तापमानवाढीचे परिणाम — लेखांक १

तापमानातील वाढीचे पशुपक्षी व प्राणी यांच्यावरील परिणाम

शरिरातील उष्णता एका विशिष्ट प्रमाणात असल्यामुळे ते शरीराचे सामान्य तापमान समजण्यात येते. या तापमानात शरिरातील पेशी, विविध अवयव सामान्यपणे आणि योग्य पद्धतीने कार्य करू शकतात. शरिरातील तापमानाच्या वाढीमुळे चयापचय (ऊर्जानियमन करणाऱ्या प्रक्रियांची साखळी) वाढते. त्यामुळे शरिराचे तापमान वाढते आणि पुन्हा तापमानामुळे उष्णता वाढते. असे हे चक्र चालू असते.

शरिराबाहेरील वातावरणाच्या तापमानानुसारही हे बदल घडत असतात. वाढणारे तापमान ज्याप्रमाणे चयापचयावर परिणाम करते, तो परिणाम टाळण्याची उत्तम क्षमता (मानव व) उच्चवर्गीय प्राण्यांची, जनावरांची असते. जेवढा प्राणी लहान तेवढी त्याची तापमानाची मर्यादा राखण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे लहान प्राण्यांच्या शरीराचे साधारण तापमान अधिक असते.

वातावरणाचे तापमान वाढले, कि शरिराचे तापमान राखण्यासाठी करावयाचे बदल, शरिरात ताण निर्माण न करता केले जावू शकतात; असे वातावरणाचे तापमान म्हणजे ही औष्णिकोदासीन मर्यादा (Thermoneutral ZoneTemperature range within which an animal maintains its normal body temperature and metabolism). जोवर कुठलाही जीव या मर्यादेत असतो, तोवर त्याचे शरीर स्वस्थ असते. शरिराचे तापमान राखण्यासाठी जनावरांना आपल्या राखीव उर्जेचा विनियोग करावा लागत नाही. अशा राखीव उर्जेचा अधिकाधिक वापर उत्पादनासाठी करण्याची नैसर्गिक सवलत जणू जनावरांना मिळते. त्यामुळे अर्थातच, अशा परिस्थतीत जनावरांचे उत्पादनही सर्वसामान्य असते. तथापि, तापमान त्यापेक्षा कमी अधिक झाल्यास त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात.

शरिराच्या आजूबाजूच्या वातावरणातील तापमानाच्या बदलांनुसार मिळणाऱ्या संकेतांनुसार मेंदूतील हायपोथलॅमस विविध क्रिया-प्रक्रिया घडवून आणतो व त्यांत अनुरूप बदल घडवतो. त्वचेखालच्या रक्तवाहिन्यांच्या आकुंचन व प्रसरणाच्या संतुलनातून बाहेरील तापमान आणि त्वचेचे तापमान यांतील तफावत कमी केली जाते. त्यामुळे, शरिराच्या ऐन गाभ्यातील तापमानावर परिणाम होत नाही आणि महत्वाच्या अवयवांना त्यांच्या कार्यासाठी आवश्यक असलेल्या तापमानाच्या मर्यादेत राखले जाते. शरिराचे हे तापमान राखण्यासाठी इतरही क्रियांच्या गती व प्रमाणात बदल घडवून तापमान राखले जाते. वातावरणातील तापमान व शरिरातील तापमान यांतील तफावत या पर्यायी उपायांनी कमी केली जावू शकत नसेल, तर या उपायांची व्याप्ती आणि तीव्रता अधिक वाढते.

वातावरणाचे तापमान खूप वाढले तर शरिरातील क्रियांसाठी पोषक शीतलता राखण्यासाठी घामाचे बाष्पीभवन अधिक केले जाते. त्यातून शरिरातील पाण्याचा अंश कमी होतो. उन्हाच्या तीव्रतेने तो वरचेवर कमी होत जातो. त्यामुळे शरिरातील पाण्याचे नियोजन विस्कळीत होते. अधिकाधिक पाण्याचे बाष्पीभवन झाल्यास, त्या पाण्याची तूट भरून काढण्यासाठी अधिक तहानेद्वारे पिण्याच्या पाण्याचा स्रोत वाढवला जातो. त्यानेही न भागणारी तूट रक्तातील पाणी शोषून पूर्ण केली जाते. त्यामुळे रक्तातील घटकांची तीव्रता वाढून एकूण वातावरण असंतुलित होते. शुष्कता वाढून विशेषतः आम्लांचे उदासिनीकरण थांबते त्यामुळे सर्वसाधारण आम्लता वाढून मळमळ, उलट्या होणे अशी लक्षणे निर्माण होतात. त्यामुळे अजूनच पाण्याची तूट वाढत राहते. त्याचा परिणाम रक्ताभिसरणादी प्रक्रियांवर तसेच श्वसन, पचन, प्रतिकारशक्ती यांवर होतो. शरिरातील इतर स्त्रावांच्या बाष्पीभवनाद्वारे शीतलता राखण्याच्या प्रयत्नात वाढ होते. त्यामुळे शुष्कतेत भर पडते. रक्ताभिसरणाच्या माध्यमातून तापमानातील तफावत करण्यासाठी प्रसरण पावलेल्या रक्तवाहिन्या फुटून रक्तस्त्राव होतो. श्वसनसंस्थेतील रक्तवाहिन्या अधिक पातळ असल्याकारणाने त्या लवकर फुटतात; यामुळे नाकातून रक्तस्त्राव होतो (घोळणा फुटणे). तळपत्या उन्हात अधिक काळपर्यंत राहिल्यास अथवा काम केल्यास ऊन लागते ते असे.

सातत्याने या प्रकारच्या घडणाऱ्या बदलांमुळे त्वचेची शुष्कता वाढते व ती नाजूक बनते. अधिक काळ उपाययोजना केली गेली नाही तर त्वचेचे रोगही उद्भवतात. रक्तसंघटनावर होणाऱ्या परिणामामुळे त्यातील घटक कमकुवत किंवा विकृत स्वरूप धारण करतात. त्यामुळे अनेक रक्तपेशींची कार्यक्षमता खालावते. त्याचा परिणाम प्रतिकारशक्तीवर होतो. जनावरे अगदी सामान्य व्याधींना आणि संसर्गजन्य रोगांना बळी पडतात. दुभती जनावरे अशा परिस्थितीत अधिक खंगून जातात.

सर्वात महत्वाचे म्हणजे, प्रजननावर या असंतुलनाचा गंभीर परिणाम होतो. जननेन्द्रियांचे कार्य मंदावते. त्याच बरोबर गर्भार जनावरे, दुभती जनावरे, माजावर येणारी किंवा जननोत्सुक जनावरे यांच्या क्षमतेवर परिणाम होतो. गर्भपात घडू शकतात. नराच्या शुक्रबीजांत अनैसर्गिक बदल घडतात व त्यांची फलनक्षमता कमी होते अथवा नाहीशी होते.

विशेषत: उन्हाळा संपून पावसाळा सुरु होण्याअगोदरचा स्थित्यंतराचा काळ अधिक प्रतिकूल असतो. कारण, या काळात उष्मा कायम असतोच; शिवाय हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढत असल्यामुळे, घर्मादी स्त्रावांचे बाष्पीभवन प्रभावीपणे होवू शकत नाही. कारण, हवेतील आर्द्रतेचा अंश इतका वाढतो की, तेथे शरिराकडून येणारी बाष्पार्द्र्ता स्वीकारण्यासाठी जागा नसते. त्यामुळे शरिराचा दाह होतच राहतो आणि ते थंड राखण्यासाठी शरिरातील स्त्रावांसह विसर्जित होणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन अयशस्वी ठरते. वाढत्या तापमानाचे परिणाम मात्र वाढतच जातात. केवळ वाढत्या तापमानाच्या स्थितीपेक्षा तापमानासोबत वाढत्या आर्द्रतेच्या स्थिती अधिक घातक असतात. उदा.: तापमान ४१ अंश सेल्सियस असताना आर्द्रता ६५ – ७० % इतकी झाली तर पक्षी, वराह, श्वान असे जीव मृत्यू पावतात. त्याचप्रमाणे, वाढत्या तापमानाचा परिणाम मुळातच शरिराचे तापमान अधिक असणाऱ्या, पण त्यामानाने त्यावर मात करण्यासाठी नैसर्गिक क्षमता कमी असणाऱ्या, कुक्कुटवर्गीय पक्ष्यांवर अधिक होतो.

त्यापासून रक्षण करणे अत्यंत महत्वाचे असते. अन्यथा, नाहक हानी होण्याची शक्यता असते. अत्यंत मौल्यवान जीवजंतू व जनावरे अकारण, केवळ दुर्लक्षामुळे दगावतात अथवा अक्षम व विकलांग बनतात.

मानव तसेच इतर सर्व जीवजंतू, पशुपक्षी, जनावरे यांना त्याच्या शरिराच्या सामान्य व निरोगी तापमानाच्या प्रमाणात ठेवल्यास चांगला परिणाम होतो. विशेषतः असे तापमान, ज्यामध्ये शरिरास ऊर्जेचे अतिउत्सर्जन अथवा अतिनिर्मिती करण्याची तणावपूर्ण गरज पडत नाही, म्हणजे शरिराचे आणि वातावरणाचे तापमान यांत तफावत येणार नाही, ते तापमान शरिरासाठी आरामदायी व अनुकूल ठरते. जनावरांना, पशु-पक्ष्यांना असे तापमानाचे नियोजन केलेल्या निवाऱ्यात ठेवले तर दुष्परिणाम होण्याची शक्यता कमी होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या प्रजनन, उत्पादन यांसाठी पूरक शरिरक्रियांवर प्रतिकूल परिणाम होत नाही.

 

Read: तापमानातील वाढीचे पशुपक्षी व प्राणी यांच्यावरील परिणाम — लेखांक २


प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी

(स्वेच्छानिवृत्त) विभागप्रमुख व प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र विभाग,
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर