मुक्तसंचार गोठा यशोगाथा- दादा पवार राजळे

यशोगाथा – दादा पवार राजळे

श्री. दादा पवार यांचे पदवी पर्यंत शिक्षण झाले व त्यानंतर त्यांनी एका गावातील पतसंस्थे मध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. परंतु त्यात त्यांचे मन रमत नव्हते. वडिलोपार्जित त्यांचा व्यवसाय म्हणजे शेती. त्यांचा एक लहान भाऊ शिक्षण घेत होता तर वडील शेती करत होते. हळूहळू नोकरी करतच त्यांनी वडिलाना शेतीत मदत करण्यास सुरुवात केली व त्यात त्यांनी चांगला जम बसवला परंतु पावसाचा लहरीपणा व शेतीमालाचे कमी जास्त होणारे दर पाहता त्यांनी दुग्धोत्पादनाचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. अगोदर त्यांचाय्कडे एक गाय व एक कालवड होती. परंतु त्यांची टक्केवारी कमी असल्याने त्यांचे दुध उत्पादन जेमतेमच होते. त्यांनी नंतर थोडीफार पाशाची जमवाजमव करून जास्त दुध देणारी गाय घेतली आणि या गाईमुळेच  त्यांच्या दुध व्यवसायाला कलाटणी मिळाली.

जवळ भांडवल नसल्याने आहे याच गाईंच्या कालवडी वाढवत त्यांनी गोठ्यातील दुभत्या जनावरांची संख्या वाढवण्यास सुरुवात केली. बऱ्याच वेळेस चर्चा करत असताना ते नेहमी म्हणत असत कि आपणास ज्यावेळी गाई विकत घ्यावयाची आहे त्यावेळी ति चांगली असावी असे सर्वांनाच वाटते परंतु दुसऱ्या बाजूने आपण जर विचार केला तर आपल्या गोठ्यातील चांगली गाई कोणच विकणार नाही. त्यागोठ्यातील त्यांना नको असणारी गाई ते विकणार व तीच आपण गाई आपल्या गोठ्यात आणणार व आपण म्हणणार कि आम्ही चांगली गाई विकत आणली हा विरोधाभास आहे म्हणून आपल्या गोठ्यातच चांगल्या गुणवत्तेच्या विर्यमात्रा वापरून व त्यांचे चांगले  संगोपन करून चांगल्या गाई तयार करणे महत्वाचे आहे. या गोष्टींवर त्यांचा ठाम विश्वास होता त्यामुळे त्यांनी पैशाकडे न पाहता चांगल्या गुणवत्तेच्या वीर्यमात्रा  वापर करून चांगल्या वंशावळीची गोपैदास करण्यास सुरुवात केली. त्याच बरोबर त्यांनी कालवडीची जोपासना चांगल्याप्रकारे केल्यामुळे वंशावळीनुसार आलेले गुण दाखविण्यास कालवडीस मदत होते. अश्या पद्धतीने त्यांनी १० ते १२ जनावरांचा गोठा तयार केला.

Shelter for Cow

आकृती १  :- श्री. दादा पवार यांचा मुक्तसंचार गोठा

मुक्तसंचार गोठा (Cow Shelter)

गोठ्यामध्ये कायम काही तरी नवीन तंत्रज्ञान राबविण्यात ते नेहमीच अग्रेसर असत. आता जनावरांची संख्या हळूहळू वाढणार व नंतर आपणास जास्त काम करावे लागणार तसेच कामासाठी बाहेरून मजूर घ्यावे म्हंटले तर शेणाच्या व्यवसायामुळे या कामासाठी मजूर दुर्लक्ष करतात तर दुसरीकडे कारखान्यात नोकरी मिळत असल्याने व त्यामध्ये प्रतिष्टा असल्याने या व्यवसायासाठी भविष्यात आपल्या गोठ्यास मजूर मिळणार नाहीत म्हणून काही तरी करावे म्हणून मुक्तसंचार गोठा करवयाचे हे त्यांनी मनाशी निश्चित केले. त्यांनी बरेच मोठ-मोठे जास्त गुंतवणुकीचे  मुक्तसंचार गोठे पाहिले परंतु अश्या प्रकारचा गोठा करावयाचा असल्यास पुन्हा भांडवलाचा प्रश्न त्यांना सतवू  लागला. कमी खर्चात म्हणजे त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या साधनसामग्रीच्या आधारे आपण मुक्तसंचार करू शकतो ही संकल्पना त्यांच्या मनात रुजली व त्यांनी आठ दिवसातच मुक्तसंचार करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे बऱ्याच प्रमाणत जुनी लाकडे, बांबू तसेच इंधन विहिरीचे जुने पाईप पडून होते. त्यांनी त्याच्या जुन्या शेड समोरच कुंपण करण्यास सुरुवात केली. आठ फुटावर पाच फुट जमिनीच्या वर राहतील अश्या पद्धतीने लाकडाचे डांब उभे करून अश्या डांबाना बांबू व जुन्या पाईपच्या आडव्या चार ओळी करून चांगले कुंपण तयार केले.

दुसऱ्या बाजूस सिमेंटच्या टाकीत जनावरांना आवश्यकतेनुसार पिण्यास पाणी ठेवले. दुसऱ्या दिवसापासून अश्या शेडला कुंपण केलेल्या गोठ्यात जनावरे मोकळी सोडून दिली. सोडून दिल्या दिल्या जनावरांनी जोरात दंगा चालू केला. मिळालेल्या स्वातंत्र्याचा ते मनमुराद आनंद घेऊन इकडून तिकडे उड्या मारण्यास सुरवात केली. असे करताना कधी कधी एकमेकांबरोबर झुंज करण्याचा प्रयत्नही झाला. परंतु अश्या वेळेस हातात काठी घेऊन आत गोठ्यात उभे राहिल्याने जनावरांवर नियंत्रण आले व दोन तासानंतर जनावरे काही प्रमाणात शांत झाली. त्यांना त्यांच्या स्वातंत्र्याची खात्री पटल्याने त्यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे चारा खाउ लागली तहान लागल्यावर काही जनावरे पाहिजे त्यावेळेस पाणी पिऊ लागली. त्यानंतर आठवडाभर शेनच काढले नाही. जनावरे दिवसाआड धुवावी लागत होती ति महिनाभर नाही धुतले तरी चालत होते कारण जनवर चांगल्या जागेवर बसत असल्याने धुवावे लागत नवते. या सर्व बदलामुळे कामकाजात फारच बदल झाला. सुरुवातीस आजूबाजूंच्या लोकांनी त्यांना या कामासाठी विरोध केला परंतु नंतर त्यांचे फायदे लक्षात आल्याने हळूहळू अश्या कमी खर्चाच्या गोठयांचा प्रसार होण्यास सुरुवात होऊ लागली.

त्यांना हा सर्व बदल करण्यासाठी १० जनावरांच्या गोठ्यास कुंपण व दरवाजा करण्यास सर्वसाधारणपणे रुपये ३३०० खर्च आला. परंतु मुक्तसंचार पद्धतीतून त्यांना मिळालेल्या दोन महिन्याच्या फायद्यातूनच त्यांनी केलेली गुंतवणूक त्यांना परत मिळाली व त्यानंतर फायद्याचे प्रमाण वाढत गेले. कामाचे प्रमाण कमी झाल्याने त्यांनी आणि जनावरे वाढवून आपला दुध व्यवसाय वाढविण्याचा निर्णय घेतला. जनावरे वाढली काम कमी झाले तसा त्यांना फायदाही वाढत गेला. परंतु कालांतराने आडवे लावलेले बांबू काही ठिकाणी मोडू लागल्याने त्यातून जनावरे बाहेर येउ शकत होती त्यामुळे पुन्हा जास्त लक्ष द्यावे लागत होते  त्यामुळे आता थोडे भक्कम कुंपण करण्यासाठी त्यांनी नियोजन केले. कमी खर्चातील मुक्तसंचार गोठयामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती तसेच मानसिक परिस्थिती चांगली सुधारल्यामुळे लोखंडी जाळी लाऊन त्यांनी मुक्तसंचार गोठ्याची दोन वर्षात पुनरउभारणी  केली. सोबत दिलेल्या तक्त्यानुसार आपणास हे स्पष्ट होते कि आपण ज्या प्रमाणे श्री. दादा पवार यांनी  परंपरागत व्यासायात पद्धतीतून  येणाऱ्या परिस्थितीनुसार बदल केल्यामुळे आज ते हा व्यवसाय वाढवू शकले व कमी खर्चात कमी कष्टात आपण फायदेशीर दुग्धोत्पादनाचा व्यवसाय करू शकतो हे दाखवून दिले आहे.

नाव

दादा पवार राजळे

तपशील बंदिस्त मुक्तसंचार एक महिना मुक्तसंचार दोन वर्ष
जनावरे (गाई) १५
दुध उत्पादन ६८ ७९ १६०
कामाचे  तास  ६  ३
औषध खर्च ८००/महिना २०० ४००
आजाराचे प्रमाण तीनवेळा/आठवडा कमी फार कमी
आहार खर्च/लि ११.०० १०.२५ १०.००
मुक्तसंचार खर्च रु.४००० 00
गाभण राहण्याचे प्रमाण ३५% ५५ ते ६० %
शेतकऱ्याची मानसिकता पर्यायी व्यवसाय व्यवसाय मुख्य व्यवसाय
प्रती-महिना जास्त  आवक ३३०० प्रती महिना

दोन वर्षात दादा पवार यांचा दुग्धोत्पादनाचा व्यवसाय व्यवस्थित चालल्याने आता पुढील अडचणीसाठी उपाययोजना करण्यासाठी त्यांना वेळ मिळू लागला. आता त्यांचे पशुव्यवस्थापनाचे  काम बऱ्या पैकी कमी झाले होते. त्यामुळे ईतर अडचणींकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ होता. आपणास माहित आहेच कि दररोज शेण काढणे, दिवसाआड किंवा दिवसाकाठी गोठा व जनावर धुणे ही कामे जरी कमी झाली असली तरी दररोज जनावरांना चारा कापून आणणे हे फार मोठे जिकरीचे कामही दररोज करावे लागत होते व यासाठी मजूर मिळत नाहीत व मिळले तरी त्यांच्या सुट्यांमुळे कधी कधी आपल्यावर त्या कामाचा ताण येतो व नको हा व्यवसाय करावयाला असे वाटते. यासाठी दररोज चारा ना आणता तीन चार महिन्यांचा चारा एकदम कापून आणून त्याचा जर मुरघास करून ठेवला तर आपणास नक्कीच फायदा होईल यासाठी जमिनीत खड्डा घेऊन प्लास्टिक कागद वापरून २० टन चाऱ्याचा मुरघास केला व दररोज चाऱ्यासाठी  जि भटकंती करावी लागत होती ति आता थांबली. त्यानंतर वेगवेगळ्याप्रकारे मुरघास केले.

गोठ्यातील गोचीड नियंत्रणसाठी देशी कोंबड्यांचे पालन याच मुक्तसंचार गोठ्यात चालू केल्याने बराच फायदा झाला. शेण विस्कटने, गोचीड खाणे, अंडी व वाढणाऱ्या कोंबड्यांच्या  संख्येतूनही अतिरिक्त फायदा मिळू लागल्याने एकदरीत पशुसंगोपनात फायद्याचे प्रमाण वाढू लागले. त्यानंतर लाकडी ब्रश, धार काढण्याचे मशीनही घेण्यात आले, इईम द्रावणाचा वापरही चालू केला, तपमान वाढले तर ते नियंत्रण करण्यासाठी स्वयंचलित तपमान नियंत्रक बसवण्यात आले. या सर्व गोष्टींचा वापर केल्याने दुध व्यवसायाची आवड जास्त वाढली. त्यामुळे पुन्हा ३० गाईंच्या गोठ्याचे नियोजन करावयाचे ठरले व गोठ्याशेजारीच अद्यायावत असा बंगला बांधण्याचा संकल्प करून सहा महिन्यात घर आणि गोठ्याचे काम पूर्ण केले.

दूरदर्शन त्यांचं कामाची दखल घेऊन त्यांच्या या यशोगाथेचे प्रसारण त्यांच्या कृषि विषयातील कार्यक्रमातून केले. अनेक दैनिकामधूनही त्यांच्या या कामाचे संपादन झालेले आहे. कमी खर्चातील वरील प्रसार माध्यमातील प्रसिद्धीमुळे दहा हजारपेक्षा राज्य, राज्याबाहेरील तसेच विदेशातील शेतकऱ्यांनी या गोठ्यास भेट देऊन श्री. दादा पवार यांच्याकडून मार्गदर्शन घेतले आहे. तसेच बऱ्याच प्रकारच्या प्रशिक्षणासाठी स्वतः उपस्थित राहून  त्यांनी कमी खर्चातील मुक्तसंचार गोठा यावर मार्गदर्शन केलेले आहे व अजूनही त्यांचे काम चालू आहे.


लेखक: डॉ. शांताराम गायकवाड

सहाय्यक महाव्यवस्थापक
दुग्धव्यवसाय विकास विभाग
गोविंद दुध, फलटण, जि. सातारा