दुधाळ जनावरांच्या व्यवस्थापणातील यशाची सूत्रे

दुधाळ जनावरांचे व्यवस्थापन ( Management of Dairy Cattle)

1. वासरांचा आहार 

जन्मल्याबरोबर वासरास गायीचे पहिले दूध अर्थात चिक पाजणे अत्यावश्य़क आहे. कारण त्यातील रोग प्रतिबंधक घटकामुळे वासरांचे बालवयात होणा-या रोगांपासून संरक्षण होते. जन्मल्यानंतर 6 तासाचे आत हे चीक अन्ननलिकेत शोषून घेण्याची क्षमता जास्त असते त्यामुळे शक्य तितक्या लवकर चिक पाजावा वासरास किमान 2 महिन्यापर्यत मातेचे दुध पाजावे दूध पाजण्याचे प्रतिदिन प्रमाण त्याच्या वजनाच्या अंदाजे 1/10 एवढे असावे व ते एकाच वेळेस न देता दिवसातून 3 ते 4 वेळा विभागून पाजावे. दूध पाजण्याच्या वेळेतील अंतर सारखे ठेवावे. याकाळात वासराला मातेचे दुध मिळाल्यास त्याची वाढ चांगली होते.

वयाच्या दुस-या आठवडयापासून वासराला प्रथीनयुक्त खाद्य  (काफ स्टार्टर) देण्यास हळुहळू सुरूवात करावी. अशा प्रकारे 6 ते 7 आठवडयापर्यत संपुर्ण दूध बंद करून आहार दयावा हा आहार वासरास 6 महिनेपर्यत देता येतो.  अशा प्रकारे वासराच्या संगोपनावरील खर्च कमी करता येईल. बाजारात विविध नावांनी काफ स्टार्टर या नावाने तयार खाद्य  मिळते. किंवा घरीच खाद्य तयार करावयाचा असल्यास, भरडलेला मका, 60 टक्के भुईमुग, सोयाबीन किंवा तिळाची पेंड, 30 टक्के गव्हाचा कोंडा, 7 टक्के क्षार, खनिज मिश्रण 2 टक्के व खाण्याचे मिठ 1 टक्के असे मिश्रण तयार करून त्यात प्रति 100 किलो खादयात 20-25 गॅम जीवनसत्व अ व ड असलेली पावडर मिसळावी. वासरू 2 ते 3 आठवडयाचे झाल्यानंतर त्याला कोवळे लुसलुशीत गवत देण्यास सुरूवात करावी यामुळे त्याच्या रवंथ करणा-या पोटाची वाढ लवकर होण्यास मदत होते.

2. पशुसाठी चारा 

संतुलित पशुखाद्यामध्ये प्रथिने, पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, खनिजे, जीवनसत्त्वे ही पौष्टिक सत्त्वे असावीत. गायी-म्हशींचे शारीरिक पोषण, वाढ, दुग्ध वाढ आणि प्रजननासाठी ती उपयोगी ठरतात. प्रत्येक जनावराची खादयातील शुष्क पदार्थ खाण्याची ठराविक गरज असते साधारणपणे वजनाच्या 3 ते 3.5 टक्के शुष्क पदार्थ जनावराला त्याच्या आहारातून पुरविले पाहिजेत.  यासाठी त्याच्या आहारात वाळलेला चारा असणे आवश़यक ठरतो. रवंथ करणा-या जनावरांचे पोट मोठे असते ते संपूर्ण भरल्यानंतर त्यास भूक मिटल्याचे समाधान मिळते. मोठया जनावरांमध्ये हिरव्या चा-याचा अंतर्भाव करणे फायदेशीर आहे त्यातून जनावराला अ जीवनसत्वाचा पुरवठा होऊन त्याचे डोळे, कातडी त्वचा सतेच होते. याशीवाय रोग प्रतिकार शक्ती वाढुन उत्पादनाची पातळी टिकविण्यास मदत होते.

द्विदल व कडधान्य चा-याचे मिश्रण – चा-यातून जनावराला चांगल्या प्रमाणात प्रथीने व इतर पोषक द्रव्ये मिळण्यासाठी हिरवा चारा देतांना, त्यात द्विदल चारा जसे की लुसर्न, बर्सिम किंवा मुग, भुईमुग, उडीद यासोबत कडधान्य चारा, मका ज्वारी इत्यादीचे 1:3 प्रमाणात मिश्रण करावे केवळ द्विदल चारा पोटभर खावू घातल्याने सुध्दा अपचनाचा व पोटफुगीचा त्रास जनावरास होवू शकतो. चारा जनावरासमोर तसाच न टाकता तो कुटी करून करून दिल्यास चारा वाया जाण्याचे प्रमाण कमी होते तसेच कुटी केलेल्या चा-याची पाचकता जास्त असते.

3. उत्पादक पशुचा आहार 

देशी गाईला सव्वा किलो तर संकरित गाईला व म्हशीला दिड  किलो तयार संतुलीत पशुखादय केवळ शरीर पोषणासाठी लागते या व्यतिरिक्त प्रत्येक 2.5 आणि 3 लिटर दूध उत्पादनासाठी अतिरिक्त 1 किलो गायीला आणि म्हशीला संतुलीत पशुखादय दिले पाहिजे. त्यामुळे आपल्या दुधाळ जनावरांकडून चांगले उत्पादन मिळू शकेल.

गाभण काळाच्या सातव्या महिन्यापासून शरीर पोषण व्यतिरिक्त 1 किलो पशुखादय अधिक दयावे कारण या काळात गर्भाची वाढ सर्वात जास्त होते. यामुळे गर्भाची वाढ योग्य प्रकारे होते व जन्मणारे वासरू सुध्दा चांगल्या वजनाचे रहाते. याशिवाय पुढील दूध उत्पादन टिकविण्यास मोलाची मदत होते

4. पशुखादयाचा वापर 

बाजारात विविध कंपन्याचे पशुखादय तयार स्वरूपात मिळते हे खादय संतुलीत असून जनावराची आवश्यकता लक्षात घेवून बनविलेले असते. वासरे भाकड जनावरे व दुधाळ जनावरे यांच्यासाठी वेगवेगळे खादय कंपनी बनवित असते व ते बाजारात विविध नावांनी उपलब्ध ही आहे.

5. खनिज व क्षार मिश्रणाचा वापर 

जनावरांना देत असलेल्या चाऱ्यामध्ये बरेचसे खनिज पदार्थ हे कमी प्रमाणात असतात. हव्या त्या प्रमाणात जनावरांना खनिज पदार्थ उपलब्ध होत नाहीत. म्हणून ओला आणि वाळलेल्या चाऱ्यासोबत खनिज पदार्थ द्यावेत. हाडांची वाढ, शारीरिक वाढ, दूध उत्पादन (Milk Production), चयापचय क्रिया इ. गोष्टींसाठी खनिज पदार्थ हे महत्त्वाची भूमिका बजावतात. खनिज पदार्थांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस हे दूध उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावतात.

बाजारात उपलब्ध असलेल्या चांगल्या दर्जाच्या खनिज व क्षार मिश्रणात (मिनरल मिक्सचर) जनावरास आवश्यक असे घटक असतात.  दुध उत्पादन कमी होने वंधत्व येणे, जनावर व्यवस्थित माजावर येत नाही हे सर्व टाळण्यासाठी जनावराच्या 1 किलो खादयात अंदाजे 20 ग्रॅम खनिज व क्षार मिश्रण पावडर (मिनरल मिक्चर) टाकणे आवश्यक आहे.

6. घरगुती खुराक 

बाजारातून तयार पशुखादय विकत घेणे परवडत नसल्यास घरच्या घरी सुध्दा खुराक तयार करता येईल यासाठी खालील प्रमाणात खादय मिश्रण करावे. तेलयुक्त पेंड  15  टक्के, तेल विरहित पेंड 20 टक्के, ज्वारी, बाजरी, मका 30 टक्के गहू किंवा तांदळाचा कोंडा 20 टक्के दाळ चुनी 12  टक्के या मिश्रणातील घटकांचे प्रमाण जनावराच्या आवश्यकतेनुसार व खादय पदार्थाच्या उपलब्धतेनुसार बदलावे. या खुराकात 2  टक्के खनिज मिश्रण पावडर व 1  टक्के खाण्याचे मीठ मिसळावे.

घरच्या घरी खादय किंवा खुराक तयार करावयाचा असल्यास त्यातील खादय घटक चांगल्या प्रतीचे असतील याची खात्री करून घ्यावी केवळ स्वस्त मिळते म्हणून निकृष्ट दर्जाच्या खादय पदार्थाचा अंतर्भाव करू नये यामुळे शरीरास आवश्यक पोषक द्रव्यांचा लाभ न होता उलट नुकसानच होते. बुरशी चढलेले खादय पदार्थ खुराकात कधीही वापरू नयेत.

7. खादयातील बदल व देण्याची वेळ

पशुखादयात किंवा चा-यात एकदम बदल केल्यास जनावरे खाणार नाहीत, कमी खातील किंवा खल्यास अपचनाचा त्रास उदभवू शकेल शिवाय उत्पादनही घटेल चारा किंवा पशुखादय देण्याची वेळ आणि त्यातील अंतर नियमित ठेवावे. चारापाणी देण्याच्या वेळेतील अनियमितपणा खादयाच्या पाचकतेवर परिणाम करू शकतो त्यामुळे अपचनाचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

8. चारा प्रक्रिया व साठवण 

सर्वसाधारणपणे आपल्याकडे पावसाळयात व हिवाळयात हिरवा चारा, गवत उपलब्ध असते त्यामुळे जनावराचे आरोग्य चांगले रहाते. मात्र उन्हाळयात असा चांगला चारा उपलब्ध न झाल्यामुळे जनावराचे आरोग्य ढासळते व उत्पादन कमी होते हे सर्व टाळण्यासाठी चांगला चारा टिकवून ठेवणे जरूरीचे आहे अशा वेळेस ज्वारी मका यासारखा हिरवा चारा कुटी करून मुरघास खडयात साठवून ठेवावा गवत असल्यास त्यातील पाण्याचा अंश कमी करून सावलीत साठवून ठेवावे म्हणजे चारा टंचाईच्या काळात असा चारा जनावरास देवून त्याचे आरोग्य व उत्पादन टिकवून ठेवता येईल.

चारा टंचाईच्या काळात निकृष्ट चारा जनावरांना देण्याची वेळ येते असा चारा चवदार असण्याची शक्यता कमी असते त्यासाठी चा-यावर मिठाचे पाणी शिपंडल्यास चारा चवदार होईल या शिवाय मळी उपलब्ध असल्यास त्याचाही वापर करता येईल उसाचे पाचट, गव्हाचे अथवा तांदळाचे काड यासारख्या निकृष्ट चारा/ कुटार वापरतांना युरीयाचा वापर करण्यात येतो त्यासोबत उसाची मळी किंवा काळा गुळ अशा उर्जा स्त्रोताचा पुरवठा केला पाहिजे. पशुआहारात युरीयाचा वापर करण्यापूर्वी पशुवैदयकाचा सल्ला जरूर घ्यावा.

9. जंतुनाशक औषध 

वासरामध्ये विशेषत जंत होण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे वासरू खंगत जावून त्याची वाढ खुंटते पोटाचे आकारमान वाढते व त्वचा खरखरीत होऊन केस गळतात. जंत झाल्यानंतर वासराचा आहार वाढलेला असतो मात्र त्यातून मिळणा-या अन्नचा जास्तीत जास्त लाभ पोटातील जंत आपल्या स्वत:च्या वाढीसाठी करतात त्यामुळे वासराच्या शरीरास त्याचा फार कमी लाभ होतो तसेच खादयावरील खर्च सुध्दा वाया जातो यासाठी वासराला 6 महिन्यापर्यत दर महिन्याला तर मोठया जनावरांना वर्षातून दोन ते तीन वेळा जंताचे औषघ जरूर दयावे.

10. लसीकरण 

रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न पहाता वेळापत्रकानुसार लसीकरण (Vaccination) करावे. रोगाची साथ येण्याअगोदर लसीकरण केल्यामुळे दोन ते तीन आठवडे रोग प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी लागतात. त्यामुळे रोगाची साथ येण्याअगोदरच जनावरांच्या शरीरामध्ये रोग प्रतिकारशक्ती निर्माण होतेपुढे होणारे नुकसान टाळता येउ शकते. लाळ्या खुरकूत, घटसर्प व फऱ्या रोगाच्या नियंत्रणासाठी लसीकरण सहा महिन्यांची वासरे किंवा मोठ्या वयाच्या जनावरांत नियमित करावे.

11. दुग्ध व्यवस्थापन 

अलीकडील संशोधनानुसार असे दिसून आले की जर दिवसातून दोन वेळा धार काढण्यापेक्षा जर तीन वेळा धार काढली तर दूध उत्पादन (Milk Production) वाढते. धार काढण्याची वेळ ही निच्छित असावी. तसेच जास्त दूध देणार्‍या पशुचा आहार ही पोषक असावा.

12. खादय व चा-याची नोंद 

पशुपालन व्यवसायातील सर्वात जास्त सर्व (सुमारे 65 ते 70  टक्के) खर्च खादयावर व चा-यावर होत असल्यामुळे, खादय व चा-याच्या वापराशी संबधित खर्चाची सखोल नोंद ठेवणे अत्यावश्यक आहे. यामुळे आपल्या व्यवसायाचा फायदा किंवा तोटयाची आपणांस वेळीच कल्पना येवू शकेल व पुढील नुकसान टळू शकेल आणि आपण उपाय योजना आखू शकतो.            


    

डॉ. अमोल आडभाई

राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था, बंगळुरु (कर्नाटक)
Mo: 8805660943
Email: amoladbhai.943@gmail.com