उन्हाळ्यात कशी घ्याल जनावरांची काळजी

आपला दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर राहावा यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असतो व त्यासाठी कायम नवनवीन तंत्रज्ञान आपण शोधून त्याचा अवलंब करत असतो. असे नवीन प्रयोग करत असताना आपण कायम आपल्या वातावरणाचा अभ्यास करून त्या तंत्रज्ञानात आपल्या पद्धतीने बदल करत गेलो, तर ते तंत्रज्ञान आपल्यासाठी फलदायी ठरते व त्याचा आपणास व आपल्या सभोवतालच्या पशुपालकांसाठी कायमस्वरूपी व सर्व ऋतूंमध्ये फायदा होतो. परंतु बऱ्याच वेळेस आपण आपल्या दुग्धव्यवसायात वातावरण व ऋतुमानानुसार आवश्यक बदल करत नाही व त्यामुळे आपणास अडचणींना सामोरे जावे लागते. दुग्धव्यवसाय करत असताना अधिक पाऊस, अधिक थंडी व अधिक उन्हाळा यांपासून आपल्या पशुधनाचे आपणास सरंक्षण करून त्याच्या उत्पादनावर कोणताही अपाय होणार नाही याची व्यवस्था करणे आवश्यक असते. आपल्याकडील तापमान कधीकधी ४५C पेक्षा सुद्धा जास्त असते व अशा तापमानात जनावरांवर उष्णतेचा ताण येतो. अशा वेळीआपली जनावरे आवश्यकतेप्रमाणे उत्पादनक्षम राहत नाहीत.

जनावरांचे संगोपन करत असताना आपण आपल्या जनावरांना योग्य वातावरण, योग्य प्रमाणात आहार, तसेच इतर व्यवस्थापन योग्य ठेवल्यास आपल्या जनावरांकडून चांगले दूध उत्पादन घेऊ शकतो. याबाबत आपल्या जनावराच्या गरजा आपल्या लक्षात आल्या पाहिजेत. एखादी गरज आपल्याकडे भागवता येत नाही म्हणून आपण पशुपालन करू शकत नाही, असे बरेच पशुपालक म्हणत असतात. योग्य वातावरण नसतानाही संकरित गायींचे उत्पन्न एवढे कसे राखता येईल यासाठी आपले विचार बदलणे आवश्यक आहेत. आपल्या भागात संकरित गायी टिकत नाही किंवा आपणास पाहिजे त्या प्रमाणात दूध देत नाहीत. परंतु याबाबत आपण जर इतर देशातील वातावरणाचा अभ्यास केला व त्यांच्याकडील संकरित जनावरांचे दूध उत्पादन पाहिले तर असे वाटेल की आपल्यापेक्षा अवघड परिस्थितीतही ते दूध उत्पादन करतात. आपणही हे साध्य करू शकतो. मात्र त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे.

दिवसेंदिवस पृथ्वीवरील तापमान वाढतच आहे याउलट आपल्या संकरित जनावरांची वाढीव तापमान सहन करण्याची क्षमतासुद्धा त्या प्रमाणात वाढलेली नाही अशा अवस्थेत आपल्यापुढे एकच पर्याय आहे; तो हा की आपण तापमान नियंत्रणाचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केले पाहिजे.

तापमान वाढल्याने नेमके काय परिणाम होतात ?

वातावरणातील तापमान वाढल्याने जनावर त्याच्या शरीराचे तापमान वाढू नये व ते सर्वसाधारण रहावे यासाठी दोन प्रकारे प्रयत्न करते. पहिले म्हणजे शरीरात तयार होणारी ऊर्जा शरीराबाहेर टाकणे व दुसरे म्हणजे शरीरात कमीत कमी ऊर्जा तयार होण्यासाठी ते आपली दैनिक व्यवस्थापनात बदल करत असते.

  • सर्वसाधारणपणे जनावरासाठी १० C ते २६ C (२४ C ते २६C अंश सेल्सिअस तापमान संकरित तर ३३C भारतीय देशी व म्हशीसाठी ३६C पर्यंत  हे वातावरणातील तापमान योग्य समजले जाते.
  • वातावरणातील तापमान ज्यावेळेस जास्त जाते, त्यावेळेस जनावरे आपल्या शरीराचे तापमान घर्मग्रंथी किंवा धापनेच्या प्रक्रियेमार्फत शरीरातील तापमान नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असतात.
  • ज्यावेळी वातावरणातील तापमान या कक्षेबाहेर जाते म्हणजे कमी किंवा जास्त होते अशा वेळी जनावराला आपल्या शरिरावर होणाऱ्या विपरीत परिणामांचा ताण सहन करावा लागतो.
  • जनावराच्या शरीरात तयार होणारी ऊर्जा जनावर बाहेर टाकत असते. परंतु अशा वेळेस बाहेरील तापमान वाढल्याने ऊर्जा बाहेर टाकणे जिकिरीचे होते व त्यातच बाहेरील ऊर्जेचा भार अधिक वाढल्याने  जनावराच्या ऊर्जा निस्सारण यंत्रणेवर याचा परिणाम होतो.
  • जनावराच्या हार्मोन्स निर्मितीत बदल होतो, त्यामुळे जनावराचे उत्पादन, आरोग्य, आहार व प्रजनन यांवर विपरीत परिणाम होतो.
  • शरिरातील अन्नघटक हे तापमान नियंत्रण करण्यासाठी वापरल्याने जनावर अस्वस्थ होते. जनावराचा आहार कमी होऊन तहान-भूक मंद होते.
  • जनावर तापमान नियंत्रण करण्यासाठी स्वत:ची यंत्रणा वापरण्यास सुरवात करते. यामध्ये श्वासोच्छसाचा दर वाढून धाप लागल्यासारखे करते. तोंडाने श्वासोच्छवास करते. श्वासोच्छवास उथळ व जास्त वेगाने होतो. तसेच नाडीचा वेग वाढतो.
  • जनावर स्वत: तापमान नियंत्रण करण्यापलीकडे जाऊन नंतर जनावराचे शरीराचे तापमान १०४ ते १०६° फॅ.इतके वाढून कातडी कोरडी पडते.
  • जनावरांचे डोळे, लालसर होऊन डोळ्यातून पाणीगळते.
  • जनावरांना पित्ताचा त्रास होऊन अतिसार होण्याची शक्यता असते.
  • जनावराचे लघवीचे प्रमाण कमी होते.
  • जनावरे बसून घेतात. .
  • गाभण गायी गाभडण्याचे प्रमाण वाढते.
  • आपण जर उन्हाळ्याचे नियोजन चांगले केले तर आपल्या जनावरांवर असा विपरीत परिणाम होणार नाही.

तापमान वाढीपामुळे होणारे परिणाम

 

आकृती :- उष्णता वाढीचा जनावरांच्या शरीरावर होणारे विपरीत परिणामाचे रेखाचित्र

का महत्वाचे आहे  ?

आपल्याकडील देशी जनावरांमध्ये वातावरणातील बदल सहन करण्याची जास्त क्षमता असते. ती क्षमता संकरीत जनावरांमध्ये कमी असते; तर विदेशी जातीत फारच कमी असते. अशा जनावरांना वातावरणातील तापमान वाढल्यानंतर त्यांच्या शरीराचे तापमान  योग्य त्या प्रमाणात ठेवण्यात अडचणी निर्माण होतात व त्याचा परिणाम जनावराच्या दूध उत्पादनावर व त्यांच्या आरोग्यावर होताना आपणास दिसतो.

… यामुळे होणारे परिणाम

प्रामुख्याने –

  • जनावरांची उर्जेची गरज वाढते:- आपणास माहीत आहे, की गायीच्या शरिरात असणारी ऊर्जा दूध निर्मिती, वासराची वाढ यासाठी वापरली जाते. याबरोबरच हालचाली, चालणे, श्वास घेणे, खाणे इ. यासाठीसुद्धा उर्जेची गरज असते. अशा वेळेस जर बाहेरील वातावरणात बदल झाला तर जो ताण जनावरावर येतो त्यावर मात करण्यासाठी जनावराला उर्जेची गरज असते.
  • जनावराचे दूध उत्पादन कमी होते. ज्यावेळेस तापमान ३५ अंश डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त जाते, अशा वेळेस दूध उत्पादनात ३० % पर्यंत घट होऊ शकते आणि जेव्हा तापमान ४० अंश डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त जाते त्यावेळेस दूध उत्पादनामध्ये ५०% पर्यंत घट होऊ शकते आणि योग्य काळजी न घेतल्यास ही घट आणखी वाढत जाते.
  • उष्णतेच्या वाढीचा परिणाम हा वासरांच्या व कालवडींच्या वाढीवर अधिक प्रमाणात होत असतो.
  • दुधाच्या घटकांमध्ये बदल होतो. दुधातील स्निग्धांश व प्रथिनांचे प्रमाण कमी होते.
  • जनावराचा आहार कमी होतो.
  • प्रजनन यंत्रणेवर परिणाम होतो. उष्णतेचा ताण असणारी गाय माजावर येत नाही व गाभणसुद्धा राहण्यास अडचणी निर्माण होतात.
  • गाभण गायींना उष्णतेचा ताण झाल्यास गर्भपात होऊ शकतो किंवा अकाली प्रसूती होऊ शकते.
  • ताण सहन करण्यासाठी व उष्णतेचे निस्सारण करण्यासाठी जनावर धापा टाकते.
  • जनावराच्या पोटातील हालचाली मंदावतात वसंपूर्ण पचनक्रिया बाधित होते.
  • शरिरातील क्षारांचे संतुलन बिघडल्यामुळे जनावराला आम्लपित्ताचा त्रास होऊन जुलाब होऊ शकतात.
  • जनावराच्या कासेच्या आरोग्यावर परिणाम होतो.
  • दूध उत्पादन नियंत्रित करणाऱ्या संप्रेकांवर (हार्मोन्स) परिणाम होतो.
  • या कालावधीत जनावरांच्या खुरांचे आजार तसेच लंगडेपणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.

तापमान वाढीपामुळे होणारे परिणाम

आकृती:- उष्णतेच्या परिणामामुळे होणारे दुष्परिणाम

कसे कराल तापमान वाढीपासून संरक्षण ?

वरील सर्व गोष्टी आपण पाहिल्या, तर उन्हाचा गायीच्या आरोग्यावर, उत्पादनावर, आरोग्यावर व प्रजननावर कसा परिणाम होतो. यासाठी आपल्या पशुधनाचे संरक्षण करून त्यांच्याकडून कसे आपणास जास्तीत जास्त उत्पादन घेतले पाहिजे ते पाहणे महत्वाचे आहे. यासाठी अशा अडचणींवर मात करण्यासाठी आपण काही बदल करणे आवश्यक आहेत. यामध्ये दोन पद्धती महत्वाच्या असून, एक म्हणजे गायीच्या भोवतालच्या वातावरणात बदल करणे व दुसरे गाईच्या आहारात  बदल करणे .

गोठा :- 

  1. जनावरांना उन्हात उभे न करता त्यांना जास्तीत जास्त सावली पुरविणे आवश्यक आहे
  2. आपल्या जनावरांना उष्माघातापासून वाचविण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष सूर्याच्या संपर्कातून वाचविण्यासाठी हवेशीर गोठ्यात ठेवणे आवश्यक आहे.

हवेशीर गोठा

आकृती:-गोठा परिसरात झाडे लावावीत  व हवेशीर गोठा असावा

  1. उन्हाळ्यात जनावरांना बसण्या-उठण्यासाठी सरासरीपेक्षा जास्त जागा देणे आवश्यक आहे. एकाच जागेत जास्त गर्दी असल्यास उष्णतेचे निस्सारण होण्यास वेळ लागतो.
  2. गोठ्याच्या आजूबाजूस झाडे लावण्यात आली, तर वातावरण थंड राहील.
  3. गोठा हवेशीर असावा. गरम हवा बाहेर जाण्यासाठी व थंड हवा आत येण्यासाठी पुरेपूर जागा असावी.

उष्ण हवेचा प्रवाह

आकृती:-उष्ण हवेचा प्रवाह

  1. छताची उंची जास्त असावी .
  2. छताच्या पत्र्याला जर पांढरा रंग दिला तर उष्णतेचे परावर्तन होऊन जनावरांना उष्णतेचा त्रास कमी होऊ शकतो.
  3. उन्हाळ्याच्या कालावधीत छतावर पालापाचोळा किंवा पाचट टाकल्यास उष्णतेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
  4. शक्य असल्यास गोठ्यात हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावावेत.

हवेशीर गोठा

आकृती:- गोठ्यात हवा खेळती राहण्यासाठी लावलेले मोठमोठे पंखे.

  1. उन्हाळ्याच्या कालावधीत छतावर पाण्याचे स्प्रिंक्लर्सद्वारे सुद्धा छतावरील तापमान नियंत्रित करता येईल.
  2. गायी थंड ठेवणे :- जनावरास आपण जास्तीत जास्त किती थंड वा गरम वातावरणात ठेवू शकतो, याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. यामध्ये गायीच्या अंगावर स्प्रिंकलर्स, फॉगर्स किंवा इतर मार्गाने पाणी मारून शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.
  3. फॉगर्स :- यामध्ये पाण्याच्या थेंबाचे रुपांतर हे लहान कणांच्या स्वरूपात केल्याने ते गोठ्यात किंवा गायीच्या अंगावर चिकटतात व अशा लहान कणांचे बाष्पीभवन होण्यासाठी शरीरातील ऊर्जा वापरल्याने गायीचे शरीर थंड ठेवण्यास मदत होते.

गोविंद डेअरी

आकृती:- कमी खर्चाचा गोविंद डेअरीने विकसित केलेला स्वयंचलित तापमान 

  1. स्प्रिंकलर:- यामध्ये पाण्याच्या कणांचा जनावराच्या केसांवर एक थर तयार होतो. पंखा लावला असेल तर किंवा खेळत्या हवेत अशा जलकणांमुळे गायीच्या शरीराला थंडावा मिळतो.

हवेशीर गोठा

आकृती:- स्प्रिंकलरने जनावराचे अंग ओले करून त्यावर पंख्याची हवेचा वापर करून जनावरे थंड ठेवता येतात.

  1. गोठ्याच्या भोवती बारदान किंवा पाणी धरणारा कपडा बांधावा, जेणे करून आंत येणारी गरम हवा थंड होऊन येईल व आतील थंड हवा आतच राहील.
  2. जनावरांना जास्तीत जास्त वेळ पाणी पिण्यास उपलब्ध असेल, याची दक्षता घ्यावी.
  3. पिण्यासाठी ठेवलेले पाणी उन्हाने गरम झालेले नसावे.  ते जास्तीत जास्त थंड असावे. त्यासाठी मुक्तसंचार गोठ्यात पाण्याच्या टाक्या या सिमेंटच्या असाव्यात किंवा स्टेनलेस स्टीलच्या असतील तर त्यांना बारदानाने ओले करून गुंडाळल्यानंतर पाणी थंड राहण्यास मदत होते.
  4. जनावरांना उन्हाळ्यातील आहाराचे व्यवस्थापन चांगले करणे फार महत्वाचे आहे.
  5. जनावरांना जास्त चावावा लागणारा चारा हा सकाळ किंवा सायंकाळी, म्हणजे ज्यावेळी उन्हाचा तडाखा असेल अशा वेळेस देऊ नये. कारण असा चारा चावण्यासाठी जनावराच्या शरीरात अतिरिक्त उष्णता तयार होते.
  6. या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी जनावरांना आपली ऊर्जा खर्च करावी लागते. तसेच जनावराचा आहारसुद्धा कमी होतो. त्यामुळे आपल्या जनावरास अतिरिक्त ऊर्जा या कालावधीत जास्त पुरविणे गरजेचे आहे.
  7. या कालावधीत ताण सहन करण्यासाठी शरिरातील बिघडलेला क्षारांचा समतोल साधण्यासाठी गोग्य प्रमाणात क्षारांचे प्रमाणे दिले गेले पाहिजे .
  8. व्यवस्थापन करत असताना आपल्या जनावरांवरील ताण कायम कमी राहील याची काळजी घेतली पाहिजे.