गायींसाठी प्रथिनांचा आहार पुरवठा

संयुक्त जठररचनेत होणारे प्रथिनांचे पचन

गायवर्गीय प्राण्यांच्या पचनसंस्थेत त्यांच्या आहारास साजेशी रचना असते. त्यांच्या आहारात प्रथिनांचे वेगवेगळे स्रोत असतात. या पचनसंस्थेत विशेषत: दोन प्रकारच्या प्रक्रियांद्वारे प्रथिनांचे पचन होत असते. काही प्रथिनांचे अंशत: विघटन कोठीपोटातील सूक्ष्मजीवांच्या साह्याने शक्य होते व त्यांचे उर्वरित पचन साध्या पोटात व आतड्यांत पूर्ण होते. कोठीपोटातील सूक्ष्मजीव काही प्रथिनांचे अमोनियात रुपांतर करतात. या अमोनियातील नत्रापासून काही सूक्ष्मजीव पुन्हा नवी, विशिष्ट प्रथिने तयार करतात. खाद्यातील प्रथिनांपेक्षा कोठीपोटात तयार झालेली सूक्ष्मजीवजन्य प्रथिने अधिक पचनशील व अधिक ऊर्जा देणारी असतात.

इतर प्रथिनांचे, सूक्ष्मजीवजन्य प्रथिनांसह कोठीपोटातील या प्रक्रियेऐवजी थेट साध्या पोटात व आतड्यांत विविध (पेप्सिन, ट्रिप्सिन, कायमोट्रिप्सिन) अशा विकरांच्या साह्याने विघटन केले जाते. गायीला चयापचय, हिमोग्लोबिन (रक्तातील लोहसंबद्ध वर्णप्रथिन), मांसपेशीतील (अ‍ॅक्टिन, मायोसिन इ.) च्या प्रथिनवर्ग घटकांच्या संश्लेषणासाठी (नव्याने तयार करण्यासाठी) गायींसाठी प्रथिनांचा आहार पुरवठ्याची गरज असते (Feeding protein to cows).

याशिवाय, अनेक परिस्थितींत ही गरज वेगवेगळीही असू शकते. उदा. – ‘केसिन’ हा प्रथिनघटक दुधात खूप मह्त्वाचा असतो. त्यामुळे अधिक दूध देणार्‍या गायींच्या आहारात साहजिकच या प्रथिनाच्या निर्मितीसाठी लागणार्‍या घटकांचा  विशेषत: ठराविक अमिनो आम्लांचा पुरवठा होणे आवश्यक आहे (Feeding protein to cows). एरवीही अधिक दूध देणार्‍या गायींच्या आहाराचे नियोजन विशेषत: प्रथिनयुक्त आहाराचे काटेकोरपणेच करावे लागते. कमी दूध देणार्‍या गायी त्यांना आवश्यक असलेल्या प्रथिनांची निर्मिती अप्रथियुक्त घट्कांपासून करू शकतात, त्यामुळे गायींसाठी प्रथिनांचा आहार अधिक पुरवठा करण्याची गरज भासत नाही. उलटपक्षी अवाजवी प्रथिनयुक्त आहारामुळे अमोनिया क युरियाचे प्रमाण वाढून विषाक्तता होण्याची शक्यता असते.

अनिवार्य अमिनो आम्ले

प्रथिनाच्या संघटनासाठी किंवा संश्लेषणासाठी अमिनो आम्लांची गरज असते व साधारणपणे २० अमिनो आम्लांच्या विविध सूत्रांच्या साह्याने वेगवेगळ्या प्रथिनांची निर्मिती होत असते. ही सर्व अमिनो आम्ले नैसर्गिकरित्या उपलब्ध असली, तरी त्यापैकी दहा अमिनो आम्ले अशी असतात, जी गायींच्या शरिरात निर्माण होवू शकता नाहीत. अर्थातचति त्यामुळे आहारातून पुरवावी लागतात. अशा ज्या अमिनो आम्लांचा आहाराद्वारे पुरवठा करणे आवश्यक असते, त्या अमिनो आम्लांना ‘अनिवार्यआम्ले’ असे म्हणले जाते. (मिथिओनिन, लाय्सिन, फेनिलअलेनाइन, व्हॅलिन, थ्रिओनिन, ट्रिप्टोफॅन, आयसोल्युसिन, हिस्टिडिन, अर्जिनिन आणि ल्यूसिन ही अनिवार्य अमिनो आम्ले समजली जातात.) त्यापैकी मिथिओनिन आणि लायसिन ही अत्यंत महत्वाची मानली जातात कारण त्यांच्या उपलब्धतेवर इतर अमिनो आम्लांच्या चयापचयाचे व निर्मितीचे प्रमाण अवलंबून असते.

(आकृतीत गायींच्या शरिरात प्रथिनांच्या विघटनाची प्रक्रिया कशी होते, हे दर्शवण्यात आले आहे.)

गायींसाठी प्रथिनांचा आहार

वर वर्णन केल्याप्रमाणे दोन्ही प्रकारची – म्हणजे, कोठीपोटात अंशत: विघटन होणारी प्रथिने आणि ज्यांचे पचन कोठीपोटात होण्याऐवजी थेट साध्या प्रकारच्या पोटात व्हावे लागते, अशी – प्रथिने आहारातून द्यावी लागतात. त्यात मिथिओनिन आणि लायसिन या अमिनोआम्लांचे प्रमाण आधिक्याने असणे आवश्यक असते. पशुआहारशास्त्रज्ञांच्या दृष्टीने हे एक आव्हानच असते. कारण या घटकांचा समावेश केल्यानंतर प्रथिनांच्या प्रमाणासह खाद्याची किंमतही वाढते. त्यामुळे आहारात / खाद्यात प्रथिनाचे प्रमाण जेमतेम १४ ते १६ टक्के राखून त्यात इतर पोषक व अशा कृत्रिम अमिनो आम्लांचा अंतर्भाव करणे योग्य ठरते. (खालील तक्त्यात मिथिओनिन व लायसिन असलेल्या काही आहारघटकाचा व स्त्रोतांचा उल्लेख केला आहे.)

प्रथिनांशाचे टक्केवारी प्रमाण

अन्नघटक  लायसिन मिथिओनिन
अल्फाल्फा मुरघास ४.४ १.४
मका मुरघास २.५ १.५
चारा मुरघास ३.३ १.२
बाजरी ३.६ १.७
मका २.८ २.१
गहू २.८ १.६
मद्यार्क धान्य ४.१ १.७
करडई खाद्य ५.६ १.९
गोड मका खाद्य २.२ १.८
मका व गव्हाच्या चिकाचे मिश्रण खाद्य १.७ २.४
सरकी खाद्य ४.१ १.६
सॉयबीन खाद्य ६.३ १.४
सूर्यफूल खाद्य ३.६ २.३
रुधिर आहार ९.० १.२
मत्स्य आहार ७.७ २.८

आहारातून अमिनो आम्लांचा पुरवठा करताना तो अशा पद्धतीने करावा लागतो, की कोठीपोटात त्यांचे विघटन होणार नाही. कोठीपोटातील प्रक्रियांपासून सुरक्षित मिथिओनिन आणि लायसिन अमिनोआम्ले पूरक खाद्ये म्हणून बाजारात मिळू शकतात. (Kemin Industries South Asia Pvt Lt).

तथापि, ज्याप्रमाणे प्रथिनांच्या अवाजवी वापरामुळे अमोनिया व युरियाच्या प्रमानात अनावश्यक वाढ होवून त्याचे दुष्परिणाम होवू शकतात, त्याचप्रमाणे अशा सुरक्षित व कृत्रिम अमिनोआम्लांच्याही अतिवापरामुळे ते होवू शकतात. शिवाय, युरियाच्या मूत्र उत्सर्जनाला लागणार्‍या ऊर्जेमुळेही ताण वाढू शकतो.

त्याचप्रमाणे आहारातून कमी किंवा माफक प्रथिने पुरवल्यास त्याचे मूल्यही घटते आणि जनावारांच्या एकंदर क्षमताही शाबूत राहतात किंवा वृद्धिंगत होतात. तक्ता क्र. २ वरून आपणास साधारणत: नेहमीच्या खाद्यात असलेल्या मिथिओनिन आणि लायसिन यांच्या प्रमानाची कल्पना येवू शकेल. त्यावरून हेही लक्षात येईल की, प्राणिजन्य पदार्थांतून ही अमिनोआम्ले अधिक प्रमाणात उपलब्ध होतात. मात्र, अनेक देशांत मेंदूज्वरासारख्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर प्राणिजन्य अन्नस्रोतांवर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे जनावरांना सुरक्षित आणि खात्रीलायक प्रथिनांचा स्रोत पुरवण्यासाठी सुरक्षित मिथिओनिन आणि लायसिन देण्याचाच एकमेव किफायतशीर पर्याय आहे.

आहारप्रथिने देण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना

साधारण कमी दूध देणार्‍या गायींसाठी १४ टक्के प्रथिन असलेले, साधारण ऊर्जांक असलेले खाद्य पुरवले जावे. अधिक दूध देणार्‍या गायींसाठी १४ ते १६ टक्के प्रथिनाच्या प्रमाणाशिवाय सुरक्षित मिथिओनिन आणि लायसिनचे अतिरिक्त पूरक खाद्य द्यावे. मात्र, आहारातील इतर नैसर्गिक अमिनोआम्लांच्या प्रमाणाचीही शहानिशा करून घेतली जावी.

साधारणपणे कोठीपोटात विघटन / पचन होणार्‍या प्रथिनांचे प्रमाण ५१ टक्के, तर कोठीपोटातील प्रक्रियेची गरज नसणार्‍या प्रथिनांचे ४९ टक्के असावे असे संकेत आहेत. तथापि, काही परिस्थितीत हे प्रमाण ६७ : ३३ पर्यंतही योग्य असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्याचप्रमाणे कोठीपोटातील प्रक्रियेने विघटन होवू शकणारे प्रथिनयुक्त घटक हे किफायतशीर (स्वस्त) असल्यामुळे, प्रथिनांचा आहारातून पुरवठा करताना आर्थिक घटकांचाही विचार केला जावा.


डॉ. संतोष कुलकर्णी

पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर