अझोला : लागवड व गायींचा आहार – सत्य की असत्य ?

अनेकदा आम्ही संशोधक व विस्तार अधिकारी व कर्मचारी एखाद्या तथाकथित तंत्राच्या आहारी जातो त्याची साधी वस्तुनिष्ठ अशी चाचपणीही करत नाही. समस्या अधिक गंभीर आणि तीव्र होते, जेव्हा अशा सिद्ध न झालेल्या तंत्राचा वारेमाप प्रसार व प्रचार होवू लागतो आणि केवळ उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी ते तंत्र अधिक लोकाभिमुख करायचा – खरे तर लोकांच्या गळी उतरवण्याचा आटापिटा सुरु होतो. मग अशा वेळी त्या तंत्राची उपयुक्तता, सयुक्तिकता, ते अंमलात आणण्यासाठी होणारा खर्च अशा गोष्टीही विसरल्या जातात.

सध्या सगळीकडे अझोला लागवडीचे जे लोण पसरले आहे व त्याचे स्तोम करण्यात येत आहे, त्याची शहानिशा करणे हा या लेखाचा उद्देश आहे. असा डावा केला जात आहे, की अझोला हे चाऱ्यालाही पर्याय देणारे पशुखाद्य आहे. त्याशिवाय, अझोलाच्या वापराने केंद्रीकृत व व्यावसायिक पशुखाद्याची गरज कमी करते व त्यामुळे खर्चात मोठी बचत होते, असेही सांगितले जात आहे. यात किती तथ्य आहे, हे आपण या लेखातील चर्चेद्वारे, इतरत्र प्रकाशित झालेल्या संशोधनाच्या माध्यमातून समजून घेवू.

सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की, अझोला हे कुठलेही अभिनव व अफलातून असे काही नवीन तंत्रज्ञान वगैरे नाही. १९९० च्या दशकात चीन, जपान, फिलिपिन्स अशा देशांतून साळीच्या उत्पाद्नासोबत आंतरपीक म्हणून अझोलाची लागवड करण्यात येत असे आणि काही मार्मिक गोष्टी लक्षात येताच या देशांत ती लवकरच थांबवण्यातही आली. भारतात मात्र त्याची फारशी शहानिशा न करता ही लागवड चालू आहे.

  शुष्क घटक / ड्राय मॅटर ड्राय  मॅटरमधील स्थूल प्रथिनाचे प्रमाण (क्रूड प्रोटीन) पचनीय ऊर्जा (प्रति किलो ड्राय  मॅटर)
अझोला ६.७ २०.६ ७.४
मोहरीची पेंड ९२ २६ ११.८
संयुक्त / मिश्र खाद्य ९२ १८ १२
मुरघास २३.५ १०.५
ज्वारीचे धाट ९३ ३.७ ७.३
प्रत्यक्ष प्रमाण ड्राय  मॅटर  ड्राय  मॅटर मधील प्रथिने  ड्राय  मॅटरची  पचनीय ऊर्जा
अझोला (१००० ग्राम) १००० ६७ १४ ०.४९
सरकी पेंड ७३ ६७ ३४.३ ०.९६
मिश्र खाद्य ७३ ६७ १२ ०.८०
मुरघास २८५ ६७ २४.२५ २.९९
ज्वारीचे धाट ७२ ६७ २.४८ ०.४९

अझोला हे चाऱ्याचे पर्याय होवू शकत नाही :

कुठल्याही पशुखाद्याची प्रतवारी सर्वात अगोदर त्यातील पौष्टिक घटकांच्या प्रमाणानुसार ठरली पाहिजे. त्यात सर्वात महत्वाचे असते ते शुष्कता मात्रा किंवा ड्राय मॅटर, ज्यावर पौष्टिक घनता अवलंबून असते. ही मात्र जेवढी कमी (म्हणजे पाण्याचे प्रमाण अधिक) तेवढी त्याची ऊर्जा मात्रा कमी. याशिवाय, महत्वाचे म्हणजे प्रथिनांचे प्रमाण, आणि शुष्कता मात्राच्या तुलनेत असलेली पचनीय उर्जा. त्याचप्रमाणे त्याची किंमत व शुष्कता मात्रेनुसार गुंतवणूक मूल्य. याशिवाय, वाढ, लागवड व उत्पादन यांचे प्रमाण याही बाबी विचारात घ्याव्या लागतातच. (असे सांगितले जाते की, २४ चौ. फुटाच्या जागेत अझोलाचे दररोज साधारणपणे  १ किलो उत्पादन होते.)

वरील तक्त्यात दर्शवण्यात आलेले घटक www. Feedipedia.org या नामांकित संकेतस्थळावरून घेण्यात आलेले आहेत. त्यावरून आपण पाहू शकतो, की अखोलाची शुश्स्क्ता मात्रा ६.७ टक्के असून ती इतर सामान्यपणे आपण वापरत असलेल्या सरकीपेंड, ज्वारीचे धाट किंवा मिश्रखाद्य या पशुखाद्य व चाऱ्यापेक्षा खूप कमी आहे. हे उघड आहे, की दररोज मिळणाऱ्या एक किलो अझोलातून फक्त ६७ ग्राम पोषणतत्वे मिळू शकतात. त्याच तुलनेत एक किलो मुरघासाच्या माध्यमातून २३५ ग्राम तत्वे मिळतात. एका गायीसाठी दररोज लागणाऱ्या फक्त निम्म्या मुरघास किंवा चाऱ्याच्या बदल्यात ५० किलो अझोलाचे उत्पादन करावे लागते. ते उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्याला १२०० चौ. फूट एवढी जागा अझोलाच्या लागवडीसाठी वापरावी लागेल. हे अतर्क्य असल्यामुळे चारा किंवा मुरघास यांना पर्याय म्हणून अझोलाचा स्वीकार करणे अव्यापारेषु आहे.

पुरवणी खाद्य म्हणून अझोलाचा उपयोग किती ? :

हा प्रश्न सोडवण्यासाठी वरील तक्त्यात केलेली तुलना तपासता येईल. कुठल्याही खाद्याच्या बाबतीत महत्वाच्या असणाऱ्या शुष्कता मात्रेच्या निकषानुसार इतर खाद्याच्या वेगवेगळ्या प्रमाणातून आणि एक किलो अझोलातून मिळू शकणाऱ्या पोषणतत्वाची तुलना करता येईल. एक किलो अझोलातून मिळणारी किती तत्वे इतर खाद्याच्या वा चाऱ्याच्या केवळ ७२ – ७३ ग्राम एवढ्याच प्रमाणातून मिळू शकतात हे या तक्त्यावरून दिसून येते. एके किलो अझोलातून मिळणारी शुष्कता मात्रा केवळ २८५ ग्राम मुरघासातून मिळते. एक किलो अझोलाद्वारे केवळ १४ ग्राम प्रथिनांची प्राप्ती होते, तर केवळ २८५ ग्राम मुरघासातून २८ ग्राम पेक्षा, म्हणजे दुपटीपेक्षा अधिक प्रथिने मिळू शकतात. यावरून हेही समजू शकते, की प्रथिनांचा स्रोत म्हणूनही अझोला हे फायद्याचे पर्यायी खाद्य होवू शकत नाही.

खाद्यातून मिळणारी पचनीय अथवा प्रक्रियाजन्य ऊर्जा हा एक महत्वाचा निकष असतो. याही निकषावर अझोला सिद्ध होवू शकत नाही. एक किलो अझोद्वारे मिळणारी ऊर्जा, केवळ ७२ ग्राम ज्वारीच्या धाटातून मिळते. केवळ २८५ ग्राम मुरघास, एक किलो अझोलातून मिळणाऱ्या ऊर्जेच्या पाच पटीने अधिक ऊर्जा देते. त्यावरून अझोला हे ऊर्जाजन्य खाद्य म्हणूनही योग्य ठरत नाही.

लागवडीची सोयीस्करता :

महत्वाच्या सर्व मुद्द्यांनंतर प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या दृष्टीने लागवडीच्या सोयीच्या मुद्दा अवश्य लक्षात घेतला पाहिजे.

आजवर झालेल्या संशोधनातून आणि अहवालांतून हे नमूद झाले आहे, की अझोला तापमान आणि आर्द्रता दोन्हींसाठी संवेदनशील आहे. उन्हाळ्यात अति तापमानाने अझोला लालसर, तपकिरी पडते व उत्पादन जवळजवळ निम्म्यावर येते. आपल्या देशातल्या बहुसंख्य भागात तर ३ ते ४ महिने कडक उन्हाळा असतो. त्यामुळे या तीन ते चार महिन्यांत तर अझोलाची लागवड होवू शकत नाही. दर आठवड्याला शेण व सुपर फॉस्फेटचे मिश्रण अझोलाच्या पात्रात टाकावेच लागते. त्यामुळे त्यात मनुष्यबळाचाही अनिवार्य वापर व गरज असते. तीन चार महिन्यांनी माती व पाणी बदलण्याचाही सोपस्कार करावाच लागतो. त्याशिवाय, भूहीन अथवा अल्पभूधारक पशुपालकांना त्यांच्या २-३ गायींसाठी १०० चौ. फुटाची जागा गुंतवून ठेवणे शक्य नाही. अशा परिस्थितीत १२ ते १४ किलो ग्राम गरजेपैकी केवळ काही ग्राम ड्राय मॅटरच पुरवू शकणाऱ्या अझोलाची लागवड परवडणे शक्य शक्य नाही. ते अतर्क्य व अवाजवी आहे.

त्यापेक्षा अझोलाची लागवड केवळ नैसर्गिक पाणवठ्यावर करणे श्रेयस्कर आहे. मोठ्या पाणवठ्यावर भरपूर प्रमाणात सहज व मनुष्यबळाच्या अनिवार्यतेशिवाय उत्पादन होवू शकत असेल, तर अझोलाचा पर्याय अनुसरायला हरकत नाही. हेही लक्षात घेतले पाहिजे की, जिथून अझोलाचे लोण आले आहे, त्या देशांत त्याचे उत्पादन साळीच्या क्षेत्रात आंतरपीक म्हणून घेण्यात आले होते. त्याचीही लाट नंतर कमी झाली.

तात्पर्य – अझोलाच्या पशुखाद्य म्हणून पर्यायाच्या अनेक मर्यादा लक्षात घेता, ते कुठल्याही पशुपालकांसाठी किफायतशीर ठरू शकत नाही. त्यातल्या त्यात फक्त पाणथळीच्या अथवा साळीच्या लागवड क्षेत्रातील शेतकरी त्याचा पर्याय काही प्रमाणात अवश्य अनुसरु शकतात.


डॉ. संतोष कुलकर्णी
पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर