तापमानातील वाढीचे पशुपक्षी व प्राणी यांच्यावरील परिणाम – लेखांक ५

तापमानातील वाढीचे पशुपक्षी व प्राणी यांच्यावरील परिणाम

वाढते तापमान एकूण आरोग्यावर विविध पद्धतीने दुष्परिणाम साधते. त्यापासून रक्षण करणे अत्यंत महत्वाचे असते. अन्यथा, नाहक हानी होण्याची शक्यता असते. अत्यंत मौल्यवान जीवजंतू व जनावरे अकारण, केवळ दुर्लक्षामुळे दगावतात अथवा अक्षम व विकलांग बनतात.

दुसऱ्या बाजूला, वातावरणाच्या तापमानातील अचानक व प्रचंड घटदेखील तितकीच घातक ठरते. शरिरातील तापमानाची, चयापचयाची साधण्यात आलेली घडी अचानक विस्कटते. ऐन उन्हाळ्यात येणाऱ्या अवकाळी पाउस, गारपीट यामुळे होणारी तापमानातील घट शरिरातील नियमनाला खीळ घालते आणि अचानक ऊर्जा निर्मितीची गरज पुरवताना जनावरांवर विलक्षण ताण पडतो. तो सहन करण्याची क्षमता असलेली जनावरे किमान जगतात. मात्र, त्यांचे उत्पादन घटते. २००२ साली झालेल्या गारपिटीच्या दरम्यान करण्यात आलेल्या सर्वेक्षणात्मक अभ्यासातून हे दिसून आले आहे कि, अचानक झालेल्या तापमानातील शीतबदलामुळे म्हशींच्या दूध उत्पादनात ७० टक्के आणि गायींच्या बाबतीत ४५ टक्के घट दिसून आली. विशेष म्हणजे, तापमान सामान्य झाल्यांनतर दूध उत्पादन सामान्य होण्यासाठी म्हशींना अधिक अवधी लागला. म्हशींमध्ये तापमानातील बदलांचा परिणाम लवकर, तीव्र व प्रदीर्घ टिकणारा असतो. हा परिणाम निवाऱ्याची सोय असलेल्या जनावरांमध्ये कमी तीव्र दिसून आला, हे विशेष नमूद केले पाहिजे.

यास्तव, सर्वात अगोदर वातावरणातील वाढत्या तापमानाच्या परिणामापासून दूर राहणे आवश्यक असते. अपरिहार्य परिस्थितीत काही उपाययोजना करून दुष्परिणाम टाळता येतात.

शक्यतोवर सावली, निवारा यांचा वापर करावा.

खूप तहान लागून एकदम खूप पाणी पिणेही धोक्याचे असते. जनावरांसाठी, पशु-पक्ष्यांसाठी थोड्या थोड्या वेळाने पाणी उपलब्ध करून द्यावे. म्हणजे शरिरातील पाण्याचे प्रमाण सातत्याने राखले जाते.

चरण्याच्या वेळा कमी उन्हाच्या प्रहरात नियोजित करून एरवी त्यांना निवाऱ्यातच खाद्य-पाणी पुरवावे.

शक्य झाल्यास टाकाऊ पोती, जाड कपडे, भोरगी यांचे ओले पडदे निवाऱ्याच्या बाजूने लावल्यास थंड हवेचे श्वसन साध्य होते. त्यातून पुढील दुष्परिणाम टळतात.

अधूनमधून अंगावर पाण्याच्या शिडकाव्यांनी अथवा फवाऱ्यानी तापमानाचा ताण कमी होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पाण्याची मुबलकता असल्यास, तोही उपाय फायदेशीर ठरतो.

अधिक प्रथिनयुक्त क्षारयुक्त आणि जलयुक्त आहार घेतल्यास चयापचयावरील परिणाम टळू शकतात. जनावरांसाठी हिरवा चाराही उपयुक्त ठरतो. पण तो उपलब्ध नसल्यास प्रथिनयुक्त चारा शरिरातील पाण्याच्या नियोजनास मदत करतो.

मानव तसेच इतर सर्व जीवजंतू, पशुपक्षी, जनावरे यांना त्याच्या शरिराच्या सामान्य व निरोगी तापमानाच्या प्रमाणात ठेवल्यास चांगला परिणाम होतो. विशेषतः असे तापमान, ज्यामध्ये शरीरास ऊर्जेचे अतिउत्सर्जन अथवा अतिनिर्मिती करण्याची तणावपूर्ण गरज पडत नाही, म्हणजे शरिराचे आणि वातावरणाचे तापमान यात  तफावत येणार नाही, ते तापमान शरिरासाठी आरामदायी व अनुकूल ठरते. जनावरांना, पशु-पक्ष्यांना असे तापमानाचे नियोजन केलेल्या निवाऱ्यात ठेवले तर दुष्परिणाम होण्याची शक्यता कमी होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या प्रजनन, उत्पादन यांसाठी पूरक शरिरक्रियांवर प्रतिकूल परिणाम होत नाही.

माणूस जसा तापमानाच्या गरजेनुसार पंखे, शीतकरणे, वातानुकुलीत यंत्रे, अन्न-वस्त्र-निवारा यांचे नियोजन करतो, तसे पशुपक्षी, जनावरे करत नाहीत. त्यांना त्याची तेवढी काटेकोर आणि खर्चिक सोयीसुविधांची गरजही नसते. परंतु किमान उपाययोजना केल्यास त्यांची हानी टळू शकते. तेवढ्यासाठी केवळ सहज उपलब्ध साधनांतून, सारासार विचाराने व तारतम्याने नियोजन केल्यास नुकसान टळू शकते.

प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी

स्वेच्छानिवृत्त विभागप्रमुख व प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र विभाग, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*