तापमानातील वाढीचे पशुपक्षी व प्राणी यांच्यावरील परिणाम — लेखांक २

तापमानाच्या वाढीमुळे दिसून येणारी विविध प्राण्यांतील ठळक महत्वाची लक्षणे :

गाय व म्हैसवर्ग :
अस्वस्थता
वरवरच्या श्वसनात लक्षणीय वाढ, तोंडाद्वारे श्वास घेण्याची वृत्ती.
लाळ स्त्रवण.
पचनसंस्थेतील आकुंचन — प्रसरण प्रक्रिया, तसेच पाचकरसाचे स्त्रवण मंदावल्यामुळे अपचन, बद्धकोष्ठता
रवंथ मंदावते व नंतर पूर्णपणे थांबते.
अनाहार — विशेषत: २५ अंश सेल्सियस तापमानापासून सुरुवात. ४० अंश
सेल्सियसपर्यंत तापमान वाढल्यास आहाराच्या प्रमाणात ४० टक्के घट होते. त्यामुळे जनावरे खंगण्याची शक्यता अधिक.
तहान व पाणी पिण्याचे प्रमाण लक्षणीय वाढते.
थकवा, हालचाली व प्रतिसादक्षमता कमी.
घाम येणे. ताप येणे.
हृदयक्रिया मंदावणे.
विविध स्त्रावांची परिणामकारकता कमी होते. त्यातून दूधउत्पादनही घटते.
कासेची क्षमता कमी होते. जसजसे तापमान वाढते, तसे १५ टक्क्याहून अधिक घट. २१ अंश सेल्सियस तापमानापर्यंत दूधउत्पादनावर विशेष परिणाम होत नाही. तथापि, त्यानंतर सौम्य परिणाम दिसून येतात.
दुधाच्या घटकांवरही वाढत्या तापमानाचा परिणाम दिसून येतो. २७ अंश सेल्सियसहून अधिक तापमानात दुधातील मेदाचे प्रमाण असाधारण असे वाढून त्याच्या टिकाऊपणावर परिणाम होतो. विशिष्ट वासही अशा दुधाला येतो.
एकूण ऊर्जाहीन अवस्थेमुळे तसेच विविध अवयवांच्या असाधारण क्षमतांमुळे
प्रजननक्षमता कमी होते.

मेष वर्ग :
साधारण तापमान केवळ १ अंश सेल्सियसपर्यंत वाढू शकते. त्याहून अधिक वाढ
प्राणघातक. आर्द्रता व तापमान यांचे प्रमाण अधिक महत्वाचे. आर्द्रता कमी असल्यास
वातावरणाचे ४. अंश सेल्सियस तापमानही सहन करू शकतात. मात्र ६० टक्क्यांहून
अधिक आर्द्रता असेल तर ३२ अंश सेल्सियस तापमानही ताणकारक ठरते.

वराह वर्ग :
तापमानाच्या वाढीस अधिक संवेदनशील. ३० अंश सेल्सियस तापमानही असह्य.
विशेषत: तापमानवाढीसह असणारी आर्द्रता अधिक ताणकारक. ४० अंश सेल्सियस
तापमान आणि ६५ टक्के आर्द्रता प्राणघातक. शरीराचे तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत
वाढल्यास थेट मृत्यू.

श्वान :
वातावरणातील २७ — ३० अंश सेल्सियस तापमान, शरीराच्या तापमानवाढीस
कारणीभूत. शारीरिक तापमान ४१ अंश सेल्सियसपर्यंत वाढल्यास अस्वस्थतेची लक्षणे
वाढल्याचे दिसून येते आणि ४२.५ अंश सेल्सियस तापमान प्राणघातक ठरते.

पक्षी वर्ग :
साधारण शारीरिक तापमान अधिक असल्यामुळे, वातावरणातील तापमानवाढीस अधिक संवेदनशील प्रतिसाद.
१३ ते २१ अंश सेल्सियसपर्यंत तापमान कुक्कुटवर्गातील पक्ष्यांसाठी अनुकूल असते.
४०.६ अंश सेल्सियस तापमान व ७५ टक्के आर्द्रता ही प्राणघातक असते. तथापि, आर्द्रता साधारण असतानाही ४२ अंश सेल्सियस तापमान सौम्य उष्माघातसदृश्य लक्षणांसाठी कारणीभूत ठरते. त्यापेक्षा अगदी सूक्ष्म असे अधिक तापमानही त्यांची तीव्रता वाढवते. ४३ अंश सेल्सियस तापमान अधिक ताणकारक. दगावण्याची शक्यता अधिक.
अंड्यांच्या निर्मिती व दर्जावर वाढत्या तापमानाचा परिणाम होतो.
मांसवर्गीय पक्षी (व मेष) यांच्या मांसनिर्मिती, प्रथिनात्मक दर्जा यांत घट होते.

शारीरिक वाढ, प्रजनन व उत्पादनावर होणारे परिणाम :
तापमानवाढीमुळे कोरड्या चाऱ्याच्या विनियोगात वृद्धी होते.
एकंदर वाढ — नवजात प्राण्यांच्या वाढीवर दुष्परिणाम. वराहवर्गात ३० अंश सेल्सियस तापमानात वाढीवर दुष्परिणाम लक्षणीय. वराहवर्गासाठी २५ अंश सेल्सियस, तर कुक्कुट वर्गासाठी २७ अंश सेल्सियस एवढेच तापमान अनुकूल असते. त्यापेक्षा अधिक तापमान वाढ व वजन कमी करण्यास कारणीभूत ठरते. वाढीसाठी आवश्यक असलेल्या ग्रंथींची कार्यक्षमता कमी होते. उर्जावृद्धी करणाऱ्या ग्रंथी (उदा.: थायरोईड) अक्षम होवू लागतात, परिणामी विविध अवयवांची व तसेच एकंदर वाढीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो.
वाढत्या तापमानात जन्मलेल्या नवजातप्राण्यांच्या सक्षमतेवरही परिणाम होतात. त्यांच्या
वाढीची लक्षणे, प्रमाण प्रलंबित होवून त्यांची एकंदर वाढ खुंटते.

प्रजननक्षमतेवरील परिणाम :
तापमान वाढीचा परिणाम नर व मादी वर्गातील प्राण्यांच्या प्रजननसंबंधी कार्यावर परिणाम होतो. मुख्यत्वे करून दोन्ही वर्गातील प्राण्यांच्या व जनावरांच्या प्रजननयोग्य वयातील वाढ अधिक महत्वाची ठरते. अधिक तापमान काळात जन्मलेल्या व वाढत असलेल्या प्राण्यांच्या प्रजननसंस्था विलंबाने प्रतिसादक्षम होतात व त्यामुळे ही जनावरे उशिरा वयात येतात. त्यामुळे त्यांचे प्रजननाकुल आयुष्य खुंटते.

नर प्राणी :
वाढत्या तापमानात वीर्यनिर्मिती, वीर्याची गुणवैशिष्ट्ये असाधारणपणे घटतात.
साधारणपणे ३५ अंश सेल्सियसपर्यंत साधारण क्षमता दिसून येते. त्यापेक्षा अधिक
तापमानात दुष्परिणाम दिसून येतात. मेषवर्गाच्या नरांत तर तापमानाच्या वाढीस अधिक
संवेदनशील प्रतिसाद दिसून येतो.
विविध ऋतूतील तापमानच नव्हे तर, वाढत्या तापमानाचा कालावधीही महत्वाचा
ठरतो. लांब दिवस व लहान रात्र ही सर्वसाधारणपणे प्रजननास अनुकूल ठरते.
वृषण व सहायक ग्रंथी यांच्या कार्यावर परिणाम होवून वीर्याचे प्रमाण, त्यातील
शुक्रबीजाचे प्रमाण, क्षमता कमी होते. प्रजननवृत्ती मंदावतात.

मादी :
तापमानातील वाढीचा मादीच्या प्रजनन क्षमतेवर अधिक तीव्र, शीघ्र आणि विविधांगी परिणाम होतो. बीजांडे प्रतिसादहीन होतात. त्यामुळे बीजांची निर्मिती, पक्वता होत नाही. ऋतुचक्र लांबते, अनियमित होते व रजोवृत्ती मंदावतात. फलनक्षमता कमी होते. गर्भधारणा अनियमित, अपक्व व अपरिपूर्ण होते. कृत्रिम रेतन अयशस्वी ठरण्याचे प्रमाण वाढते. ३८ अंश सेल्सियस तापमानात अधिक राहिल्यास गर्भपात घडण्याची शक्यता. अतिशय क्लिष्ट असलेल्या प्रजनन क्रिया अपूर्ण राहतात अथवा अकाली थांबतात. अशा माद्या प्रसूत झाल्या तरी त्यांची संतती ही एकतर विकलांग असते किंवा अक्षम ठरते अथवा भविष्यात त्यांच्या शरीरक्रिया अनियमित व असाधारण असल्याचे दिसून येते. वाढ खुरटलेली, अक्षम संतती जन्माला येवू शकते.

**********

प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी

(स्वेच्छानिवृत्त) विभागप्रमुख व प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र विभाग,
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*