जनावरांतील स्तनदाह रोगाची माहिती अत्यावश्यक

जनावरात होणारा स्तनदाह, यास ‘कासेचा रोग’ असेही म्हणतात. या रोगाची लागण झाल्यास जनावरांची कास कडक होते म्हणून त्याला ‘दगडी रोग’ असेही म्हणतात. प्रामुख्याने हा रोग अधिकतम दूध देणाऱ्या जनावरांमध्ये जास्त प्रमाणात होतो (Mastitis in Dairy Cows). तसा स्तनदाह हा रोग कोणत्याही प्राण्यात केव्हाही होऊ शकतो. परंतू व्याल्यावर व विण्यापूर्वी १५ दिवस अगोदर हा रोग जास्त प्रमाणामध्ये होतो.

स्तनदाहाची कारणे 

स्तनदाह हा रोग जीवाणूजन्य असून, स्ट्रेपटोकोकस स्टेफायलोकोकाय, इस्चरीया कोलाय या जीवाणूंमुळे होतो.

 रोगप्रसार कोणत्या कारणांमुळे होतो ?

हा रोग स्वच्छते अभावी पसरतो जसे गोठ्यातील अस्वच्छता, सडांना होणारा संसर्ग, दूध काढणाऱ्या व्यक्तीचे हात, कास
धुण्यासाठी वापरात आणलेले पाणी यांमुळे हा रोग होण्याची शक्यता असते.

स्तनदाहाची लक्षणे 

  1. या आजारामुळे बाधीत जनावरांची कास घट्ट होते
  2. दुधातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण वाढते
  3. दुधाचा रंग जास्त गर्द पांढरा होतो किंवा दुधाचा रंग पिवळसर किंवा लालसर होतो
  4. दुधाच्या गाठी तयार होतात
  5. जनावरांची कास हि दगडासारखी कडक होते, त्यामुळे जनावरास वेदना होतात
  6. वेदना होत असल्यामुळे जनावर कासेला हात लावू देत नाही
  7. कास गरम लागते
  8. जनावराला ताप येतो
  9. जनावर चारा व पाणी कमी प्रमाणात सेवन करतात
  10. कासेला गाठी तयार झाल्यास दूध येणे बंद होते
  11. त्यानंतर सडातून फक्त पाणी येते

प्रतिबंधात्मक उपाय (mastitis in dairy cows treatment)

  1. दूध काढतांना जनावर स्वच्छ जागी बांधावे
  2. दूध काढणारा व्यक्ती निरोगी असावा व त्याचे हात स्वच्छ असावेत
  3. धार काढण्यापूर्वी जनावरांची कास डेटोल, सेवलोन, पोटेशियम परमेग्नेट १% द्रावणाने स्वच्छ धुवून घ्यावीत
  4. जनावरांच्या कासेवर थोडी जरी सूज निदर्शनास आल्यास ताबडतोब पशूवैद्यकियांकडून आजाराचे निदाण करून घ्यावे
  5. कासेवर किंवा सडावर कोणत्याही प्रकारच्या जखमा होऊ देऊ नयेत
  6. दररोज जनावरांच्या ठरवलेल्या वेळांतच दूध काढावे
  7. शक्य असेल तर चारही सडाच्या केलिफोर्निया मस्टायसीस टेस्ट अधून मधून करून घ्यावी
  8. दूध पूर्णपणे सडातून काढावे, अर्धवट काढू नये
  9. जनावर दुधातून आटविताना प्रत्येक सडात प्रतिजैविकाचे औषधे सोडावीत
  10. संपूर्ण दूध काढल्यानंतर त्या जनावरास खाण्यासाठी चारा, वैरण, खाद्य द्यावे. त्यामुळे जनावर खाली बसत नाही व सडांचे छिद्र बंद होण्यास लागणारा वेळ जनावर उभे असतांनाच निघून जातो

स्तनदाह झाल्यानंतर घ्यावयाची काळजी :

  1. अशा जनावरांचे दूध सर्वात शेवटी काढावे
  2. ज्या सडाला रोग झाला असेल त्यातील दूध पूर्णपणे पिळून घ्यावे
  3. .असे दूषित दूध गोठ्यात न टाकता बाहेर दूर अंतरावर जाऊन जमिनीत टाकावे
  4. कास व सड पोटेशियम परमेग्नेटच्या द्रावणाने स्वच्छ धुवून घ्यावीत
  5. पशुवैद्यकियांच्या सल्य्याने दिलेले मलम सडांमध्ये सोडावे व कासेला मालीश करून औषध आतमध्ये पसरेल, याची काळजी घ्यावी
  6. जनावरांस प्रतीजैविकांची औषधे मानेतून किंवा शिरेतून पशुवैद्यकियांमार्फत द्यावी
  7. त्यासमवेत वेदना-शामक औषधी इंजेक्शन द्यावे
  8. जनावर पूर्णपणे आजारातून मुक्त झाल्याची खात्री करून त्याला इतर जनावरांच्या गोठ्यात बांधावे

वर दिलेल्याप्रमाणे जर आवश्यक ती काळजी घेतली तर स्तनदाह रोगाचा संभाव्य धोका टाळता येऊ शकतो.

Read: जनावरांतील लंगडणे – कारणे व प्रथमोपचार


श्री. अजय गवळी

लेखक पशुसंवर्धन तज्ञ असून बर्ग अँड स्मिथ इंडिया प्रा. ली. पुणे
येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत
मोबाइल नंबर: ८००७४४१७०२