तापमानातील वाढीचे पशुपक्षी व प्राणी यांच्यावरील परिणाम – लेखांक ४

तापमानातील वाढीचे पशुपक्षी व प्राणी यांच्यावरील परिणाम 

वातावरणाचे तापमान खूप वाढले तर शरिरातील क्रियांसाठी पोषक शीतलता राखण्यासाठी घामाचे बाष्पीभवन अधिक केले जाते. त्यातून शरिरातील पाण्याचा अंश कमी होतो. उन्हाच्या तीव्रतेने तो वरचेवर  कमी होत जातो. त्यामुळे शरिरातील पाण्याचे नियोजन विस्कळीत होते. अधिकाधिक पाण्याचे बाष्पीभवन झाल्यास, त्या पाण्याची तूट भरून काढण्यासाठी अधिक तहानेद्वारे पिण्याच्या पाण्याचा स्रोत वाढवला जातो. त्यानेही न भागणारी तूट रक्तातील पाणी शोषून पूर्ण केली जाते. त्यामुळे रक्तातील घटकांची तीव्रता वाढून एकूण वातावरण असंतुलित होते. शुष्कता वाढून विशेषतः आम्लांचे उदासिनीकरण थांबते त्यामुळे सर्वसाधारण आम्लता वाढून मळमळ, उलट्या होणे अशी लक्षणे निर्माण होतात. त्यामुळे अजूनच पाण्याची तूट वाढत राहते. त्याचा परिणाम रक्ताभिसरणादी प्रक्रियांवर तसेच श्वसन, पचन, प्रतिकारशक्ती यांवर होतो. शरीरातील इतर स्त्रावांच्या बाष्पीभवनाद्वारे शीतलता राखण्याच्या प्रयत्नात वाढ होते. त्यामुळे शुष्कतेत भर पडते. रक्ताभिसरणाच्या माध्यमातून तापमानातील तफावत करण्यासाठी प्रसरण पावलेल्या रक्तवाहिन्या फुटून रक्तस्त्राव होतो. श्वसनसंस्थेतील रक्तवाहिन्या अधिक पातळ असल्याकारणाने त्या लवकर फुटतात; यामुळे नाकातून रक्तस्त्राव होतो (घोळणा फुटणे). तळपत्या उन्हात अधिक काळपर्यंत राहिल्यास अथवा काम केल्यास ‘ऊन लागते’ ते असे.

सातत्याने या प्रकारच्या घडणाऱ्या बदलांमुळे त्वचेची शुष्कता वाढते व ती नाजूक बनते. अधिक काळ उपाययोजना केली गेली नाही तर त्वचेचे रोगही उद्भवतात. रक्तसंघटनावर होणाऱ्या परिणामामुळे त्यातील घटक कमकुवत किंवा विकृत स्वरूप धारण करतात. त्यामुळे अनेक रक्तपेशींची कार्यक्षमता खालावते. त्याचा परिणाम प्रतिकारशक्तीवर होतो. जनावरे अगदी सामान्य व्याधींना आणि संसर्गजन्य रोगांना बळी पडतात. दुभती जनावरे अशा परिस्थितीत अधिक खंगून जातात.

सर्वात महत्वाचे म्हणजे, प्रजननावर या असंतुलनाचा गंभीर परिणाम होतो. जननेन्द्रियांचे  कार्य मंदावते. त्याच बरोबर गर्भार जनावरे, दुभती जनावरे, माजावर येणारी किंवा जननोत्सुक जनावरे यांच्या क्षमतेवर परिणाम होतो. गर्भपात घडू शकतात. नराच्या शुक्रबीजांत अनैसर्गिक बदल घडतात व त्यांची फलनक्षमता कमी होते अथवा नाहीशी होते.

विशेषत: उन्हाळा संपून पावसाळा सुरु होण्याअगोदरचा स्थित्यंतराचा काळ अधिक प्रतिकूल असतो. कारण, या काळात उष्मा कायम असतोच; शिवाय हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढत असल्यामुळे, घर्मादी स्त्रावांचे बाष्पीभवन प्रभावीपणे होवू शकत नाही. कारण, हवेतील आर्द्रतेचा अंश इतका वाढतो की, तेथे शरिराकडून येणारी बाष्पार्द्र्ता स्वीकारण्यासाठी जागा नसते. त्यामुळे शरिराचा दाह होतच राहतो आणि ते थंड राखण्यासाठी शरिरातील स्त्रावांसह विसर्जित होणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन अयशस्वी ठरते. वाढत्या तापमानाचे परिणाम मात्र वाढतच जातात. केवळ वाढत्या तापमानाच्या स्थितीपेक्षा तापमानासोबत वाढत्या आर्द्रतेच्या स्थिती अधिक घातक असतात. उदा.: तापमान ४१ अंश सेल्सियस असताना आर्द्रता ६५ – ७० % इतकी झाली तर पक्षी, वराह, श्वान असे जीव मृत्यू पावतात. त्याचप्रमाणे, वाढत्या तापमानाचा परिणाम मुळातच शरीराचे तापमान अधिक असणाऱ्या, पण त्यामानाने त्यावर मात करण्यासाठी नैसर्गिक क्षमता कमी असणाऱ्या, कुक्कुटवर्गीय पक्ष्यांवर अधिक होतो.

हे टाळण्यासाठी, अर्थात जनावरे व पशुपक्षी यांचे निवारे, गोठे त्या पद्धतीने तयार केले पाहिजेत, की त्यांच्या निकटच्या वातावरणातील तापमानाच्या बदलाचा सामना करताना त्यांना कमीत कमी  ताण पडावा. त्यांच्या शरिरातील साठवलेली ऊर्जा कमीत कमी खर्च व्हावी. अर्थातच, त्यामुळे निवार्‍यात थंडावा टिकून राहील अशी योजना केलेली असावी. त्या दृष्टीने मोकळी, भरपूर आणि शुद्ध हवा हा त्यातील सर्वात महत्वाचा घटक आहे. शक्यतोवर उंच छत असल्यास मोकळी हवा निवार्‍यात खेळण्यास मदत होते. जनावरांना सहसा भिंतीकडे तोंड करून अडचणीच्या जागेत उभे केलेले असेल, तर किमान श्वसनासाठी मिळणारी हवाही अपुरी तर पडतेच, ती कुबट साठलेली असल्यामुळे शुद्ध नसते. त्यासाठी किमान त्यांना भिंतीच्या विरुद्ध दिशेने उभे केल्यास श्वसनासाठी मोकळी हवा मिळू शकते.

वास्तविक पाहता, मर्यादित प्रमाणात निवारे उभे करून, साधे कुंपण घालून जनावरांना मोकळेच ठेवले, तर त्यांच्या क्षमतेत वाढ होते. त्यामुळेच हल्ली मुक्त संचार पद्धतीचा अवलंब सुचवण्यात येतो.

छताप्रमाणेच निवार्‍यातील जमिनीकडेही त्या दृष्टीने लक्ष दिले गेले पाहिजे. निवार्‍यांतील जमीन किमान साफ (सपाट) असली पाहिजे. ती किमान स्वच्छ असावी. वरचेवर साफ ठेवण्याची त्याचप्रमाणे शाकारण्याची, सारवण्याचीही काळजी घेतली, तर निवार्‍यातील तापमानाचेही आपोआप नियोजन होण्यास मदत होते. त्यासाठीही मुक्त संचार पद्धतीची शिफारस केली जाते. जनावरे आपापल्या सोयीनुसार जागा निवडून उभी राहतात, बसतात किंवा फिरत राहतात. तशी ती फिरूही दिली पाहिजेत. मात्र, बांधली की, जनावरांच्या हालचालींवर मर्यादा पडतात. माफक प्रमाणातील मोकळ्या हवेतील त्यांच्या हालचाली, हिंडणे-फिरणे किंवा त्यांच्या सोयीनुसार बसणे त्यांना शक्य होण्याच्या दृष्टीनेही मुक्त संचार पद्धती अनुसरणे  फायद्याचे ठरते.

मुक्त संचार निवारा पद्धती, तिची साधारण रचना, फायदे, शास्त्रीय कारणे याबद्दलची मीमांसा वेगळ्या लेखातून करता येईल. तो एक स्वतंत्र आणि व्यापक विषय आहेच. मात्र वातावरणातील तापमानाच्या नियोजनाच्या दृष्टीने, मुक्त संचार पद्ध्तीच्या निवार्‍यामुळे फार प्रयत्न व ताण न घेताही, जनावरांच्या निकटच्या परिसरातील तापमानाच्या तफावतीवर मात करण्यासाठी त्यांचे स्वातंत्र्य मर्यादित प्रमाणात अबाधित राखले गेले, तर त्यांच्यावरील ताणतणाव कमी होवून ती अधिक सक्षम होतात. केवळ शरिराचे तापमान राखण्यासाठी त्यांची ऊर्जा कमीत कमी वापरली जाते व त्याचा फायदा उत्पादक ऊर्जेच्या समीकरणाच्या अनुकूलतेसाठी जनावरे घेवू शकतात. परिणामी त्यांचे आरोग्यही उत्तम राहून उत्पादन व कार्यक्षमता दोन्हीत वाढ होते.

प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी

स्वेच्छानिवृत्त विभागप्रमुख व प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र विभाग, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*