संक्रमण काळात घ्यावयाची काळजी

संक्रमण काळ म्हणजे काय ?

गायी विण्याच्या आधीचे २० दिवस आणि विल्यानंतरचे २० दिवस,या ४० दिवसाच्या काळाला संक्रमण काळ (Transition period) असे म्हणतात. हा काळ गायीच्या जीवनात फार महत्वपूर्ण काळ असतो. या काळात शरीरात फार मोठे बदल घडत असतात. याच काळात गायीला सर्वात जास्त आजार होतात किंवा होण्याची संभावना असते. त्याची कारणे काय आणि त्यावर उपाययोजना काय करावी….हे पाहू…..

# गर्भाची वाढ पुर्ण होत असते. कासेचा आकार वाढत असतो, नवीन पेशी निर्माण होत असतात. अशा वेळी खनिजे, जीवनसत्व आणि ऊर्जा फार मोठ्या प्रमाणात खर्च होतात. अशा वेळी जर योग्य पुरवठा हा चारा व पशुखाद्य यातून झाला नाही तर चयापचयाचे विकार जसे की कॅल्शियम व फॉस्फोरसची कमतरता व पशुखाद्य न खाणे, तोंडाला गोड वास येणे ….दिसून येतात.

# हार्मोन्स मध्ये फार मोठे बदल घडून येतात. जर योग्य अन्नपुरवठा नसेल तर हार्मोन्सच्या कमतरतेमुळे जार न पडणे, पान्हा चोरणे, दूध न उतरणे व कास वाढीस न लागणे अशा समस्या दिसून येतात.

# या काळात रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि म्हणून स्तनदाह, गर्भ पिशवीला सुज येणे किंवा पू होणे हे आजार लगेच दिसून येतात.

# बाह्य व अंतर परोपजीवी यांचे निर्मुलन केले नाही तर थायलेरिया, रक्त लघवी, गळ्याखाली सुज येणे, डोळे पिवळे किंवा सफेद दिसणे, भुक मंदावणे असली लक्षणे आढळतात.

# गर्भ हा कोठीपोटाच्या खाली असतो. त्यामुळे पोटावर त्याचा दाब पडतो आणि भुक थोडी कमी होते. विल्यानंतर हा दाब नाहीसा होतो आणि अशात अचानक पशुखाद्य किंवा चारा जास्त दिला तर अपचनाच्या तक्रारी दिसून येतात. पोटातील पचन करणाऱ्या जंतूंची संख्या कमी असते…त्यामुळे पण समस्या निर्माण होतात.

या सर्व बाबींमुळे ८० ते ९० टक्के हे आजार गाय विल्यानंतर होतात.

उपाययोजना

# चांगल्या प्रतीचे पशुखाद्य ज्यात प्रथिने आणि ऊर्जा जास्त असेल ते द्यावे.

# गाय वेळीच आटवावी.

# जंत व गोचीड यांचं निर्मुलन करावे.

# मिनरल मिक्श्चर चालू ठेवावे.

# गायीला सूर्यप्रकाश आणि खेळती हवा मिळेल, अशा ठिकाणी बांधावी.

# गवत किंवा वैरण यापासून मऊ बिछाना तयार करावा.

# मायांगावरील केस काढून टाकावेत.

# स्वच्छता ठेवावी.

# Tranzisafe Powder (Vetrina) ५० ग्राम रोज चाळीस दिवस द्यावी किंवा P4 पावडर ( Indian Immunologicals), Metabolite Mix (Virbac), Lactogain Powder + Polvit – P (Ceva Polchem) हे प्रॉडक्ट पण वापरू शकता.

लक्षात ठेवा जर संक्रमण काळात योग्य काळजी घेतली तर भरपुर दुध उत्पादन तर मिळेलच व आजारांवरचा खर्च पण वाचेल.

डॉ.आरिफ शेख

पशुवैद्यकीय चिकित्सक,
मु. पो. साकुर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर
मो.९९२२६२२६०८
Email: shaikharif27@gmail.com