्यासारख्याच होत्या. परंतु श्री. जाधव आपल्या मताशी ठाम होते वत्यांनी तसे कामही चालू केले. त्यांच्या मुक्तसंचार गोठ्यात दर महिन्याच्या १ ते ३ तारखे दरम्यान ते आजूबाजूंच्या गावामधून पाचट आणून टाकत असतात व दर महिन्याच्या शेवटी त्यांच्या गोठ्यातून ते १२ ते १४ ट्राली खत ते बाहेर काढत असतात. यातील खत हे शेण, मुतारी, पाचट व उपयुक्त जीवाणू असे मिश्रण असते. त्यामुळे उत्कृष्ट गुणवत्तेचे जीवाणू खत तयार होते. या खताचे वर्गीकरण करण्यासाठी यंत्र पण त्यांनी विकत घेतले असून त्यांच्या कामाची पद्धत पाहून कृषि विभागाने त्यांना ग्रेडिंग मशीन ५० % अनुदानावर दिले आहे. यामध्ये ते हे सर्व खत एकत्र करून या यंत्रातून त्याचे वर्गीकरण करून त्यांच्या गुणवत्तेनुसार बाजारात विकतात. त्यांनी तयार केलेले पहिल्या ग्रेडचे खत ते रुपये २० किलो या दराने विकतात. यावरून आपणास असे दिसून येते कि चिकाटी व शास्रीय पद्धतीने काम केल्यास आपण असाध्य गोष्टही साध्य करू शकतो.

 आकृती २  :-  झाडाखालील मुक्तसंचार गोठा

आज त्यांच्या खताची गुणवत्ता पाहून दिवसेंदिवस त्याची मागणीही वाढत आहे व या वाढीव मागणीची गरज भागवण्यासाठी त्यांनी गावातील ईतर दुध उत्पादकांना मदत करून गावात ५० मुक्तसंचार गोठे तयार करावयाचा संकल्प केला असून त्यापैकी ३२ मुक्तसंचार गोठ्यांचे काम आजपर्यंत पूर्ण केलेले आहे. त्यांचे दुध संकलन केंद्रही असून त्या मध्यमातून स्वखर्चाने प्रत्येक प्रदर्शनात ते आपल्या दुध उत्पादक जोडीदारांना घेऊन जातात माहिती देतात व वेळोवेळी गरजेप्रमाणे आर्थिक मदत करून अश्या दुध उत्पादकांना आधुनिक पशुपालन करण्यासाठी मदत करतात. त्यांनी गावात साईश सेंद्रिय खत विक्री शेतकरी मंडळ तयार केला असून अश्या मंडळ माध्यमातून ते नाबार्ड बँकेच्या सहाय्याने प्रोडुसर कंपनी काढणार असून त्याबाबतची कार्यवाही चालू आहे. त्यांच्याकडे धार काढण्याचे मशीनही असून चाऱ्याची कुट्टी करण्यासाठी त्यांनी ट्रॅक्टर वर चालणाऱ्या जंबो कुट्टी यंत्र विकत घेतले असून गावात गरजेप्रमाणे ते हे यंत्र देतात. आज त्यांच्या गोठ्यातील खताचे उत्पन्न महिन्याला ८० हजाराच्या आसपास आहे. तेच आता असे खत पॅकिंग पिशवीतून विकल्यास आणि फायदा होणार आहे.

मुक्तसंचार गोठा करतानाच उत्पादित होणाऱ्या सेंद्रिय खतामुळे त्यांची शेतीही सेंद्रिय झाली आहे. त्यामुळे उत्पादित चारा हा सेंद्रिय असल्यामुळे त्यांचा गोठा हा सेंद्रिय गोठा म्हणून नोदणीकृत असून त्यांच्या गोठ्यातील दुध सेंद्रिय असल्यामुळे त्यांना ६ ते  ८ रुपये जास्त दर मिळत आहे. एकंदरीतच त्यांनी मुक्तसंचार गोठ्याचा अवलंब करून सर्वसामान्य दुध उत्पादकांपुढे एक चांगला आदर्श ठेवला आहे.

श्री. धनाजी जोतीराम जाधव

दुग्धव्यवसायक