कमी खर्चाचा मुक्तसंचार गोठा

मुक्तसंचार गोठा (Cow Housing)

कमी खर्चाचा मुक्तसंचार गोठा (Cow Housing) निर्मिती करताना कमी खर्चात अधिक सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न केलेला असतो. यामध्ये त्या कितीवेळ टिकतील याचा थोडा कमी विचार केलेला असतो कारण कमी भांडवलात आपणास बऱ्याच गोष्टींचे नियोजन करावयाचे असते त्यामुळे ज्या गोष्टीमध्ये  आपण खर्च करू शकत नाही अश्या गोष्टीसाठी आपणास तडजोड करता येत नाही त्यासाठी आपण जास्त खर्च करणे आवश्यक आहे. गोठ्याचे नियोजन करत असताना आपणास गाईसाठी खर्चात काटकसर करता येणार नाही कारण चांगल्या गुणवत्तेच्या गाईसाठी आपणास जास्त किंमत द्यावीच लागेल त्याचप्रमाणे आपण गोठा बांधकामाचे नियोजन करत असू तर अश्या वेळेस आपण लोखंडी वस्तू वापरण्यापेक्षा बांबू व लाकडांचा वापर करून तसेच शेडसाठी पत्रा वापरण्यापेक्षा गवताचे छत करून तसेच खाली भूपृष्ट्भागासाठी  कोण्क्रीट करण्यापेक्षा सुरुवातीस काही दिवस आपण मुरूम टाकून पक्का भूपृष्ठ्भाग करून कमी खर्चात परंतु सोयीसुविधा उपलब्ध करण्यास  तडजोड न करता आपण आपला दुग्धोत्पादनाचा व्यवसाय चालू करून आपेक्षित ध्येय गाठू शकतो व एकदा आपली या व्यवसायात चांगली पकड बसली, सर्व गोष्टी व्यवस्थितपणे होऊ लागल्या कि आपण कायमस्वरूपी बांधकाम व आराखडा करून आपली या दुग्धोत्पादनाच्या व्यवसायात यशस्वी वाटचाल करू शकतो. आज एखाद्यास  जर दुग्धोत्पादनाचा व्यवसाय करावयाचा असेल त्यांच्याकडे जे काही भांडवल आहे ते पहिले ते महागडा गोठा बांधकामात जास्तीत जास्त खर्च करतात व महत्वाचे कामासाठीच त्यांना पैशाची अडचण निर्माण होते व मग यामध्ये तडजोड केल्याने आपण गोठयासाठी  चांगले खर्चिक नियोजन करूनही आपणास जास्त दुध उत्पादन मिळत नाही व त्यामुळे या व्यवसायास नाव ठेवण्याची वेळ येते कि आता  यात काय परवडत नाही त्यामुळे हा धंदा काय कोणी करू नये.

जनावरासही कमी खर्चाची व नैसर्गिकरीत्या असलेली रचना फार आवडते व त्यात ते जास्त उत्पादन देतात. कमी खर्चाचा मुक्तसंचार गोठा (Cow Housing) करण्यासठी आपणास वरीलप्रमाणे निवारा ज्यामुळे ऊन, वारा व पाउस यापासून जनावराचे संरक्षण होईल. दुसरे म्हणजे कायमस्वरूपी पिण्यास पाण्याची उपलब्धता आपणास या गोठ्यात करता आली पाहिजे व तिसरे म्हणजे जनावरांना चारा खाण्यासाठी गव्हाण आवश्यक आहे कि ज्यामुळे जनावरांना चारा व्यवस्थित खाता येईल व वाया जाणार नाही. या सर्व गोष्टींची सेवासुविधा आपण पुरवल्यास आपण व्यवस्थितपणे जनावरांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करणारा गोठा केला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

कसा कराल गोठा (Cow Housing) ?

आता १० गाईंचा मुक्तसंचार गोठा आपणास या पद्धतीने करण्यास किती खर्च येईल ते आपण पाहू.

निवारा

यासाठी आपण झाडाची मदत घेणार असल्याने आपणास निवार्यासाठी जास्त खर्च करण्याची गरज नाही

  1. १० जनावरांसाठी ५० फुट लांब व १० फुट रुंद असे शेड करण्यासाठी आपणास सर्वसाधारणपणे या भागाचा भौगोलिकदृष्ट्या विचार करून त्यांची उंची ठरवावी लागेल. तसेच स्वच्छ सूर्यप्रकाश गोठ्यात सर्वदूर पसरण्यासाठी गोठ्याची दिशा ही जास्तीत जास्त दक्षिणोत्तर अशी ठेवावी. तसेच या भागातील वाऱ्याचा व तपमानाचा विचार करून गोठ्याची उंची ठरवावी. जास्त तपमान असणाऱ्या भागात हवेचा निचरा चांगल्याप्रकारे होऊन हवा खेळती राहून तपमान कमीत कमी रहावे यासाठी अश्या शेडची उंची सर्वसाधारण शेडच्या उंची पेक्षा काही प्रमाणात जास्त ठेवावी. या उलट डोंगराळ भाग व ज्याठिकाणी वाऱ्याचे प्रमाण जास्त असते अश्या ठिकाणी गोठ्याच्या शेडची उंची आपणास कमी ठेवली तरी चालते. तर आपल्या भागाचे पर्जन्यमान , तपमान व वारा यांचा सखोल अभ्यास करून  आपण आपल्या गोठ्याचा आराखडा तयार करू शकतो.
  2. आता सर्वसाधारण पर्जन्यमान व सर्वसाधारण पेक्षा जास्त तपमान असलेल्या भागासाठी म्हणजे फलटण सारख्या भागात आपण कमी खर्चात १० गाईंचा गोठा कसा करावयाचा याचा आपण विचार करू. यासाठी आपणास सर्वसाधारणपणे पाठीमागील म्हणजे शेपटाकडील उंची आपण घेऊ ६ फुट उंच व तोंडाकडील उंच भागाची उंची आपण घेऊ ८ फुट. यासाठी आपणास ८ फुटावर एक लाकडी डांब उभा करावा लागेल. असा विचार जर आपण केला तर आपणास मागील बाजूचे ६ डांब हे ७.५ ते ८ फुटाच्या लांबीचे लागतील तर पुढील डांब हे आपणास ९.५ ते १० फुट लांबीचे लागतील. असे १२ डांब आपणास लागतील. त्यानंतर उभे सह डांब टाकून त्यावर आडवे टाकण्यासाठी तीन ओळीसाठी आपणास ५० फुट लांब अशी १५० फुट लांबीची लाकडे लागतील. तसेच सहा उभे सहा डांब ही लाकडे मुख्य डांबापेक्षा जरा कमी क्षमतेची असली तरी चालतील. अश्या आराखड्यावर आपण गवताचे अच्छादन करू शकतो किंवा पत्राही वापरू शकतो. अश्या प्रकारचे शेड हे नैसर्गिक म्हणजे इको-फ्रेंडली असतात. या शेडमध्ये आपणास सहा महिन्याने किंवा वर्षाने आपणास थोडीफार देखभालीला लोखंडी आराखड्यापेक्षा जात वेळ द्यावा लागतो. अशी शेड जास्त तपमान असणाऱ्या भागात जर असली तर जनावरांना जास्त मानवतात. यामध्ये सूर्याची उष्णता ही खाली गोठ्यात कमी प्रमाणात येते. गवत हे उष्णता रोधक म्हणून काम करते. परंतु शेतकऱ्यांना वारंवार जास्त देखभाल करावी लागत असलेने एकदाच चांगले करू या भावनेने ते पत्र्याचा पक्का गोठा तयार करतात परंतु नंतर जनावरांच्या आजाराची देखभाल जास्त करावी लागते. सर्वसाधारणपणे २ ते ४ वर्षांनी आपणास या गवताचे अच्छादन बदलून पुन्हा नवे टाकावे लागते. हे शेड जरी फायदेशीर असले तरी बहुतांश शेतकऱ्यांना ही छप्पर बदलण्याची कटकट नको असते.

आपणास गोठ्याचा पृष्ठभाग चांगला ठेवणे आवश्यक आहे. अश्या कमी खर्चाच्या लाकडी आराखडा असणाऱ्या गोठ्यात आपण कमिं खर्चात मुरमाचा चांगला पृष्ठभाग तयार केरू शकतो. यासाठी चांगल्या गुणवत्तेचा मुरूमाचा थर टाकून त्यावर पाणी टाकून रोलरच्या सहाय्याने किंवा हाताने चोपण्याचा वापर करून हा मुरूम व्यवस्थितपणे बसविला जातो. यावर शेणाचे द्रावण करून टाकल्यास मुरुमात ज्या ठिकाणी भेगा असतील अश्या ठिकाणी हे शेणाचे कण जाऊन बसतात व पृष्ठभाग अगदी घट्ट बनवितात. अश्या प्रकारच्या पृष्ठभागास आपण सर्वसाधारणपणे थोडा जास्त उतार दिल्यास पाण्यचा निचरा व्यवस्थितपणे होईल व पृष्ठभाग लवकर खराब होणार नाही. मुक्तसंचार गोठ्यात जर बाहेरच्या बाजूस जर झाडे असतील तर जनावरे जास्तीत जास्त बाहेरच झाडाच्या सावलीत राहणे पसंत करतात. व यामुळे अश्या शेड मधील पृष्ठभागावर जास्त प्रभार पडत नाही. जर अश्या मुक्तसंचार गोठ्यात जर झाडे नसतील तर जनावरे सावलीसाठी जास्तीत जास्त या शेड मध्येच राहिल्याने ते शेडमध्येच जास्त प्रमाणात मलमूत्र विसर्जन करतात व कधी कधी अश्या भागात खड्डा पडण्याची शक्यता जास्त असते. अश्या वेळेस या खड्यांची देखभाल जर आपण चांगल्या पद्धतीने घेतली तर आपणास या गोठा पद्धतीपासून चांगला यायदा होत.

परंतु नवीन पशुपालकानी कमी खर्चाची परंतु जनावरास फायदेशीर अशी ही लाकूड व छप्पर वापरून केलेली गोठा पद्धतीचा अवलंब केल्यास कमी खर्चात अधिक चांगल्या दर्जाचे दुध आपणास तयार करता येईल त्याच बरोबर तपमान आल्हाददायक राखल्यामुळे जनावरांना त्यांची कमी आहारात जास्त उत्पादन देण्याची क्षमता दाखवता येईल हे फार महत्वाचे आहे.   

अंदाजे १० जनावरांच्या लाकडी शेडचा खर्च
अ. नं. तपशील नग दर रक्कम
८ फुटी डांब  200  1200
१० फुटी डांब  240  1440
१२ फुटी उभे डांब  300  1800
५० फुट आडवे डांब    200  600
लहान लाकूड गरजेप्रमाणे      500
गवत  गरजेप्रमाणे      1000
मजुरी      2000
एकूण      8540

कुंपण :

अंदाजे १३० फुट लाकडी व लोखंडी जाळी वापरून कुंपण करण्यासाठी येणारा खर्च
अ.नं. तपशील नग दर रक्कम
६ फुटी लांबीचे डांब २०  150 3000
२० फुट लांबीचे बांबू २१ 100  2000
मजुरी      2000
एकूण      7000

सर्वसाधारणपणे पहिला आडवा बांबू  लावताना आपणास जमिनीपासून २.५ फुट व त्यानंतरचा दुसरी व शेवटची बांबूची ओळ सर्वसाधारणपणे जमिनीपासून ४ फुटाच्या  अंतरावर लावावी. आपण जर आपणास किती बांबू लागतील याचा विचार केला तर आपणास दोन ओळी करावयाच्या आहेत आणि एका ओळीसाठी सर्वसाधारणपणे २०० फुट बांबू लागेल म्हणजे एक बांबू जर २० फुट असला तर असे आपणास एका ओळीसाठी सर्वसाधारणपणे १० बांबू लागतील व दुसऱ्या ओळीसाठीही १० बांबू लागतील असे सर्व आडव्या ओळींसाठी जे बांबू लागतील त्यांची २० फुटाचे २० नग लागतील. आता ३-४ बांबूपासून आपण बाबूंचा लाकडी दरवाजा करू शकतो. अश्या पद्धतीने आपणास  पूर्ण कुंपण करण्यास २५ डांब व २२ बांबू लागतील. अश्या पद्धतीने कमी खर्चात आपण मुक्तसंचार गोठ्याचे कुंपण करू शकता. जर आपली जनावरे जास्त दंगा करणारी असतील तर आपण आडव्या बांबूची संख्या वाढवून आपणास ४ ओळी कराव्या लागतील. यासाठी आपणास ४० फुटी बांबू लागतील. पहिली ओळ ही १.५ फुटावर घेऊन त्यानंतरची दुसरी ओळ ही जमिनीपासून २.५ फुटावर व तिसरी जमिनीपासून सर्वसाधारणपणे ३.५ फुटावर व शेवटची चौथी ओळ जमिनीपासून ४.५ फुटावर लावता येईल. यामुळे एक चांगल्याप्रकारचे कुंपण होईल. जर देशी जनावर असतील त्यातल्या त्यात खिलार जातीची जनावरे असतील तर आपणास ४ ऐवजी ६ आडव्या बांबूच्या ओळी कराव्या लागतात. अश्या पद्धतीने कुंपण केल्यास जनावरांना त्यातून बाहेर पडणे शक्य होत नाही. म्हणजे अश्याप्रकारे आपण जनावरांच्या क्षमतेप्रमाणे कमिं किंवा जास्त बांबू वापरून कुंपण करून आपला कमी खर्चातील परंतु भक्कम मुक्तसंचार गोठा करून आपला दुग्धोत्पादनाचा व्यवसाय फायदेशीर करू शकतो.


गव्हाण
 :

कमी खर्चात गव्हाण करण्यासाठी काही शेतकरी लाकडाचा वापर करतात तर काही शेतकरी बारदानाच्या पोत्याचा वापर करून गव्हाण करतात. १० गाईना सर्वसाधारणपणे ४० फुट लांबीची गव्हाण आवश्यक आहे. अशी बारदानाच्या पोत्याची ४० फुट गव्हाण करण्यासाठी आपणास जुनी १० ते १२ पोती लागतील एका पोत्याचा खर्च सर्वसाधारणपणे रुपये ४० असल्यास आपणास एकूण रुपये ४०० ची बारदानाची पोती लागतील. अशी गव्हाण करताना आपणास ४० फुटाची दोन लाकडे लागतील व या लाकडांना जमिनीपासून २.५ ते ३ फुटावर ठेवण्यासाठी त्यांना प्रत्येक ५ फुटावर आधार देण्यासाठी ४ फुटाची १६ लाकडे लागतील या सर्वांचा जर आपण खर्च पाहिला तर तो रुपये 2०० एवढा येईल. म्हणजे आपणास १० जनावरांसाठी ४० फुटाची बारदानाची गव्हाण करण्यासाठी आपणास सर्वसाधारणपणे रुपये  ८००  एवढा खर्च येईल.

ग्रुमिंग ब्रश

वरीलप्रमाणे कमी खर्चातही आपण अश्या प्रकारे आपण ग्रुमिंग ब्रश याही गोठयासाठी आपण करू शकतो.  एक ६ ते ८ इंच जाड लाकडी ८ फुट डांब घेऊन तो गोठयाच्या मध्ये रिकाम्या जागेत घट्ट बसवावा व त्याला मधोमध काथ्या गुंडाळावा. अश्या प्रकारे कमी खर्चात ब्रश तयार होईल. त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्या गाईना होऊन आपले दुध उत्पादन व जनावराचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. यामध्ये डांब  रुपये २०० व काथ्या रुपये ५० असा रुपये २५० खर्च येतो.

जलव्यवस्थापन 

जनावरांना त्याच्या मनाप्रमाणे पाहिजे त्यावेळेस आपणास पाणी देता आले पाहिजे. यासाठी एक ३०० लिटर क्षमतेची सिमेंटची गोलाकर टाकी किंवा  वापरू शकता कि जिची किंमत सर्वसाधारणपणे रुपये ६०० च्या आसपास आहे. सिमेंटची टाकी वापरल्याने त्यातील थोडेफार पाणी त्या सिमेंटच्या टाकीतून झिरपते व त्यामुळे बाहेर आलेल्या पाण्यचे बाष्पीभवन होण्यासठी आतील पाण्याची उर्जा वापरल्याने भर उन्हात टाकी ठेऊन सुद्धा त्यातील पाणी थंड राहते व जनावर असे थंड पाणी पिण्यासाठी पसंद करतात. अश्या प्रकारची एक टाकी जरी १० जनावरांसाठी जरी ठेवली तरी पुरेशी होते. कारण या टाकिला पाईपलाईनच्या सहाय्याने  मुख्य टाकीला जर आपण जोडले व त्यास पाणी नियंत्रण करण्यासाठी प्लास्टिकचा बॉल बसविला तर आपणास वारंवार टाकी भरावी लागणार नाही. जसे कसे पाणी संपेल तसे तसे पाणी या नियंत्रकाच्या सहाय्याने त्या छोट्या ३०० लिटरच्या टाकीत सोडले जाते.

आता वरीलप्रमाणे सर्व खर्चाचा विचार केला तर आपणास कमी खर्चात 10 गाईंच्या मुक्तसंचार गोठ्याची निर्मिती करण्यासाठी निवारा रुपये 8540 , कुंपणासाठी रुपये 7000, तसेच ग्रुमिंग ब्रश साठी रुपये २५० खर्च येतो , पाण्याची व्यवस्था करण्यासाठी रुपये  600 व चारा खाण्यासाठी गव्हानीचा खर्च रुपये 800 येईल वरील सर्व खर्चाचा विचार केला तर आपणास असा गोठा तयार करण्यासाठी एकंदरीत सर्वसाधारणपणे रुपये १७१९०  एवढा खर्च येईल.

(संपर्क व्यक्ति : हिरालाल सस्ते, निंबळक, ता. फलटण, जि. सातारा, महाराष्ट्र, फोन. ९८८१४८७२७५ )


लेखक: डॉ. शांताराम गायकवाड
सहाय्यक महाव्यवस्थापक
दुग्धव्यवसाय विकास विभाग
गोविंद दुध, फलटण, जि. सातारा