जनावरांचे लसीकरण महत्वाचेच; पण समजून घेवून

लसीकरणाचे महत्त्व 

संसर्गजन्य रोगांपासून जनावरांचे रक्षण करण्यासाठी लसीकरण (Dairy Cattle Vaccination) महत्वाचेच असते. पण ते करताना पशुपालक, पशुवैद्यक (Veterinarians) व त्यांचे सहाय्यकांनी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

लस म्हणजे काय ? लसीचा परिणाम/प्रतिसाद कसा असतो ?

‘लस’ म्हणजे वास्तविकत: विशिष्ट रोगाच्या प्रत्यक्ष जिवाणू किंवा विषाणू अथवा त्यांच्या घटकांचा (काही बाबतीत थेट विषाक्ताचाच) विशिष्ट मात्रेचा वापर केलेले द्रावण असते. एरवी रोगाला कारणीभूत असलेले, लसीमधील हे घटक (प्रतिजैविके) शरिरात त्यांच्याच विरुद्ध प्रतिकार करणार्‍या घटकांची (प्रतिपिंडे) निर्मिती करतात. माफक प्रमाणातील लसीद्वारे शरिरात निर्माण झालेली ही प्रतिपिंडे, जनावरांमध्ये त्या रोगाची प्रतिकारशक्ती निर्माण करतात व अशा जिवाणू किंवा विषाणूंचा प्रादुर्भाव होण्यापासून जनावरांचे रक्षण करतात.

लसीकरणाच्या पहिले मात्रेसाठी सुयोग्य वय –

रवंथ करणार्‍या प्रजातीच्या जनावरांत, प्रतिकारक्षमता निर्माण होण्यास – म्हणजेच रोगांचा प्रतिकार करणारी प्रतिपिंडे त्यांच्या शरिरात तयार होण्यास – भ्रूणावस्थेत साधारणपणे १५० दिवसांत सुरुवात झालेली असते. हे संशोधन भ्रूणावस्थेतील जिवाच्या शरिरात प्रतिजैविकांची लस टोचून शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. मात्र, या जनावरांमध्ये गर्भाभोवती असलेल्या त्रिस्तरीय आवरणामुळे या प्रतिजैविकांचे अथवा प्रतिपिंडांचे मातेच्या रक्ताद्वारे गर्भाच्या रक्तापर्यंत अभिसरण होत नाही. त्याचे एक कारण असेही असते, की ही प्रतिजैविके व प्रतिपिंडे, मोठ्या आकाराच्या प्रथिनांच्या स्वरूपात असल्यामुळे ती या आवरणातून गर्भाच्या रक्ताभिसरण संस्थेपर्यंत पोचू शकत नाहीत. मानवी अथवा इतर प्राण्यांच्या रक्ताभिसरणात मात्र त्यांचा समावेश काही प्रमाणातील लहान आकाराच्या प्रथिनांसह शक्य होतो. त्यामुळे मानवी व इतर प्राण्यांच्या अर्भकांच्या रक्तात मात्र जन्मत:च ही प्रतिपिंडे व त्यांद्वारे प्राप्त झालेली प्रतिकारशक्ती दिसून येते.

रवंथ करणार्‍या प्राण्यांच्या वासरांत मात्र अशी प्रतिपिंडे जन्मत:च असत नाहीत. मातेच्या दुधात (ज्याला ग्रामीण भागात ‘चीक’ असे म्हटले जाते), प्रसूतीनंतर पहिल्या तीन दिवसांत, अशी प्रतिपिंडे मुबलक प्रमाणात असतात. असे दूध, वासरांना जन्म झाल्यानंतर ६ ते १२ तासांच्या आत पुरवले, तर पचनसंस्थेमार्फत ही प्रतिपिंडे वासरांच्या रक्तात समाविष्ट होतात व त्यांचे किमान अनेक आठवड्यांपर्यंत – म्हणजे नैसर्गिकरित्या सक्षम व प्रतिकारक्षम होईपर्यंत – रोगांपासून रक्षण करतात.

अर्थात, अशा जनावारांचे लसीकरणाचे वय, असे प्रतिकारक्षम दूध (किंवा ‘चीक’) योग्य वेळेवर देण्यात आले होते की नाही व त्या दुधात पुरेशा प्रमाणात प्रतिपिंडे होती की नाही, यावर अवलंबून असते. ज्या वासरांना सक्षम असलेले दूध वेळेवर पाजण्यात आलेले असते, अशा वासरांच्या रक्तात अगोदरच प्रतिपिंडे तयार असल्यामुळे, फार सुरुवातीला केलेले लसीकरण अनावश्यक अथवा बाधक ठरते. त्यामुळे अशा वासरांत पहिले लसीकरण साधारणत: सहा महिन्यानंतर केले जाते. मात्र, इतर (‘चीक’ न मिळालेल्या वासरांत) साधारणपणे तीन महिन्यांनी केले पाहिजे.

राष्ट्रीय लसीकरणाची मोहीम यशस्वी करण्यासाठी, या मोहिमेदरम्यान या बाबींचा विचार केला जाणे अत्यावश्यक आहे. यांत नवजात मातेचे असे दूध (‘चीक’) मिळालेल्या व न मिळालेल्या वासरांच्या रक्तातील प्रतिपिंडांच्या मात्रेसह, लसप्राप्त असलेल्या व नसलेल्या गायींच्याही रक्तातील प्रतिपिंडांच्या प्रमाणाची छाननी होणे व त्यावरून लसीकरणाची मात्रा, नियमितता ठरवले जाणे आवश्यक आहे. तरच लसीकरण लाभदायी ठरू शकते.

आजारी जनावराचे लसीकरण करावे का ?

कुठल्याही रोगाने (लससंबंधित अथवा अन्य) आजारी असलेल्या जनावराचे लसीकरण कटाक्षाने टाळले पाहिजे. आजारी जनावराचे लसीकरण केल्याने आजार बळावण्याची शक्यता अधिक असते. एखाद्या प्रक्षेत्रावर एखाद्या रोगाची साथ असताना लसीकरण करण्यासंदर्भात निष्णात पशुवैद्यकाचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

वास्तविकत:, अशा परिस्थितीत, रोगाची अगदी प्राथमिक लक्षणे दर्शवणारी, तसेच ताप असणारी जनावरे वेगळी केली पाहिजेत. त्यांच्यावर अगोदर उपचार केले पाहिजेत. निष्णात पशुवैद्यकाच्या निगराणीने, अशा जनावरांपासून खात्रीने निरोगी व सुदृढ असलेल्या जनावरांना वेगळे करून त्यांचे लसीकरण करण्यास हरकत नाही. मात्र लसीकरण केलेल्या जनावरांना, आजारी जनावरे निरोगी होईपर्यंत वेगळे ठेवले पाहिजेच, शिवाय त्यांची नियमित तपासणी करून त्यांना निरीक्षणात ठेवले पाहिजे. कारण, साथ असताना वरकरणी निरोगी वाटणार्‍या अथवा लक्षणे न दर्शवणार्‍या जनावरांतही रोगाची लागण झालेली असल्याची शक्यता नाकारता येत नसते. कदाचित, काही जनावरांत रोगाची कषणे कालांतराने दिसू शकतात.

रोगाची साथ चालू असलेल्या भागात लसीकरण करावे का?

काही रोगांचा झपाट्याने प्रसार होतो. त्यामुळे, खबरदारी म्हणून रोगाची साथ असलेल्या भागाच्या आजूबाजूच्या सर्व जनावरांचे कटाक्षाने लसीकरण करावे. मात्र, ज्या भागात साथ चालू असेल, त्याभागातील निष्णात, अनुभवी पशुवैद्यकांच्या मार्गदर्शनाने लसीकरण करावे. मात्र, संबंधित रोगाचा प्रादुर्भाव, तसेच प्रसार कोणत्या माध्यमातून होतो आहे – म्हणजे मानवी घटकांपासून झालेला की सजातीय अथवा विजातीय जनावरांच्या, इतर प्राण्यांच्या संसर्गातून होतो आहे, की हवा, पाणी अशा व्यापक घटकापासून होत असतो, याकडे पशुपालकांनी लक्ष ठेवले पाहिजे. किमान निरीक्षणातून आलेली माहिती पुरवली पाहिजे. स्वत:बरोबरच परिसरातील सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने पशुपालकांनीही जागरुक व दक्ष राहिले पाहिजे.

गाभण जनावरांचे लसीकरण करावे का?

हा अतिशय नित्याचा उद्भवणारा व विचारला जाणारा प्रश्न आहे. वास्तविकत: त्याचे उत्तर ‘हो’ असेच आहे; – गाभण जनावरांचेही लसीकरण करता येते; मात्र, त्यासाठी काही काळजी व खबरदारी घेतली गेली पाहिजे. सर्वात महत्वाचे म्हणजे, कोणत्या अवस्थेत गाभण जनावर आहे – म्हणजे, किती महिन्याचा गरोदर काळ झाला आहे, हे पाहणे महत्वाचे आहे. अगदी शेवटच्या टप्प्यात, प्रसूतिनिकट काळात व प्रत्यक्ष प्रसूतिकाळात लसीकरण करू नये. माझा स्वत:चा अनुभव असा आहे की, योग्य काळजी घेतल्यास व विशिष्ट अपवाद (म्हणजे – गर्भपातकारक विशिष्ट रोगजंतू, जिवाणू, विषाणूंच्या प्रादुर्भावाचा) वगळता, अगदी ९ व्या महिन्यापर्यंतदेखील, गायींत केलेले लसीकरण यशस्वी व सुरक्षित ठेरू शकते.

उलटपक्षी, गाभण जनावरांत दुबार केलेले लसीकरण प्रसूतिपश्चात दुधातील चीक (Colostrum) प्रतिपिंडांच्या प्रमाणात वाढ होण्यासाठी लाभकारक ठरू शकते. विशेषत: वासरांतील ‘कोलायबॅसिलोसिस’ या रोगाच्या प्रतिकारक्षमतेच्या दृष्टीने ते अधिक खात्रीशीर ठरते, असेही माझे मत आहे. एकाच रोगाच्या लसीचा पुनर्वापर करण्याला ‘प्रति-लसीकरण’ (‘हायपर-इम्युनायझेशन’) म्हणले जाते. ही पद्धत नवजात दुधाशिवाय (‘चीक’) नंतरही निर्माण होणार्‍या दुधातील प्रतिजैविके व प्रतिपिंडे वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. विशेषत: काही रोगांसाठी कारणीभूत असणार्‍या जिवाणूंविरुद्ध (उदा. : जठरज्वर, आंत्रज्वर व व्रण / अल्सर निर्माण करणारा हायलोबॅक्टर पायलोरी (Helicobacter pylori), व टायफॉइड म्हणजे विषमज्वर घडवणारा साल्मोनेला टायफी) प्रतिकारक्षमतेसाठी या पद्धतीचा वापर खात्रीलायकपणे केला जातो. अशा प्रतिकारक्षमतायुक्त दुधाला (‘चिका’ला) ‘आरोग्यवर्धक दूध’ (किंवा ‘आरोग्यवर्धक ’चीक’) असे म्हणतात व ते विशिष्ट रोगांत पूरक आहार म्हणूनही वापरले जाते.

लसीकरण आणि प्रतिजैविके / प्रतिपिंडे यांचा वापर एकाच वेळी केला जातो का ?

लसीकरणासोबत प्रतिजैविक औषधे व प्रतिजैविके देण्यास हरकत नसते. मात्र, प्रतिपिंडे (अ‍ॅन्टिबॉडीज) लसीकरणासोबत देवू नयेत. अन्यथा, अगोदर तयार झालेल्या प्रतिपिंडांचे उदासिनीकरण होवून प्रतिकारशक्ती खालावण्याची शक्यता असते.

एकाच वेळी अनेक लसी देवू शकतो का?

तत्वत: एकाच वेळी अनेक रोगांच्या लसी देणे टाळले पाहिजे. एकाच वेळी अनेक लसी देण्याने वेगवेगळ्या रोगांचा प्रतिकार करणार्‍या प्रतिपिंडांच्या निर्मितीवर परिणाम होतो. जनावराचा अशा विविध लसींना मिळणारा प्रतिसाद कमकुवत होतो.

तथापि, एखाद्या लसीत, अनेक रोगांच्या समधर्मी जिवाणूंचे मिश्रण असल्यास अशी मुळातच मिश्र असलेली लस देण्यास हरकत नाही.


डॉ. संतोष कुलकर्णी

पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर