तापमानातील वाढीचे पशुपक्षी व प्राणी यांच्यावरील परिणाम – लेखांक ३

तापमानातील वाढीचे पशुपक्षी व प्राणी यांच्यावरील परिणाम

ऊर्जेची गरज शरीरातील ऊर्जावर्धक प्रक्रियांनी घडवून आणलेल्या उष्णतेने भागवली जाते. ही उष्णता एका विशिष्ट प्रमाणात असल्यामुळे ते शरीराचे सामान्य तापमान समजण्यात येते. या तापमानात शरीरातील पेशी, विविध अवयव सामान्यपणे आणि योग्य पद्धतीने कार्य करू शकतात. तसेच, या तापमानात घडणारे बदल त्यांच्या कार्यावरही परिणाम करतात. याच सर्वसाधारण तापमानात हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंडे, पचनसंस्था, श्वसनसंस्था, यकृत, स्वादुपिंड, जननेंद्रिये इ. अवयवांचे कार्य सामान्यपणे चालते. साधारणपणे एका विशिष्ट तापमानाच्या मर्यादेतील बदलामुळे हे कार्य कमी अधिक प्रमाणात प्रभावित होत असते.

विशेषतः शरिरातील तापमानाच्या वाढीमुळे चयापचय (ऊर्जानियमन करणाऱ्या प्रक्रियांची साखळी) वाढते. त्यामुळे शरिराचे तापमान वाढते आणि पुन्हा तापमानामुळे उष्णता वाढते, असे हे चक्र चालू असते. हे चक्र जोवर सर्वसामान्यपणे चालू असते, तोवर चयापचयामुळे अथवा अन्य कारणांमुळे शरिराचे तापमान जाणिवेच्या पातळीपर्यंत वाढू दिले जात नाही. मात्र, शरिराबाहेरील वातावरणाच्या तापमानानुसारही हे बदल घडत असतात. शरिरातील क्रियांमुळे घडणारे, वाढणारे तापमान ज्याप्रमाणे चयापचयावर परिणाम करते, साधारणतः हा परिणाम टाळण्याची उत्तम क्षमता (मानव व) उच्चवर्गीय प्राण्यांची, जनावरांची असते. लहान जिवांची ही क्षमता मात्र तुलनेने आणि सापेक्षतेने कमी असते. साधारणतः जेवढा प्राणी लहान तेवढी त्याची तापमानाची मर्यादा राखण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे लहान प्राण्यांच्या शरीराचे साधारण तापमान अधिक असते.

वातावरणाचे तापमान वाढले कि शरिरातील अतिरिक्त तापमान बाहेर टाकले जाते (उत्सर्जन) आणि वातावरणाचे तापमान कमी झाले कि शरीरातील ऊर्जा वाढवली जाते. मात्र हे बदल शरीराला नकळत, अत्यंत सूक्ष्म पातळीवर केले जातात. जाणिवेच्या पातळीवरील सर्वसामान्य तापमानाच्या या मर्यादेला ‘औष्णिकोदासीन मर्यादा’ (Thermoneutral Zone) असे म्हणतात. थोडक्यात, शरिराचे तापमान राखण्यासाठी करावयाचे बदल, शरिरात ताण निर्माण न करता केले जावू शकतात असे वातावरणाचे तापमान म्हणजे ही ‘औष्णिकोदासीन मर्यादा’. जोवर कुठलाही जीव या मर्यादेत असतो, तोवर त्याचे शरीर स्वस्थ असते. अशावेळी शरीरातील सर्व क्रिया सर्वसाधारणपणे नियमित व कुठलाही प्रभाव होवू न देता चालू असतात. तणावमुक्त असल्यामुळे केवळ शरिराचे तापमान राखण्यासाठी जनावरांना आपल्या राखीव उर्जेचा विनियोग करावा लागत नाही. अशा राखीव उर्जेचा अधिकाधिक वापर उत्पादनासाठी करण्याची नैसर्गिक सवलत जणू जनावरांना मिळते. त्यामुळे अर्थातच, अशा परिस्थतीत जनावरांचे उत्पादनही सर्वसामान्य असते. तथापि, तापमान त्यापेक्षा कमी अधिक झाल्यास त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. यास्तव, हे चक्र नियंत्रणात राखणे गरजेचे असते.

बाहेरील वातावरणाच्या, हवेच्या तापमानात आणि शरिराच्या आतील क्रियांच्या उष्णतेने घडवून आणलेल्या तापमानात (म्हणजेच शरिराच्या साधारण तापमानात) तफावत घडू न देण्याचे कार्य मेंदू करतो. शरिराच्या आजूबाजूच्या वातावरणातील तापमानाच्या बदलांनुसार मिळणाऱ्या संकेतांनुसार मेंदूचा हायपोथलॅमस हा भाग विविध क्रिया-प्रक्रिया घडवून आणतो व त्यांत अनुरूप बदल घडवतो. त्वचेखालच्या रक्तवाहिन्यांच्या आकुंचन व प्रसरणाच्या संतुलनातून बाहेरील तापमान आणि त्वचेचे तापमान यांतील तफावत कमी केली जाते. त्यामुळे शरिराच्या ऐन गाभ्यातील तापमानावर परिणाम होत नाही आणि महत्वाच्या अवयवांना त्यांच्या कार्यासाठी आवश्यक असलेल्या तापमानाच्या मर्यादेत राखले जाते. हृदय, रक्ताभिसरण संस्था, मूत्रपिंडे व विसर्जन संस्था, यकृत, पचनसंस्था, फ्फ्फुसे व श्वसनसंस्था, जननेंद्रिये व प्रजनन संस्था अशा महत्वाच्या संस्थांच्या कार्याचे नियमन सहज केले जाते. आतील तापमानाच्या वाढीमुळे जेव्हा अतिदाह होण्याची शक्यता असते, तेव्हा त्यांचे कार्य मर्यादित केले जाते व उष्णतेच्या, ऊर्जेच्या कमतरतेमुळे शरीर गोठण्याची शक्यता असते, तेव्हा त्यांचे कार्य वाढवून ऊर्जा निर्माण करण्याच्या प्रक्रिया घडवून आणल्या जातात.

 विविध प्राण्यांची औष्णिकोदासीन क्षमता

गाय २० – २५ अंश सेल्सियस
मेष (लोकर असलेली) ५ – २४ अंश सेल्सियस
मेष (लोकर नसलेली) ७ – २९ अंश सेल्सियस
वराह १० – २४ अंश सेल्सियस
अश्व वर्ग १० – २४ अंश सेल्सियस
नवजात ३५ – ३९ अंश सेल्सियस

शरिराचे हे तापमान राखण्यासाठी इतरही क्रियांच्या गती व प्रमाणात बदल घडवून तापमान राखले जाते. उदा. श्वसन, उत्सर्जन, घामाचे आणि इतर स्त्रावांचे बाष्पीभवन इ. वातावरणातील तापमानाच्या आणि त्वचेच्या तापमानाच्या तफावतीवर कोणत्या उपायांनी हे तापमान राखले जावे हे अवलंबून असते. ही तफावत जसजशी वाढत जाते, तसतसे उपाययोजनांची प्रणाली बदलत जाते. वातावरणातील तापमान व शरिरातील तापमान यांतील तफावत या पर्यायी उपायांनी कमी केली जावू शकत नसेल, तर या उपायांची व्याप्ती आणि तीव्रता अधिक वाढते. याचा अर्थ वातावरणातील तापमानाचा शरिरक्रियांवर अधिक परिणाम होतो.

 

Read: तापमानातील वाढीचे पशुपक्षी व प्राणी यांच्यावरील परिणाम — लेखांक २


प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी

स्वेच्छानिवृत्त विभागप्रमुख व प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र विभाग,
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर